नव्या पर्वातील विरोधी पक्षनेता !

भारतासारख्या लोकशाहीप्रधान खंडप्राय देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेता एवढा अपरिपक्व असू शकतो काय, असा प्रश्न राहुल गांधींची अमेरिकेतील वक्तव्ये ऐकल्यानंतर कोणालाही पडू शकतो. पण दुर्दैवाने आज ते वास्तव बनले आहे.

Story: विचारचक्र |
17th September, 02:14 am
नव्या पर्वातील विरोधी पक्षनेता !

लोकसभेतील विरोधी पक्षनेता कसा नसावा याचा विचार करण्याची संधी मागील पाच सहा दशकात तशी कोणालाही मिळाली नाही वा तो विचार करावा असेही कोणाला वाटले नाही. काँग्रेसपासून भाजपप्रणीत बरीच सरकारे देशात सत्तेवर आली आणि गेलीही पण त्या त्या काळातील प्रत्येक विरोधी पक्षनेत्यांनी आपापल्या क्षमतेनुसार काम करताना, या घटनात्मक पदास बऱ्यापैकी न्याय दिला. त्यामुळे किरकोळ वाद किंवा झालेले मतभेद याचा अपवाद सोडल्यास, एकाही विशिष्ट विरोधी पक्षनेत्याचे नाव घेता येणार नाही की ज्यांनी या पदावर असताना आपले कर्तव्य बजावताना कोणतीही कसर केली. लोकसभेतील आतापर्यंतच्या विरोधी पक्षनेत्यांच्या नावांची यादी नुसती नजरेखालून घातली, तर या सगळ्याच नेत्यांनी त्या पदावर राहून घटनेच्या चौकटीतच जे काम केले, सरकारविरुद्ध प्रचंड आकांडतांडवही केले, हे स्पष्टपणे जाणवते. नावेच घ्यायची झाली तर जगजीवन राम - यशवंतराव चव्हाण यांच्यापासून राजीव गांधी आणि शरद पवार आणि लालकृष्ण अडवाणीपासून अटल बिहारी वाजपेयी - सुषमा स्वराज यांच्यापर्यंत अनेकांची घेता येतील. काँग्रेस पक्षाचे आजचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचेही नाव या यादीत आहे, पण या सगळ्यांनीच लोकसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना कधीही या पदासाठी घालून दिलेल्या मर्यादांचे उल्लंघन कधी केल्याचा दावा कोणी करणार नाही. पण आज मात्र आपल्या लोकसभेतील विरोधी पक्षनेता नेमका कसा असू नये, याची चर्चा होताना दिसत आहे. यामागील कारणे सांगायची झाल्यास विद्यमान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी ताज्या अमेरिका भेटीत जे गुण मुक्तपणे उधळले, त्याची देता येतील. 

राहुल गांधी यांच्यावर विरोधी पक्षनेते पद कसे लादले गेले याचा इतिहास अगदी ताजा असल्याने त्यावर अधिक काही सांगायची गरज आहे असे वाटत नाही.  विरोधी पक्षनेते पद हे केवळ सरकारच्या विरोधातच नव्हे तर राष्ट्रविरोधातही बोलण्यासाठी मिळालेला अधिकृत परवाना आहे, असाच समज तर राहुल गांधी यांनी करून घेतला नाही ना, असे अमेरिका भेटीत त्यांनी जी मुक्ताफळे उधळली त्यावरून कोणालाही वाटावे. विरोधी पक्षनेता हा राष्ट्रविरोधी नेता असायला हवा काय, असाही विचार करायला लावणारी राहुल गांधी यांची ही अमेरिका भेट ठरली. साहजिकच त्यावरून राजकीय गदारोळ माजणे अपेक्षितच होते. त्यांच्याच पक्षातील अवघेच काही नेते आणि एखाद्या दुसऱ्या अन्य पक्षीय नेत्यांनीच राहुल गांधी यांची री ओढली पण सर्वसाधारणपणे राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील राष्ट्रविरोधी वक्तव्यांचे कोणी स्वागत केले, असे चित्र अजिबात दिसले नाही. त्यांच्या इंडी आघाडीतील बरेच पक्षही यापासून अलिप्तच राहिले. विदेशात जाऊन आपल्याच देशाची मजाक उडवणे, हे तसे स्वीकारार्ह नाहीच आणि त्यातच लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने हे सर्व करावे याची तर कोणी अपेक्षाही करणार नाही. पण राहुल गांधी यांनी अमेरिकेत जी विवादास्पद वक्तव्ये केली ती पाहता, मात्र विरोधी पक्षनेता कसा नसावा याचा विचार कोणी केलाच तर त्याचे आश्चर्य वाटायला नको. विरोधी पक्षनेता या नात्याने प्रथमच अमेरिका भेटीवर गेलेल्या राहुल गांधी यांनी तेथे केलेल्या वादग्रस्त आणि राष्ट्रविरोधी वक्तव्याची यादी तशी मोठी असून काँग्रेस जर त्यातून राजकीय लाभाची अपेक्षा करत असेल तर ती निश्चितच चुकीची म्हणता येईल. 

