बंदूक संस्कृती आणि राजकीय हिंसाचार

Story: विश्वरंग |
17th September, 11:08 pm
बंदूक संस्कृती आणि राजकीय हिंसाचार

अमेरिकेत गोळीबाराच्या घटनांमध्ये गेल्या ५० वर्षांत १४ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि दररोज सरासरी १०० लोक मारले जात आहेत. या हल्ल्यांमधून अमेरिकेतील नेतेही सुटलेले नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन, जेम्स गारफिल्ड, विल्यम मॅककिन्ले आणि जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली होती. आता पुन्हा एकदा या 'गन संस्कृती'ची झळ अमेरिकेला बसू लागली आहे. अमेरिकेत सध्या राजकीय हिंसाचार डोके वर काढत असल्याचे चित्र आहे.

७ जुलै २०२१ रोजी कॅरिबियन देश हैतीमध्ये राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईस यांची हत्या झाली होती. अमेरिकेपासून शेकडो मैल दूर असलेल्या हैतीमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या हत्येची कहाणी पुन्हा जिवंत झाली आहे. याचे कारण म्हणजे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि यंदा राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर पुन्हा एकदा हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. अमेरिकेची गुप्तहेर संस्था एफबीआयने या घटनेला पुष्टी दिली असून या प्रकरणात एका संशयिताला अटक करण्यात आली आहे.

याआधी १३ जुलैला पेन्सिल्व्हेनिया राज्यातील एका प्रचार सभेत ट्रम्प यांच्यावर हल्ला करून हत्येचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी ट्रम्प यांच्या चालवण्यात आलेली गोळी, त्यांच्या कानाला चाटून गेली होती. हा हल्ला सभेच्या ठिकाणाजवळ असलेल्या एका जागेच्या छतावरून करण्यात आला होता. २० वर्षांच्या थॉमस मॅथ्यू क्रूक्स नावाच्या हल्लेखोराने तेव्हा सिक्रेट सर्व्हिसच्या स्नायपरने १३० मीटर अंतरावरून ट्रम्प यांच्यावर गोळी झाडली होती.  मात्र आता पुन्हा एकदा ट्रम्प यांच्यावरील हल्ल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यावेळी फ्लोरिडा येथील वेस्ट पाम बीच येथील गोल्फ कोर्सवर ते गोल्फ खेळत होते. यावेळी झुडपात लपून बसलेल्या हल्लेखोर रायन रुथने एके-४७ ने ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पण, ट्रम्प यांच्या संरक्षणासाठी सज्ज असलेल्या सीक्रेट सर्व्हिस एजंट्सनी अखेरच्या क्षणी त्यांना वाचवले. मुळात ट्रम्प हे स्वतः अमेरिकेच्या बंदूक संस्कृतीचे मोठे समर्थक आहेत. २०१६ मध्ये त्यांनी एका मुलाखतीत रिव्हॉल्व्हर हे स्वसंरक्षणासाठी एक उत्तम शस्त्र असल्याचे कबूल केले होते. अमेरिकेत बंदूक खरेदीच्या संस्कृतीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

याचा परिणाम म्हणजे गेल्या ५० वर्षांत गोळीबाराच्या घटनांमध्ये १४ लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दुकानातून भाजीपाला, फळे मिळतात तशा बंदुका इथे मिळतात. ट्रम्प यांची ही गन पॉलिसी आता अमेरिकेसाठी आणि खुद्द ट्रम्प यांच्यासाठी आपत्ती ठरत आहे.

- गणेशप्रसाद गोगटे