सुंभ जळेना, पीळही जाईना...

वास्कोत विक्रेत्यांचे पुन्हा पदपथावर अतिक्रमण : मुरगाव पालिका हतबल

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September, 11:50 pm
सुंभ जळेना, पीळही जाईना...

अर्ध्या अधिक रस्त्यावर करण्यात आलेले अतिक्रमण. (अक्षंदा राणे)

वास्को : येथील भाजी, फळे व इतर वस्तू विक्रेत्यांनी रस्त्यांवर अतिक्रमण करून मुरगाव पालिकेसमोर पुन्हा आव्हान उभे केले आहे. काही फळ विक्रेत्यांनी अर्धाअधिक रस्ता व्यापल्याने वाहनचालकांना व पादचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी मुरगाव पालिका व वाहतूक पोलीस विभाग गप्प आहे. वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांविरोधात कारवाई करण्याचे अधिकार वाहतूक पोलिसांना असताना, ते कारवाई का करत नाहीत, याबाबत आश्र्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
येथील भाजी, फळ व इतर वस्तू विक्रेत्यांनी पदपथ व रस्त्यांवर अतिक्रमण करू नये, यासाठी मुरगाव पालिकेने मध्यंतरी मोहीम हाती घेतली होती. काहीजणांचे साहित्य जप्त करण्यात आले होते. काहीजणांकडून दंड वसूल करण्यात आला होता. त्यामुळे रस्ते मोकळे झाले होते. सदर मोहीम चालूच राहणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तथापी नेहमीप्रमाणे मोहीम थंडावली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून संबधित विक्रेत्यांनी पुन्हा अतिक्रमण करून रस्ते ,पदपथ अडविले आहेत. त्यांच्याविरोधात मुरगाव पालिकेकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने ते विक्रेते अधिकाअधिक रस्ता व पदपथ व्यापत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे ग्राहकांना मार्केटामध्ये ये-जा करताना मोठी अडचण होते.
वाहतुकीला अडथळा
विक्रेत्यांनी आपल्या दुकानासमोर प्लास्टिक तसेच मोठमोठ्या छत्र्या उभारल्याने वाहनांना अडथळा होत आहे. मार्केटाकडे जाणाऱ्या बहुतेक रस्त्यांवर अतिक्रमणे झाल्याने रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यामुळे त्यातून वाट काढताना ग्राहक व वाहनचालक यांना कसरत करावी लागत आहे.