वीज केबल चोरणारी टोळी म्हापसा पोलिसांकडून गजाआड

२० लाखांचे दोन ट्रक साहित्य हस्तगत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
09th November, 12:33 am
वीज केबल चोरणारी टोळी म्हापसा पोलिसांकडून गजाआड

म्हापसा : वीज खात्याची भूमिगत केबल चोरी करणारी टोळी म्हापसा पोलिसांनी गजाआड केली. चौघांना अटक करून २० लाख रूपये किंमतीचे केबलचे सामान जप्त केले.

मोहम्मद रेहान अली (१९, रा. मडगाव व मूळ उत्तर प्रदेश), सैफ अली खान (१८, रा. कोलवाळ), फिरोज अब्दुल रहीम खान (१९, रा. कोलवाळ व मूळ नाशिक) व रामू नंदू सोनी (२१, रा. फोंडा व मूळ उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविली असून, या गस्तीवेळी गुरुवारी रात्री संशयितांना कारोणा- हळदोणा येथे केबल चोरताना या टोळीतील दोघांना रंगेहाथ पकडले. त्यानंतर इतर दोघांना पकडून अटक करण्यात आली. 

संशयितांकडून पोलिसांनी भूमिगत वाहिन्यांचे १८ केबल, कटर, स्कूटर, अॅल्युमिनियम केबलच्या १० पिशव्या, एलपीजी सिलंडर आदी दोन ट्रकभर साहित्य जप्त केले. या साहित्याची किंमत २० लाख रूपये आहे. 

दरम्यान, संशयितांनी म्हापसा, हळदोणा व इतर परिसरात ही चोरी केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत. पोलीस निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर, पंढरी चोपडेकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्सटेबल राजेश कांदोळकर, अक्षय पाटील, प्रकाश पोळेकर, आनंद राठोड व महेंद्र च्यारी या पथकाने ही कारवाई केली.                 

हेही वाचा