पुन्हा सरकारी नोकरीचे आमिष : न्यायालयाकडून संशयिताला तीन दिवसांची कोठडी
फोंडा : सरकारी नोकरी देण्यासाठी योगेश शेणवी कुंकळीकर (४९, ढवळी) या शिक्षकाने साडेबारा लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याचा गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. अटक केलेलेल्या संशयिताने १ कोटी २० लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले असून न्यायालयाने त्याला ३ दिवसाचा रिमांड दिला आहे. तर रविवारी रात्री म्हार्दोळ पोलिसांनी संशयित संदीप जग्गनाथ परब (तारीवाडा-माशेल) याच्यावरही गुन्हा नोंद करून त्यालाही अटक केली.
सरकारी नोकरी देण्यासाठी ५ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांनी संदीप परब याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला रविवारी रात्री उशिरा अटक केली. म्हार्दोळ पोलिसांनी अटक केलेल्या संदीप परबला न्यायालयाने सुद्धा ३ दिवसाचा रिमांड दिला आहे.
सध्या फोंडा पोलिसांनी अटक केलेल्या दीपाश्री सावंत हिने संदीप परब याच्याशी ओळख करून सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते. त्यानुसार फेब्रुवारी २०२४ मध्ये खांडोळा - माशेल येथील विशाल गावकर या युवकाने वन खात्याच्या नोकरीसाठी संदीप परब याच्याकडे ५ लाख रुपये दिले होते. संदीप परब याने ही रक्कम दीपाश्री सावंत हिच्याकडे सुपूर्द केली होती.
याप्रकारणी विशाल गावकर याने रविवारी संदीप परब याच्या विरोधात पोलीस स्थानकात रीतसर तक्रार दाखल केली. म्हार्दोळ पोलिसांनी गुन्हा नोंद करून संदीप परब याला अटक केली. अटक केलेल्या संशयिताला सोमवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला ३ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले.