आता गोमेकॉप्रमाणे आरोग्य खात्यातही कॅन्सर रुग्णांची रजिस्ट्री!

रुग्णांचा डेटा मिळण्यासह संशोधनासाठी होणार मदत


6 hours ago
आता गोमेकॉप्रमाणे आरोग्य खात्यातही कॅन्सर रुग्णांची रजिस्ट्री!

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाप्रमाणे (गोमेकॉ) आरोग्य खात्याकडूनही कॅन्सर रुग्णांसंदर्भात रजिस्ट्री तयार करण्यात येणार आहे. या रजिस्ट्रीमुळे प्रत्येकवर्षी राज्यातील कॅन्सर रुग्णांचा डेटा प्राप्त होऊन त्याचा फायदा संशोधनासाठी होणार आहे.
गोमेकॉच्या कम्युनिटी विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी शुक्रवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना याबाबतची माहिती दिली. आतापर्यंत केवळ गोमेकॉतच कॅन्सर रुग्णांची रजिस्ट्री होती. गोमेकॉत कॅन्सर उपचारांसाठी​ येणाऱ्या रुग्णांची तेथे नोंद होत आहे. परंतु, जे रुग्ण खासगी इस्पितळांत कॅन्सरचे उपचार घेतात, त्यांची माहिती सरकारला उपलब्ध होत नव्हती. त्यामुळे गोमेकॉशिवाय इतर इस्पितळांत उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती आरोग्य खात्याच्या रजिस्ट्रीमधून मिळणार आहे, असे डॉ. काकोडकर म्हणाले.
राज्यातील कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे याबाबत संशोधन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गोमेकॉ आणि आरोग्य खात्याच्या रजिस्ट्रीमधून मिळणाऱ्या माहितीवरून राज्यात प्रत्येकवर्षी किती कॅन्सरचे रुग्ण सापडतात, कोणत्या प्रकारचा कॅन्सर वाढत आहे, कोणत्या उपचारांमुळे कॅन्सर रुग्णाला वाचवण्यात यश मिळते, कोणत्या भागांत कॅन्सर रुग्णांचे प्रमाण वाढत आहे, त्याची नेमकी कारणे काय अशा अनेक गोष्टींचा शोध या रजिस्ट्रीमुळे घेता येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कॅन्सरबाबत संशोधन करण्याची मागणी विरोधी पक्षांकडूनही
गोमेकॉने मोबाईल कॅन्सर डिटेक्शन व्हॅनच्या माध्यमातून राबवलेल्या कॅन्सर स्क्रिनिंग अभियानातून केलेल्या तपासणीत कॅन्सरच्या जवळ पोहोचलेले अनेक रुग्ण सापडले आहेत. दरवर्षी कॅन्सर रुग्णांमध्ये वाढही होत आहे. या पार्श्वभूमीवर, कॅन्सरबाबत संशोधन करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत होती.