गोवा। ठकसेनांच्या मालमत्ता करणार जप्त!

नोकरी फसवणूक प्रकरणी मुख्यमंत्र्यांची हमी; कोणत्याही पक्षाचा असला तरी कारवाई करण्याचीही ग्वाही

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 11:31 pm
गोवा। ठकसेनांच्या मालमत्ता करणार जप्त!

पणजी : सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूक केलेले कोणत्याही पक्षाचे असले, तरी त्यांना अजिबात सोडणार नाही. ज्यांनी पैसे गमावले त्यांना त्यांचे पैसे परत करण्यासाठी अशा प्रकरणांत सहभागी असलेल्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. अशा प्रकरणांत आतापर्यंत १८ जणांना अटक करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.


सरकारी नोकरी देण्याच्या बहाण्याने गोमंतकीयांना कोट्यवधींना गंडा घातल्याची अनेक प्रकरणे आतापर्यंत समोर आलेली आहेत. पूजा नाईक, दीपाश्री सावंत गावस आणि मंगळवारी​ अटक केलेल्या श्रुती प्रभुगावकर यांच्या टोळ्या अशा प्रकरणांत सहभागी असल्याचेही उघड झालेले आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी अशा प्रकरणांत सहभागी असलेल्या एकालाही सोडणार नसल्याचा इशारा दिला. 


सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून लोकांना लुटलेल्या १८ जणांना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. यापुढे जे सापडतील ते कोणत्याही पक्षाचे असले, तरी त्यांना दयामाया दाखवली जाणार नाही. त्यांच्यावर कारवाई करून त्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात येतील, असे मुख्यमंत्री म्हणाले.

भरती प्रक्रियाच रद्द करा : विजय

नोकरभरती घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या अनेकांचा भाजपशी संबंध असल्याचे समोर आले आहे. सरकारने भरती प्रक्रियाच रद्द करावी, अशी मागणी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई यांनी केली.