काणकोणातील किडनीशी संबंधित वाढत्या रुग्णांचा अभ्यास सुरू

समस्येवर उपाय योजण्यासाठी सरकारकडून कृतिदल​ स्थापन


6 hours ago
काणकोणातील किडनीशी संबंधित वाढत्या रुग्णांचा अभ्यास सुरू

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात दिलेल्या हमीनुसार, राज्य सरकारने काणकोण तालुक्यात वाढत असलेल्या मूत्रपिंडाशी (किडनी) संबंधित रुग्णांचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी या विषयातील तज्ज्ञ लोकांचा समावेश असलेल्या कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे. या कृतिदलाच्या आतापर्यंत दोन बैठकाही झालेल्या आहेत.
गोवा मेडिकल कॉलेजच्या (गोमेकॉ) कम्युनिटी विभागाचे प्रमुख डॉ. जगदीश काकोडकर यांनी शुक्रवारी दै. ‘गोवन वार्ता’शी बोलताना याबाबत सविस्तर माहिती दिली. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये मूत्रपिंडाशी संबंधित आजार बळावलेल्या रुग्णांमध्ये मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यात दक्षिण गोवा जिल्ह्यातील काणकोण तालुका आघाडीवर आहे. या तालुक्यात ४४२ लोकांमागे एक मूत्रपिंडाशी संबंधित आजाराने ग्रस्त रुग्ण आढळून येत आहे, असे फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारच्या निदर्शनास आणून दिले होते. काणकोण तालुक्यातील मूत्रपिंडाशी आजाराने ग्रस्त रुग्णांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य खाते काय उपाययोजना आखणार आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी, काणकोण तालुक्यातील किडनीशी संबंधित रुग्णांची वाढती संख्या निश्चितच चिंताजनक असल्याचे सांगत काणकोणमध्ये असे रुग्ण वाढत असल्याची कारणे राष्ट्रीय एजन्सीमार्फत शोधण्यात येतील, अशी हमी सभागृहात दिलेली होती. त्यानुसार काणकोण तालुक्यात किडनीशी संबंधित वाढत्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी​ तज्ज्ञांचा समावेश असलेल्या कृतिदलाची स्थापना करण्यात आली आहे.
सर्वांत कमी रुग्ण असलेल्या तालुक्याचा अभ्यासही होणार
पुढील काही महिने किडनीशी संबंधित आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेले कृतिदल या समस्येचा विविध अंगांनी अभ्यास करणार आहे. त्यानंतर किडनीशी संबंधित सर्वांत कमी रुग्ण असलेल्या तालुक्याचा अभ्यासही केला जाईल. दोन्हींची तुलना करून नेमकी कारणे शोधली जाणार आहेत, असे डॉ. जगदीश काकोडकर यांनी सांगितले.