पंचायत क्षेत्रात ४०७, नगरपालिका क्षेत्रात १०० ठिकाणी कचऱ्याचे ढीग

‘स्वच्छता ही सेवा’ अभियानांतर्गत मुख्यमंत्री आज साधणार संवाद

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September, 11:47 pm
पंचायत क्षेत्रात ४०७, नगरपालिका क्षेत्रात १०० ठिकाणी कचऱ्याचे ढीग

पणजी : राज्यात विविध पंचायतींच्या ४०७ ठिकाणी आणि महापालिका क्षेत्रात १०० ठिकाणी कचऱ्याचे ढिग आहेत. ऑक्टोबरपूर्वी ब्लॅक स्पॉट साफ करण्याचे उद्दिष्ट आहे. स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत शनिवारी पंचायत आणि पालिका सदस्यांशी संवाद साधणार आहेत, अशी माहिती पंचायत संचालिका सिद्धी हळर्णकर यांनी दिली.सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम सुरू करण्यात आली. देशभरात ही मोहीम राबविण्यात येत आहे. कचरा व्यवस्थापन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अंकित यादव आणि पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
‘स्वच्छता ही सेवा अभियान’ २०१५ मध्ये सुरू करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्वच्छता सेवा कार्यक्रम आयोजित केला जातो. ही मोहीम २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंतीपर्यंत चालते. कोणत्या भागात स्वच्छता करायची याचे उद्दिष्ट पंचायतींना तसेच नगरपालिकांना दिले जाते. आतापर्यंत पंचायत क्षेत्रात ४०७ ठिकाणी कचऱ्याचे ढीग असल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका क्षेत्रात १०० ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. हा कचरा काढून टाकण्याचा हेतू आहे. कचऱ्याचे ढीग ऑक्टोबरपर्यंत साफ करणे आवश्यक आहे.मोहिमेअंतर्गत पंचायतींना ‘एक पेड माँ के नाम’ कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण करावे लागणार आहे. पंचायती तसेच नगरपालिकांमध्ये कचरा उचलण्यासाठी सफाई कामगार मित्र असतो. सफाई कामगारांसाठी २ ऑक्टोबरपर्यंत आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. सफाई कामगारांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे, असे हळर्णकर यांनी सांगितले.
मुख्यमंत्री समस्या जाणून घेणार
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे शनिवारी सकाळी पंच, सरपंच, नगरसेवक, नगराध्यक्ष आणि सफाई कामगारांशी सकाळी १० वाजता संवाद साधणार आहेत. स्वच्छता अभियानाबाबत पंचायत आणि नगरपालिकांच्या समस्या मुख्यमंत्री जाणून घेणार आहेत.