वाढते अपघाती मृत्यू चिंताजनक

केवळ रस्ते आणि त्यांची अवस्था यामुळे अपघात होतात असे म्हणणे चुकीचे ठरेल. वाहतूक नियमांचे पालन न होणे हेही यामागचे कारण असू शकते. बेशिस्त वाहन चालविणे, वेगमर्यादा न पाळणे अशीही कारणे असू शकतात.

Story: संपादकीय |
15th September, 10:51 pm
वाढते अपघाती मृत्यू चिंताजनक

शनिवारी राज्यात झालेल्या दोन अपघातांत चार जणांचे बळी जाणे, ही घटना अतिशय दुःखदायक आहे. संबंधितांच्या कुटुंबांवर कोसळलेल्या या संकटाने केवळ त्या गावांवरच शोककळा पसरली आहे असे नाही, तर राज्याला धक्का बसला आहे. प्रशस्त रस्ते तयार होत असताना अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने नेमकी चूक कोणाकडून घडते आहे, याचा विचार करणे गरजेचे आहे. ग्रामीण भागांत अपघातांत होणारी वाढ कशामुळे होत आहे, यावरही विचारमंथन व्हायला हवे. तुलनात्मकदृष्ट्या नागरी भागांतील अपघातांची संख्या कमी आहे. रस्त्यांची रचना चुकीची आहे का, काही ठिकाणचे रस्ते पुरेसे रुंद नाहीत का, खड्डे किती ठिकाणी पडले आहेत, ते बुजविण्यासाठी किती विलंब केला जात आहे, कोसळलेल्या दरडींची माती किती महिने त्याच अवस्थेत पडून राहिली आहे, याचा शोध सरकारी पातळीवर घेणे आवश्यक ठरले आहे. उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील ५,५०० किलोमीटर रस्त्यांपैकी ४,५०० किलोमीटर रस्त्यांची पाहणी सरकारने पूर्ण केली आहे. केवळ रस्ते आणि त्यांची अवस्था यामुळे अपघात होतात, असे म्हणणे चुकीचे ठरेल. 

वाहतूक नियमांचे पालन न होणे, हेही यामागचे कारण असू शकते. बेशिस्त वाहन चालविणे, वेगमर्यादा न पाळणे, पुरेशी खबरदारी न घेणे अशीही कारणे असू शकतात. मांद्रेतील घटना असो किंवा नानोड्यात झालेली दोन वाहनांची टक्कर असो, नेमकी कोणाची चूक होती हे तपासाअंती स्पष्ट होईलच, पण झालेली प्राणहानी वेदनादायक आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०२३ च्या तुलनेत २०२४ च्या सहा-सात महिन्यांत कमी अपघात झाले, मृत्यूंची संख्याही कमी होती, अशी माहिती उघड झाली असतानाच शनिवारच्या दोन अपघातांनी पुन्हा एकदा वातावरणात अस्वस्थता निर्माण केली आहे. नियमभंगाच्या दोन लाख चाळीस हजार तक्रारी पोलिसांनी या सहा महिन्यांत नोंदविल्या असल्याने वाहनचालक किती बेफिकिरीने वागतात, हे स्पष्ट होते.

 गोव्यातील रस्ता अपघातांची संख्या आणि त्या अपघातांत गेलेले बळी पाहून, हे राज्य मर्डर स्टेट बनल्याचे मत काही वर्षांपूर्वी तत्कालीन राज्यपालांनी व्यक्त केले होते. हे चित्र अद्याप बदललेले दिसत नाही, असे अलीकडची अपघाती मृत्यूंची संख्या पाहता दिसून येते. गोवा वाहतुकीसाठी सुरक्षित नाही, अशी प्रतिमा बनली तर पर्यटनदृष्ट्या हे हानिकारक ठरू शकेल. खरा प्रश्न आहे तो मानवी बळी जाण्याचा. युवावर्गातील वाहनचालक ज्या संख्येने अपघातात मृत्यू पावत आहेत, ते पाहता राज्यातील वाहतूक व्यवस्थाच नव्हे तर वाहनचालकाचे परवाने देणाऱ्या यंत्रणेचाही आढावा घेण्याची वेळ आली आहे, यात शंका नाही. कोणताही मृत्यू मग तो पादचाऱ्याचा असो किंवा वाहनचालकाचा, वृद्धाचा असो किंवा युवकाचा, पुरुषाचा असो किंवा महिलेचा, अशा घटनाच एवढ्या दुष्परिणाम करणाऱ्या असतात की, सारे कुटुंबच संकटात आणि दुःखात बुडून जाते. एखाद्या मृत्युमुळे कमावती व्यक्तीच निघून जाते. सारे कुटुंब रस्त्यावर येते. सकाळी फिरायला गेलेली व्यक्ती परत येईलच याची खात्री घरच्यांना वाटत नाही. चालत असताना कोणत्या तरी वाहनाने धडक देत पलायन केलेले असते. मुख्य मुद्दा उपस्थित होतो, तो वाहतुकीचे नियम पाळले जातात की नाही. अलीकडे नियम मोडण्यात अभिमान बाळगणारे वाढले आहेत. आपण स्वतःचेच नव्हे तर दुसऱ्यांचेही नुकसान करीत आहोत, याचे भान त्यांना नसते. नियमांबद्दल अज्ञान असण्यानेही अपघात होतात. छोट्या रस्त्यावरून मुख्य रस्त्यावर येणारे वाहन किती वेगाने आणि किती खबरदारीने चालवावे याबद्दल चालक अनभिज्ञ असल्याचे दिसते. दुसऱ्या वाहनाला मागे टाकून पुढे जाण्यात धन्यता मानणारे चालकही अपघातग्रस्त होतात. स्वतःचा किंवा दुसऱ्याचा प्राण घेतात. साईड लाईट दाखवून वळणारे कमीच, त्यातही अशी लाईट सतत चालूच राहिल्याने मागच्या वाहनचालकाची दिशाभूल होत असते याची जाणीव त्यांना नसते. नियमांचे पालन योग्य पद्धतीने झाल्यास अपघातांची संख्या निश्चितपणे कमी होऊ शकेल.

वाहतूक नियमांची माहिती नसलेले परवानाधारक चालक अनेक आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारे प्रशिक्षण देण्याची तरतूद सरकारने केलेली नाही. मध्यंतरी वाहन चालविण्याचा प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे संकेत तत्कालीन वाहतूक सचिवांनी दिले होते. फोंड्यात अशी जागा निश्चित करून विशिष्ट कालावधीचे प्रशिक्षण घेतल्याशिवाय परवाने दिले जाणार नाहीत, असे सूचित केले होते. त्याबद्दल सरकारी पातळीवर काहीही हालचाल दिसत नाही. मंत्री बदलले की योजना बदलतात. नको त्या गोष्टींना प्राधान्य मिळते असे दिसून येते. वाहन चालविणाऱ्यांना सर्वच नियम ठाऊक असायला हवेत, याबद्दल दुमत नसावे. रस्त्यावर आखलेल्या पांढऱ्या रेषांचा अर्थ किती वाहनचालक जाणतात, याची शंका वाटते. आपली लेन सोडून भरधाव चालणारी वाहने समोरून येणाऱ्या वाहनांवर धडकतात, त्यात काही वेळा मृत्यू होतात किंवा कोणीतरी जखमी होतो. साधे नियम पाळण्यातही दाखवण्यात येणारी बेफिकिरी जीवावर बेतू शकते.