गोव। नऊ विद्यार्थ्यांना ‘गोमंत बालभूषण’ पुरस्कार जाहीर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पणजीत होणार गौरव

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
12th November, 12:05 am
गोव। नऊ विद्यार्थ्यांना ‘गोमंत बालभूषण’ पुरस्कार जाहीर

पणजी : बालभवनतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यातील नऊ प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना त्यांनी विविध क्षेत्रांत दाखवलेल्या कौशल्यासाठी ‘गोमंत बालभूषण’ पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. येत्या १४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता कांपाल-पणजी येथे आयोजित विशेष समारंभात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.


यावेळी बालभवनचे अध्यक्ष तथा शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर उपस्थित राहणार आहेत. यंदा सादरीकरणातील कौशल्यासाठी ऋषिकेश नितीन ढवळीकर व अभिनव महेश नाईक, सृजनकलेत उपदेश मधुकर च्यारी, ओजस संजय वेरेकर, सृजनशील साहित्य लेखनासाठी गार्गी जगदीश शिरोडकर आणि अदिती आशिषकुमार भगत, वैज्ञानिक कौशल्यासाठी दिवाकर कौशल सिंग व पूर्वेश गौरीश बोरकर, तर विशेष विभागात (दिव्यांग) सादरीकरणासाठी भाविका मिलिंद कुडाळकर यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती बालभवनचे संचालक शशिकांत पुनाजी यांनी दिली.

विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पुरस्कार

बालभवनतर्फे दरवर्षी कला, साहित्य, विज्ञान आदींसारख्या क्षेत्रांत दर्जेदार कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गोमंत बाल भूषण पुरस्कार देण्यात येतात. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्यातील कलेला अधिक ऊर्जा मिळावी, या हेतूने दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात.