अपात्रता याचिका : ३, ४ रोजी अंतिम सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे होणार पालन : सभापती


6 hours ago
अपात्रता याचिका : ३, ४ रोजी अंतिम सुनावणी

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अपात्रता याचिकेसंंबंधी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचे पालन करताना याचिकेवर ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी होणार आहे. दोन दिवस ही सुनावणी सुरू राहील, अशी माहिती सभापती रमेश तवडकर यांनी दिली.
याचिकादार डॉम्निक नोरोन्हा यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. प्रतिवादी आठ आमदारांपैकी सात आमदारांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुनावणी लवकर पूर्ण झाली पाहिजे. ३ आणि ४ ऑक्टोबर रोजी अंतिम सुनावणी होईल. ४ ऑक्टोबर रोजीच निकाल जाहीर केला जाईल, असे सांगता येणार नाही, असेही सभापती तवडकर यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या आठ आमदारांनी दोन वर्षांपूर्वी स्वतंत्र गट स्थापन करून भाजपात प्रवेश केला होता. या आठ आमदारांचा भाजप प्रवेश बेकायदेशीर ठरतो, असा दावा करून डॉम्निक नोरोन्हा यांनी अपात्रता याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. याविषयी गिरीश चोडणकर आणि अमित पाटकर यांनीही स्वतंत्रपणे अपात्रता याचिका दाखल केल्या आहेत. गुरुवारी सुनावणीवेळी सभापतींनी सर्वोच्च न्यायालयाचा निर्देश वाचून दाखवला. सप्टेंबर २०२२ मध्ये मायकल लोबो, दिगंबर कामत, डिलायला लोबो, केदार नाईक, संकल्प आमोणकर, अालेक्स सिक्वेरा आणि रूडॉल्फ फर्नांडिस यांनी वेगळा गट स्थापन करून भाजपात प्रवेश केला होता. या आठ आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल झाल्या आहेत.