खासगी इस्पितळातील प्रमाण किंचित घटले
पणजी : राज्यात प्रसूतीसाठी खासगीपेक्षा सरकारी इस्पितळांनाच अधिक पसंती दिली जाते. २०१४ ते २०२३ या दहा वर्षांच्या कालावधीत राज्यात एकूण १ लाख ९३ हजार ६७२ मुले जन्माला आली होती. यातील १ लाख ९ हजार १०६ मुले सरकारी (५६.३४ टक्के) तर ७८ हजार ८१५ मुले (४०.६९ टक्के) खासगी इस्पितळात जन्माला आली होती. नियोजन, सांख्यिकी आणि मूल्यमापन खात्याने जारी केलेल्या अहवालांतून ही माहिती समोर आली आहे.
अन्य राज्यांच्या तुलनेत गोव्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा चांगल्या दर्जाच्या आहेत. माफक दर असल्याने देखील अनेक जण प्रसूतीसाठी सरकारी इस्पितळांनाच प्राधान्य देतात. वर्ष निहाय पाहता सरकारी इस्पितळात प्रसूती होण्याचे प्रमाण वाढत आहे. तर खासगी इस्पितळातील हे प्रमाण किंचित कमी झाले आहे. २०१४ मध्ये झालेल्या एकूण प्रसूतींपैकी ५६ टक्के या सरकारी इस्पितळात झाल्या होत्या. तर २०२३ मध्ये ६० टक्के प्रसूती सरकारी इस्पितळात झाल्या.
गेल्या दहा वर्षात राज्यातील खासगी इस्पितळात प्रसूती होण्याचे प्रमाण थोडे कमी झाले आहे. २०१४ मध्ये राज्यात झालेल्या एकूण २१ हजार ४१५ प्रसूतींपैकी ८७६५ म्हणजेच (४०.९२ टक्के) प्रसूती या खासगी इस्पितळात झाल्या होत्या. तर २०२३ मध्ये १७ हजार २४० पैकी ६८४९ (३९.७० टक्के) प्रसूती या खासगी इस्पितळात झाल्या होत्या. कोविड काळातील २०१९ ते २०२१ वगळता वरील दहा वर्षांत खासगी इस्पितळात प्रसूतींचे प्रमाण कमी होत आले आहे.