वाळपईत आज भरणार ‘ग्राम न्यायालय’

न्यायनिवाडा ‘ऑन द स्पॉट’ : फिर्यादी, साक्षीदारांसह सर्वांचाच वाचणार वेळ


20th September, 11:59 pm
वाळपईत आज भरणार ‘ग्राम न्यायालय’

प्रतिनिधी। गोवन वार्ता
वाळपई : न्यायालयात वर्षानुवर्षे खटले प्रलंबित राहत असल्याने लोकांची फरफट होते. त्यात वेळ व पैसा वाया जातोच, शिवाय न्याय​ मिळायला विलंब होतो. मात्र आता ही समस्या दूर होणार आहे. ‘ग्राम न्यायालय’च्या माध्यमातून नागरिकांना थेट गावात न्याय मिळणार असून त्याचा श्रीगणेशा वाळपईतून शनिवारी होत आहे.
जिल्हा व सत्र न्यायालय उत्तर गोवा आणि उत्तर गोवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २१ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. येथे ग्राम न्यायालय आणि आदिवासी हक्कांवर कायदेशीर जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश आणि उत्तर गोवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष इर्शाद आगा ग्राम न्यायालयाचे उद्घाटन करतील. यावेळी सत्तरी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. यशवंत गावस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात अॅड. शिवाजी देसाई ‘विधी साहाय्य योजना’ या विषयावर, तर ‘राज्यातील आदिवासी समाज’ या विषयावर समाजकल्याण खात्याचे अधिकारी शशिकांत नार्वेकर माहिती देणार आहेत. आदिवासी समाजासाठी असलेल्या विविध योजना याबाबत समाजकल्याण खात्याचे अधिकारी भिंगो गावस माहिती देणार अाहेत.
ग्राम न्यायालय या उपक्रमाचा उद्देश दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांच्या कायदेशीर गरजा पूर्ण करणे हा आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात ग्राम न्यायालयाचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी दोन वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांमध्ये प्रथमश्रेणी न्यायाधीश, आवश्यक कर्मचारी असणार आहेत. संबंधित भागातील प्रकरणे तालुक्यातील सोयीच्या ठिकाणी हातावेगळी केली जाणार आहेत. यामुळे तक्रारदार, आरोपी, जामीनदार यांना प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहण्यासाठी लागणारा वेळ, पैसे वाचणार आहेत. परस्पर समन्वयातून खटला निकाली काढण्याबाबतही चर्चा करून प्रकरण निकाली काढण्यावर भर दिला जाणार आहे, असे कायदा खात्याचे अवर सचिव अमीर परब यांनी सांगितले.
दक्षिण गोव्यासाठी सांगे येथे कार्यालय
उत्तर गोव्यात वाळपई येथून सुरुवात होणारा ग्राम न्यायालय हा उपक्रम दक्षिण गोव्यातही लवकरच सुरू केला जाणार आहे. ग्राम न्यायालयाची संकल्पना राज्यात सर्वत्र राबवण्याचा निर्णय झाला आहे. दक्षिण गोव्यात सांगे येथे कार्यालय सुरू केले जाणार आहे.