पेजर स्फोटांमुळे मुस्लीम देशांत संताप

Story: विश्वरंग |
20th September, 10:20 pm
पेजर स्फोटांमुळे मुस्लीम देशांत संताप

लेबनॉनला मागील चार दिवसांपूर्वी पेजर तर कधी वॉकीटॉकी स्फोटांचा सामना करावा लागला. या स्फोटांसाठी लेबनीज गट हिजबुलने इस्रायलला जबाबदार धरले आहे. जगभरातील मुस्लिम देश या स्फोटाचा निषेध करत असून अनेक देशांनी यासाठी इस्रायलला लक्ष्य केले आहे. लेबनॉनमध्ये गेल्या दोन दिवसांपासून बॉम्बस्फोटांची मालिका सुरू आहे. पहिल्या दिवशी मंगळवारी दुपारी उशिरा पाच हजार पेजर्सचे स्फोट झाले, तर दुसऱ्या दिवशी वॉकीटॉकी आणि सोलर सिस्टीम पॅनलमध्ये स्फोट झाले. या स्फोटांमध्ये आतापर्यंत किमान ३५ जणांचा मृत्यू झाला असून ४,५०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींमध्ये इराण समर्थित लेबनीज गट हिजबुल या लढवय्यांचा समावेश आहे. या हल्ल्यांसाठी हिजबुलने इस्रायलला जबाबदार धरले आहे. लेबनॉनवरील अशा हल्ल्यांवर जगभरातून टीका होत आहे. मुस्लिम देशांमध्येही या हल्ल्यांचे तीव्र पडसाद उमटले आहेत.

मुस्लिमबहुल देश तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगन यांनी लेबनॉनमधील पेजर स्फोटांबद्दल दु:ख व्यक्त केले आणि या प्रदेशात संघर्ष वाढवण्याचे इस्रायलचे प्रयत्न अत्यंत धोकादायक असल्याचे म्हटले आहे. पेजर हल्ल्यात इराणचे लेबनॉनमधील राजदूत मोजतबा अमानी हेही जखमी झाले आहेत. पेजर स्फोटाबाबत इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान म्हणाले, इस्लामिक रिपब्लिक या घृणास्पद गुन्ह्याचा निषेध करते आणि लेबनीज सरकार आणि लोकांसाठी आपला पाठिंबा व्यक्त करते. आंतरराष्ट्रीय संघटनांनीही आपली जबाबदारी पार पाडावी.

इराकने लेबनॉनवरील 'इस्रायल हल्ल्याचा' निषेध केला असून पीडितांना मदत करण्यासाठी तातडीने वैद्यकीय मदत देऊ केली आहे. इराकचे पंतप्रधान मोहम्मद शिया अल-सुदानी यांनी लेबनॉनमध्ये इराकी वैद्यकीय आणि आपत्कालीन पथके तत्काळ तैनात करण्याचे आदेश दिले. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी इस्रायलचे नाव न घेता 'हल्ल्या'चा निषेध केला. येमेनच्या सशस्त्र दलांनी 'इस्त्रायली हल्ल्याला' भ्याड म्हणत लेबनॉनमधील हिजबुलसोबत एकता व्यक्त केली. येमेनचे उपसंरक्षण मंत्री ब्रिगेडियर अब्दुल्ला बिन आमेर यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये लिहिले की, हिजबुलला बदला घेण्याचा पूर्ण अधिकार आहे. येमेनची लेबनॉनशी असलेली एकजूट केवळ राजकीय परिस्थितीपुरती मर्यादित राहणार नाही, तर येमेन यापलीकडे जाऊन लेबनॉनला मदत करेल यावरही त्यांनी भर दिला. जॉर्डनचे परराष्ट्र मंत्री अयमान सफादी यांनी सांगितले की, इस्रायल अनेक आघाड्यांवर धोकादायक संघर्ष वाढवत आहे. इस्रायलने संपूर्ण पश्चिम आशियाला प्रादेशिक संघर्षाच्या उंबरठ्यावर ढकलल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सुदेश दळवी