जिल्ह्याची तहान भागवा, मग पाणी बाहेर न्या !

महाराष्ट्र

Story: राज्यरंग |
20th September, 12:10 am
जिल्ह्याची तहान भागवा, मग पाणी बाहेर न्या !

पापाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या लोकांना दिलासा देण्याच्या हेतूने राज्य सरकारने स्तुत्य पाऊल उचलले आहे. दुष्काळग्रस्त भागात जास्त पाऊस असलेल्या ठिकाणाहून पाणी नेण्याची योजना सरकारने आणली आहे. त्यात ठाणे, पालघरमधील अनुक्रमे उल्हास आणि वैतरणा उपखोऱ्यातील पाणी मराठवाडा प्रदेशातील गोदावरीच्या खोऱ्यात नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र याला काही लोकांनी विरोध दर्शवला आहे. जिल्ह्यातील काही भागात भीषण पाणीटंचाई आहे. आधी जिल्ह्याची तहान भागवा आणि मग पाणी बाहेर न्या, असे विरोध करणाऱ्यांचे म्हणणे आहे.

उल्हास नदी खोऱ्यातील ३४.८० टीएमसी, तर वैतरणा खोऱ्यातून १९.९० टीएमसी, असे एकूण ५४.७० टीएमसी अतिरिक्त पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवले जाणार आहे. त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी जलस्रोत विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यासाठी ६१ कोटी ५२ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. 

ठाणे जिल्ह्यातील बहुतेक शहरांना उल्हास नदीतून पाणी पुरवठा होतो. आंध्र, बारवी धरणांतून या नदीत पाणी सोडले जाते आणि ते ठिकठिकाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. त्यानंतर ते नागरी आणि औद्योगिक वापरासाठी पुढे पाठवले जाते. कर्जत, नेरळ, वांगणी, बदलापूर, कांबा, वरप, म्हारळ यांसारखी गावे आणि उल्हासनगर शहराच्या वेशीवर ही नदी वाहते. या नदीत मोठ्या प्रमाणावर सांडपाणी मिसळते. सोबतच बदलापूर औद्योगिक वसाहतीतून निघणारे औद्योगिक सांडपाणीही याच नदीत मिसळते. परिणामी दरवर्षी नदीत मोठ्या प्रमाणावर जलपर्णीची निर्मिती होते. शहरातील विविध नाले आजही उल्हास नदीत थेट मिसळत आहेत. मात्र त्यावर ठोस उपाययोजना केलेली नाही. नदी किनारी, पात्रात अतिक्रमण केल्याचेही समोर आले आहे. याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष झाले आहे. प्रदूषण रोखण्यासाठी अनेक निर्णय घेतले गेले. ‘चला जाणू या नदीला’ या उपक्रमातही या नदीचा समावेश होता. मात्र हा 'फार्स' ठरला. त्यामुळे प्रदूषण कायम आहे. जलपर्णीमुक्त, प्रदूषणमुक्त नदी करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. नदीत मिसळणारे नाले बंद करून त्याची प्रक्रिया करत ते पाणी पुनर्वापरासाठी वळवण्याचीही मागणी होत आहे. नदी पात्रातील अतिक्रमण रोखून नदीतील गाळ काढणे, किनारे सुस्थितीत करणे अशाही मागण्या होत आहेत. 

ठाणे जिल्हा सर्वाधिक नागरीकरण होत असलेला जिल्हा म्हणूनही ओळखला जातो. त्यामुळे जिल्ह्याची पाण्याची तहान मोठी असून भविष्यातील पाण्याची तहान भागवण्यासाठी तातडीने पाऊले उचलून नवी धरणे उभारण्याची गरज आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील शहापूर, मुरबाडसारख्या तालुक्यांमध्ये जानेवारी महिन्यापासूनच पाणी टंचाई जाणवू लागते. शहापूरसारख्या तालुक्यात भीषण टंचाई पाहायला मिळते. या प्रश्नावर अद्याप ठोस तोडगा निघालेला नाही. असे असताना ते पाणी जिल्ह्यातच वळवण्याची मागणी आता होऊ लागली आहे. आधी आपली तहान भागवा मग पाणी बाहेर न्या, अशी भूमिकाही नागरिकांकडून घेतली जात आहे.

प्रदीप जोशी