वास्को पोलिसांकडून कारवाई : एक संशयित फरार
वास्को : येथे पैशांच्या बदल्यात नोकरी प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे तर दुसरा संशयित फरार आहे. शिक्षण खात्यामध्ये ‘मल्टी टास्क’ची नोकरी देण्याचे आश्वासन देऊन ४ लाख ३० हजार रुपये घेऊन फसवणूक केल्या प्रकरणी संशयित गोविंद मांजरेकर याला वास्को पोलिसांनी रविवारी अटक केली.
नोकरी देण्याचे आश्वासन देऊन ४ लाख ३० हजार रुपये येथील दोघांकडून घेतल्यावर नोकरी दिलीच नाही शिवाय पैसेही परत केले नसल्याने नवे वाडे येथील साक्षी सुदर्शन केरकर यांनी वास्को पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. संशयित गोविंद मांजरेकर (४२, बायणा) याला वास्को पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. तर दुसरा संशयित सूरज नाईक याचा शोध वास्को पोलीस घेत आहेत. या दोघांनी आणखी कितीजणांकडून नोकरीसाठी रक्कम घेतली होती याचा तपास वास्को पोलीस करीत आहेत. ‘जॉब स्कॅम’ गाजत असल्याने व सरकारने अशा प्रकारची फसवणूक झालेल्यांना तक्रार करण्याचे आवाहन केल्यामुळे साक्षीने मांजरेकर व नाईक यांच्या विरोधात तक्रार केली.
वास्को पोलिसांनी नोंदवला गुन्हा
दोघांविरोधात भा.दं.स. ४२० आर/डब्ल्यू ३४ कलमाखाली गुन्हा दाखल केला. त्यानंतर मांजरेकर याला रविवारी अटक करण्यात आली. याप्रकरणी वास्कोचे उपअधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस पुढील तपास करीत आहेत.