कुंकळ्ळी आयडीसीतील प्रदूषणकारी युनिट बंद

गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी


6 hours ago
कुंकळ्ळी आयडीसीतील प्रदूषणकारी युनिट बंद

प्रतिनिधी। गोवन वार्ता
मडगाव : कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील फिश मिल प्रक्रिया प्रकल्पामुळे प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले होते. आपत्कालीन व्यवस्थापनाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकार्‍यांनी कारवाईसंदर्भात आदेश जारी केला, तर गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने ‘कारणे दाखवा’ नोटीस जारी करत तत्काळ दोन युनिट बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाची पाहणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा यांच्यासह उपजिल्हाधिकारी गणेश बर्वे, गोवा प्रदूूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी यांनी केली होती. यावेळी प्रक्रिया न केलेल्या पाण्यामुळे जलस्रोत प्रदूषित होत असल्याचे निदर्शनास आले. यानंतर जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाला प्रदूषण करणार्‍या युनिटवर कारवाई करत २४ तासांत अहवाल देण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रदूषण नियंत्रण मंडळाने क्वालिटी फूडस व युनायटेड मरिन प्रॉडक्टस यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. २६ सप्टेंबर रोजी ११ वाजता साळगाव येथील कार्यालयात युनिट बंद का करू नये, याचे स्पष्टीकरण द्या. तोपर्यंत युनिट बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले.