पिराची कोंड-डिचोली येथे ८ अवैध झोपड्यांवर ‘बुलडोझर’

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेची कारवाई


6 hours ago
पिराची कोंड-डिचोली येथे ८ अवैध झोपड्यांवर ‘बुलडोझर’

अतिक्रमणविरोधी कारवाई करताना नगरपालिकेचे पथक.
प्रतिनिधी। गोवन वार्ता
डिचोली : येथील पालिका हद्दीतील पिराची कोंड येथील आठ झोपडीवजा बेकायदा घरे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पालिकेने शुक्रवारी जमीनदोस्त केली.
या झोपडपट्टीच्या संदर्भात न्यायालयीन लढा सुरू होता. २०१८ साली​ या झोपड्या बेकायदा असल्याचा निवाडा देऊन उच्च न्यायालयाने त्या हटविण्याचा आदेश दिला होता. मात्र काही कारणांमुळे तीन वेळा कारवाई रखडली. अखेरीस पुन्हा उच्च न्यायालयाने डिचोली पालिकेला या संदर्भात आदेश दिल्यामुळे शुक्रवारी मामलेदार प्रवीण गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोली​स फौजफाट्यासह अतिक्रमणे हटविण्यासाठी पथक पिराची कोंड येथे दाखल झाले. मात्र रहिवाशांनी दोन तासांच्या मुदतीनंतरही झोपड्या खाली करण्यास नकार दिला. अखेरीस मामलेदारांच्या आदेशानुसार झोपड्या जेसीबी लावून पाडण्यात आल्या.