‘उटा’च्या कार्यक्रमानंतर रमेश तवडकरांचा संताप
मडगाव : जर चुकीच्या वृत्तीला राज्य सरकार किंवा भाजप पक्षाची पाठिंबा देण्याची मानसिकता असेल, सभापतीपदाला मानसन्मान दिला जात नसेल तर गरज पडल्यास मानसन्मानासाठी व लोकहितासाठी सभापतीपदाचा राजीनामा देण्याचीही तयारी आहे, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले. ‘उटा’च्या द्विदशकपूर्ती कार्यक्रमाबाबत बोलताना तवडकर यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मडगाव येथे पत्रकार परिषद घेत सभापती रमेश तवडकर यांनी ‘उटा’च्या कार्यक्रमानंतर त्यांच्याबाबतची भूमिका व टीकांना उत्तरे दिली. तवडकर यांनी सांगितले की, २०१२ पासून संस्थेच्या नीती व तात्त्विक मतभेदामुळे ‘उटा’ या संघटनेपासून फारकत घेतलेली आहे. ‘उटा’ संघटनेने आपणास निमंत्रण देणे व आपण ते स्वीकारणे याचा प्रश्नच येत नाही. ‘उटा’चा संघर्ष या पुस्तकात आपणास व्हिलन केलेले असून बाकीच्या दोन नेत्यांना हिरो केलेले आहे व त्यावर आक्षेप घेतलेला आहे, असे तवडकर म्हणाले.
या अधिवेशनाला आपला वैयक्तिक विरोध होता पण आपण कुणालाही हे सांगितलेले नाही. यात भाजपचे एसटी नेते, जिल्हा पंचायत सदस्य, अमादार गणेश गावकर यांच्यासह इतरही अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित नव्हते. याचा विचार भाजपनेही करण्याची आवश्यकता आहे.