नोकरीचे आमिष : वास्कोत आई, मुलाला अटक

पोलीस नोकरीसाठी सहा लाख रुपये घेतल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th November 2024, 12:37 am
नोकरीचे आमिष : वास्कोत आई, मुलाला अटक

वास्को : सरकारी नोकरी विक्रीसंबंधीचे आणखी एक प्रकरण वास्कोत समोर आले. पांडुरंगवाडी, बायणा येथील झुआरी कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या उमा पाटील व तिचा मुलगा शिवम यांनी आपल्या मुलाला पोलीस दलात शिपाईची नोकरी देण्याचे आमिष दाखवून आपल्याकडून ६ लाख रुपये घेतल्याची तक्रार चिंचवाडा-चिंबल येथील रश्मी चोपडेकर यांनी वास्को पोलिसांत केली.
याप्रकरणी संबंधित महिलाने तक्रार केल्याने उमा पाटील व शिवम पाटील यांना वास्को पोलिसांनी बुधवारी अटक केली. आरोपींनी पैसे घेऊनही नोकरी मिळत नसल्याने चोपडेकर यांनी शेवटी वास्को पोलीस स्थानक गाठले. याप्रकरणी वास्को पोलिसांनी गुन्हा दाखल करून उमा पाटील व तिच्या मुलाला अटक केली. याप्रकरणी वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत.
यापूर्वीही काहीजणांनी नोकरी देण्याचे आमिष दाखवून पैसे घेतल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र, त्यावेळी या तक्रारींसंबंधी योग्य दखल घेण्यात आली नव्हती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी वास्को पोलिसांनी सूरज नाईक, गोविंद मांजरेकर यांना अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात उभे केले असता, त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.