सत्तरी। पर्ये सत्तरी भूमिका देवस्थानच्या तुळशी वृंदावन उद्यापनावरून मतभेद

मामलेदारांच्या निवाड्याला माजिक गटाकडून हरकत

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 12:01 am
सत्तरी। पर्ये सत्तरी भूमिका देवस्थानच्या तुळशी वृंदावन उद्यापनावरून मतभेद

वाळपई : साठा सत्तरीची देवता पर्ये येथील सप्तपदी भूमिका देवस्थानच्या नवीन बांधण्यात आलेल्या तुळशी वृंदावनाच्या उद्यापन संदर्भात माजिक राणे व गावकर यांच्या दरम्यान सोमवारी अचानक वादाची ठिणग पडली. यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी तिनही महाजनात एकवाच्यता न झाल्यामुळे उद्यापनाचा कार्यक्रम होऊ शकला नाही. 


सत्तरी तालुक्याचे मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर यांनी सर्व गटांचे व महाजनांचे म्हणणे ऐकून घेतले व नवीन बांधण्यात आलेल्या तुळशी वृंदावनाचे उद्यापन राणे, गावकर व माजी या तिन्ही महाजनांनी एकाच वेळी करावे. सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे अशा प्रकारचा निवाडा दिला होता. मात्र मामलेदारांनी दिलेल्या निवाड्याला माजिक महाजन गटाने विरोध दर्शविला.

यासंदर्भात मामलेदार धीरेंद्र बाणावलीकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, आपण दिलेल्या निवाड्याची अंमलबजावणी झाली नाही. काही महाजन गटांचा इतरांना सहभागी करून घेण्यास विरोध असल्यामुळे उद्यापनाची प्रक्रिया होऊ शकलेली नाही. गुरुवारी होणाऱ्या तुळशी विवाहपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे होते. मात्र आपण दिलेला निवाडा हा सर्व दृष्टिकोनातून विचार करूनच दिलेला आहे.