राहुल गांधी आपल्या काँग्रेस पक्षासाठी एक नवाच मार्ग शोधू लागले आहेत का, असेही त्यांच्या एकूण देहबोलीतून वाटू लागते. पण शिखांची पगडी आणि कडे यावरून त्यांनी केलेले वक्तव्य त्यांना  राजकीय लाभ मिळवून देईल का, याची शंकाच वाटते. सारासार कोणताही विचार न करता राहुल गांधी अमेरिकेत मोकाट विधाने करत सुटले खरे आणि काही प्रमाणात त्यांना प्रसिद्धीही मिळाली हे खरे असले तरी त्यामुळे होणारे नुकसान अधिकच असेल हे कालांतराने स्पष्ट होईल. शिखांच्याबाबतीत केलेले भडकावू वक्तव्य तर खलिस्तानवादी दहशतवादी पन्नू यांच्या दाव्याला बळकटी देणारे आहे आणि पन्नू यांनीही या वक्तव्याचे स्वागत केल्याच्या बातम्या येत आहेत. पंजाबात निदान राहुल गांधी आणि त्यांच्या काँग्रेसची यामुळे पुरती पंचाईत तर होऊ शकेलच पण त्याबरोबरच हरयाणात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही काही प्रमाणात त्याची किंमत मोजावी लागेल, यात संदेह नाही. हरयाणात आम आदमी पार्टीनेही काँग्रेसला हातभर दूरच ठेवल्याने त्यांचे काम अधिकच कठीण होऊ शकेल आणि अर्थातच भाजपलाच त्याचा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताच्या विरोधात सातत्याने विष ओकणारी अमेरिकन खासदार इलहान उमर यांची राहुल गांधींनी घेतलेली भेट आणि केलेली चर्चाही अशीच वादग्रस्त ठरली आहे. यावरूनही केंद्रातील भाजप सरकारने राहुल गांधींना पुरेपूर घेरले असून पुढील काही काळ तरी त्यावरून झालेला वाद संपेल, असे वाटत नाही.

राहुल गांधी येथेच थांबले नाहीत तर त्यांचे चीनप्रति असलेले प्रेमही उफाळून उतू लागले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवण्याच्या नादात आमचे शत्रुराष्ट्र असलेल्या चीनला त्यांनी प्रमाणपत्र देऊन टाकले. चीनने आमची सुमारे वीस हजार चौरस किलोमीटर क्षेत्रफळाची जमीन व्यापली असून मोदी त्यावर काही करू शकत नाहीत, असे विधान लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याने करावे याचे कोणालाही वैषम्य वाटावे. भारतासारख्या लोकशाहीप्रधान खंडप्राय देशाच्या लोकसभेतील विरोधी पक्षनेता एवढा अपरिपक्व असू शकतो काय, असा प्रश्न राहुल गांधींची अमेरिकेतील वक्तव्ये ऐकल्यानंतर कोणालाही पडू शकतो. पण दुर्दैवाने आज ते वास्तव बनले आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेता कसा असू नये याचे उदाहरण म्हणून आज राहुल गांधी यांच्याकडे आपण पाहू शकतो. विरोधी पक्षनेत्याकडून नेमकी कशाची अपेक्षा असते, हे याआधींच्या अनेक विरोधी नेत्यांनी दाखवून दिले आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्यासह अनेकांचा आदर्श घेता येईल पण राहुल गांधी यांना विरोधी पक्षनेत्याच्या जबाबदाऱ्या वेगळ्याच वाटतात. वैयक्तिक सचोटी आणि विश्वासार्हतेचा उच्च मापदंड राखणे हे खरे पाहता विरोधी पक्षनेत्याचे खरे काम आहे. पण आज हे चित्र दिसणे विरळ झाले आहे. या अपेक्षांची पूर्तता करून, विरोधी पक्षनेत्याने निरोगी लोकशाही सुनिश्चित करण्यात आणि सत्ताधारी पक्षाला एक मजबूत पर्याय प्रदान करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे अपेक्षित असते. पण आज हे चित्र अभावानेच पहायला मिळते. राहुल गांधी हे नव्या राजकीय पर्वातील विरोधी पक्षनेते आहेत. त्यांनी स्वीकारलेला मार्ग कितपत योग्य आहे, याचे उत्तर येणारा काळच देईल. 


- वामन प्रभू

(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून, राजकीय तसेच क्रीडा विश्लेषक आहेत)  मो. ९८२३१९६३५९