‘बुक माय शो’वरून स्थळ जाहीर
पणजी : यंदाचा सनबर्न महोत्सव २८ ते ३० डिसेंबर या काळात धारगळमध्ये होण्याची शक्यता आहे. ‘बुक माय शो’ या वेबसाईटरवरून आयोजकांनी धारगळ हे स्थळ जाहीर केले आहे.
सनबर्न महोत्सवाच्या आयोजनावरून गेल्या काही दिवसांत राज्यात वाद पेटला होता. यंदाचा महोत्सव आयोजकांनी उत्तर गोव्याऐवजी दक्षिण गोव्यात आयोजित करण्याचे निश्चित केल्याचे स्पष्ट होताच, विरोधी काँग्रेस पक्ष आणि दक्षिण गोव्यातील जनतेने महोत्सवाला ठाम विरोध दर्शवला. सासष्टीतील अनेक पंचायतींनी दक्षिण गोव्यात सनबर्न महोत्सवाला विरोध दर्शवत, त्याबाबतचा ठरावही ग्रामसभांमध्ये घेतला होता. त्यानंतर सरकार उद्योग विकास महामंडळाच्या जागेत हा महोत्सव आयोजित करण्याच्या प्रयत्नात असल्याचा दावा करीत प्रदेश काँग्रेसने आक्रमक पवित्रा जारी केला होता.
यंदाच्या महोत्सवाला अजून कोणतेही परवाने देण्यात आलेले नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि पर्यटनमंत्री रोहन खंंवटे यांच्याकडून दिले जात असतानाच, आयोजकांनी मात्र धारगळ हे स्थळ निश्चित केले आहे.