सहकार कायद्यात बदल करण्यासाठी सूचना द्या!

मुख्यमंत्र्यांचे आवाहन : राज्य सहकारी बँकेचा ६० वा वर्धापदिन थाटात


20th September, 11:56 pm
सहकार कायद्यात बदल करण्यासाठी सूचना द्या!

कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत. सोबत सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, उल्हास फळदेसाई व इतर.

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : सहकारी सोसायटींमधील लोकांचे पैसे बुडू नयेत यासाठी सहकार कायद्यात बदल सुचवायचे असतील तर सहकार निबंधकांकडे सूचना द्याव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. राज्य सहकारी बँकेच्या ६० व्या वर्धापदिनानिमित्त शुक्रवारी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, उपाध्यक्ष पांडुरंग कुर्टीकर, निबंधक अरविंद बुगडे, नाबार्डचे संदीप धारकर व अन्य अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गेल्या काही वर्षांत सहकारी बँकेांमधील लोकांचे पैसे बुडण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा बँक किंवा संस्थांची नावे आज मी घेणार नाही. लोकांचे पैसे सुरक्षित राहावेत यासाठी सहकार कायद्यात वेळोवेळी बदल करणे आवश्यक असते. यानुसार आम्ही कायद्यात काही बदल केले आहेत. यापुढेही असे बदल करण्याची आमची तयारी आहे. सहकारी बँक, संस्था किंवा वैयक्तिक पातळीवर सहकार कायद्यात बदल करण्याबाबत सरकारला लेखी स्वरूपात सूचना द्याव्यात. यावर आम्ही नक्कीच विचार करू.
युवकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी बँकेने मदत करावी !
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, राज्य सहकारी बँकेने साठ वर्षांच्या कालावधीत अनेक चढ-उतार पाहिले. सरकारने वेळोवेळी केलेली मदत आणि ठेवीदारांचा विश्वास यामुळे बँक आज चांगल्या स्थितीत आहे. बँकेने युवकांना स्वयंपूर्ण बनवण्यासाठी मदत केली पाहिजे. सहकार क्षेत्रात तरुणांना आणण्यासाठी काम केले पाहिजे. फलोत्पादन, मासेमारी व्यवसायांत कोल्ड चेन असणे आवश्यक असते. बँकेने या क्षेत्रात सहकारी संस्था तयार होतील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
राज्य सहकारी बँकेने काळानुसार बदलणे आवश्यक
सध्या खासगी बँका चांगल्या सुविधा देत आहेत. राज्य सहकारी बँकेनेही काळानुसार बदलणे आवश्यक आहे. बँकेने सेवा देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास सरकारच्या काही योजना बँकेसोबत संलग्न करण्याचा नक्की विचार करू, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले.
देशाच्या जीडीपीमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा मोठा आहे. मात्र गोव्यात ही परिस्थिती नाही. सहकार क्षेत्राला चालना देण्यासाठी राज्य सहकारी बँकेने प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी बँकेच्या प्रत्येक शाखेने एक गाव दत्तक घेऊन तेथील दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत.
_ सुभाष शिरोडकर, सहकारमंत्री