मंत्री बाबूश, गोविंद पक्षावर नाराज!

विरोधकांच्या आरोपांवेळी पक्षाचे नेते, कार्यकर्ते साथ देत नसल्याचा दावा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September, 11:52 pm
मंत्री बाबूश, गोविंद पक्षावर नाराज!

पणजी : विरोधकांकडून आरोपबाजी होत असताना पक्ष मात्र आपल्या बाजूने उभा राहत नाही. पक्षाचे काही पदाधिकारी अशावेळी आपल्याला साथ देत नाहीत, अशी खंत मंत्री बाबूश मोन्सेरात आणि गोविंद गावडे यांनी गुरुवारी झालेल्या भाजप कोअर समितीच्या बैठकीत व्यक्त केल्याची माहिती बैठकीला उपस्थित सूत्रांनी ‘गोवन वार्ता’ला दिली.
गेल्या काही वर्षांत राज्यात घडलेल्या विविध प्रकरणांवरून विरोधी आमदारांनी काही मंत्र्यांना वारंवार लक्ष्य केले. गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी मंत्री गोविंद गावडे यांना कला अकादमीच्या नूतनीकरण कामावरून, तर मंत्री बाबूश मोन्सेरात यांना दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील नोकरभरतीवरून घेरले आहे. याशिवाय काँग्रेस, आपच्या आमदारांकडूनही या दोन्ही नेत्यांवर वारंवार हल्लाबोल सुरू असतो. या काळात मुख्यमंत्री या नात्याने डॉ. प्रमोद सावंत यांनी आपली बाजू लावून धरली. पण, भाजपच्या चिन्हावर विधानसभा निवडणुकीत निवडून येऊनही पक्षाचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते मात्र आपल्याला साथ देत नाहीत, अशी खंत या दोन्ही मंत्र्यांनी बैठकीत व्यक्त केली.
एका बाजूला आमच्या मतदारसंघांत पक्षाचे काम वाढवण्याचे निर्देश आम्हाला दिले जातात. त्यानुसार आम्ही पक्षाचा प्रत्येक उपक्रम मतदारसंघांमध्ये राबवत आहोत. पक्षाचे काम प्रामाणिकपणे करीत आहोत. तरीही पक्षाकडून आम्हाला अशी वागणूक का मिळत आहे, असा प्रश्न करीत, संकट काळात मंत्र्यांच्या मागे पक्षानेही उभे राहायला हवे, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. त्यावर प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोन्ही मंत्र्यांची समजूत काढल्याचे आणि पुढील काळात सर्वच मंत्र्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे निर्देश त्यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना दिल्याचेही सूत्रांनी सांगितले.
खंवटे​-सिक्वेरांमध्ये वाद
पर्वरी मतदारसंघातील खारफुटीची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. काही प्रकल्पांना पर्यावरण खात्याकडून परवाने दिले जात असल्यामुळे पर्वरीत खारफुटीची कत्तल होण्याचे प्रमाण वाढल्याचा दावा मंत्री तथा पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी केला. यावरून खंवटे आणि पर्यावरणमंत्री आलेक्स सिक्वेरा यांच्यात वाद झाल्याचेही सूत्रांनी सांगितले.