गोव्यातील अनंत पूजन

सावईवेरे या गावात असलेल्या अनंताच्या शतकोत्तर इतिहासाचा वारसा लाभलेल्या मंदिराद्वारे शेषरुपी अनंताच्या पूजनाची कल्पना येते. मृण्मयी सातेर आणि रवळनाथाच्या भूमीत मदनंत देवाच्या आगमनामुळे गोव्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक संचितात नेत्रदीपक भर पडलेली आहे.

Story: विचारचक्र |
17th September, 11:18 pm
गोव्यातील अनंत पूजन

अरबी सागराशी असंख्य नदीनाल्यांच्या जाळ्यांनी गोव्याची भूमी पूर्वापार जोडलेली असल्याकारणाने सनातन काळापासून देश विदेशातून इथे नाना संस्कृती, धर्म, प्रवृत्ती, परंपरांचा झालेला समन्वय अनुभवायला मिळतो. भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीच्या दहा दिवशी येणारे अनंत चतुर्दशीचे व्रत शैव - वैष्णव परंपरांच्या समन्वयाबरोबर कधीकाळी या भूमीत नांदणाऱ्या नाग संस्कृतीच्या प्रभावाचे दर्शन घडवत असते. हडप्पा आणि मोहिंजोदारो येथे सिंधू संस्कृतीत नाग प्रतिमा आढळलेल्या असून, त्यातून नागपूजन‌ाच्या परंपरेचा प्रत्यय येतो. फोंडा महालाला लाभलेले अंत्रुज हे नाव अनंत ऊर्जा शब्दांशी संबंधित असल्याचे मानले जाते. या महालातल्या सावईवेरे या गावात असलेल्या अनंताच्या शतकोत्तर इतिहासाचा वारसा लाभलेल्या मंदिराद्वारे शेषरुपी अनंताच्या पूजनाची कल्पना येते. मृण्मयी सातेर आणि रवळनाथाच्या भूमीत मदनंत देवाच्या आगमनामुळे गोव्याच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक संचितांत नेत्रदीपक भर पडलेली आहे. पाषाणात शेषशयनावर पहुडलेल्या श्रीविष्णूची लक्ष्मीसह कोरलेली मूर्ती गंधपूजनाद्वारे विलोभनीय साज धारण करते. मांडवी नदीच्या एकेकाळी गज‌बजलेल्या प्राचीन जल‌मार्गावर डाव्या काठावर वसलेल्या वेरेत मुस्लिम धर्मिय तांडेल पिराने अनंताची मूर्ती आणल्याची लोकश्रद्धा पिढ्यान‌पिढ्यांपासून प्रचलित आहे. चंदनाच्या सान्निध्यात श्री अनंताची पाषाणी मूर्ती नौकेतून वेरेत आली आणि श्रीविष्णूच्या इच्छे‌मुळे ती या गावात स्थायिक झाली आणि माडपोफळींच्या कुळागरांनी नटलेल्या या भूमीच्या धार्मिक आणि सांस्कृतिक अभिवृध्दीत भर घालण्यास कारणीभूत ठरली. मुलतः अनंत हे शेषाचे नाव असून, तो आपल्या सहस्र फणांपैकी एका फणेवर पृथ्वी धारण करतो आणि त्याच्या कपाळातून रुद्र अकरा रुपांनी प्रकट होतो, असे मान‌ले जाते. उपनिषदात ब्रह्म हे सत्य, ज्ञान व अनंत असल्याचे म्हटलेले आहे.

गोव्यात ज्या ठिकाणी अनंताचे मंदिर वसलेले आहे, तेथील शेषशायी अनंताची मूर्ती कुठून आली, हे जरी निश्चित सांगता येत नसले तरी भारतातील श्री अनंताचे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र केरळातल्या थिरुअनंतपूर आणि या तीर्थक्षेत्राचे मूळ स्थान केरळ आणि कर्नाटक सीमेवर असलेल्या कासरगोडातल्या कुम्बला शहरापासून काही अंतरावरच्या नायकाय येथील अनंतपुरात असल्याने, ही परंपरा दक्षिणेवरून आली असावी. कासरगोडातल्या अनंतपूरातली शेषशायी अनंताची मूर्ती आणि मंदिर सावईवेरेच्या मंदिरासारखे तलावात वसलेले आहे. कर्नाटकातल्या उडपीजवळच्या कारकल तीर्थक्षेत्री शेषशायी अनंताची सुंदर कोरीव कामाने युक्त मूर्ती असून, पूर्वी ही मूर्ती नेल्लीकार तळ्यात सापडली होती. या मूर्तीतल्या शेषशायी अनंताच्या नाभीकमळातून प्रकट झालेल्या बह्मदेवासोबत श्री विष्णूच्या चरणकमलाशी श्रीदेवी आणि भूदेवी चित्रित केलेली आहे. गोव्यात‌ल्या अनंताच्या मूर्तीच्या रेखीव शिल्पातून प्रेरणा घेऊन इथल्या च्यारी कारागिरांनी शेषशायी अनंताची जी काष्ठशिल्पे कोरली होती, त्याचे दर्शन गोवा राज्य पुराण वस्तू संग्रहालयात होते.

गोव्यात वैष्णव संप्रदायाच्या भक्तीपरंपरेचा विलक्षण प्रभाव पडलेला असून, त्यामुळे शेषशायी अनंताच्या पूजनामुळे भाद्र‌पदात अनंतचतुर्दशीच्या व्रताचा प्रसार झाला असावा. गोव्यात माध्व वैष्णव संप्रदायातल्या सारस्वतांत त्याचप्रमाणे कऱ्हाडे ब्राह्मणांत तर दोडामार्गातल्या हेवाळेत क्षत्रिय देसाई कुटुंबात अनंतचतुर्दशीच्या व्रताची परंपरा पहायला मिळते. ठिकठिकाणी कुळागरात स्थायिक झालेल्या बखले, नाटेकर, साधले, धोंड कुटुंबियांत मोठ्या भक्तीभावाने आणि उत्साहात हे व्रत साजरे केले जाते. सुर्ला गावातल्या कडचाळ येथील नाटेकर कुटुंबात चौदा गाठींचा पवित्र दोरा साखळी येथे वास्तव्यास असलेल्या मुस्लिम धर्मियांकडून आणला जातो आणि दर्भापासून तयार केलेल्या सात फ‌णांची प्रतिकृती असणाऱ्या नागाची पूजा अनंतचतुर्दशीला केली जाते. आपल्या प्रार्थनेला श्री अनंत देव प्रसन्न झाला आणि म्हणून त्याच्याविषयी कृतज्ञता अनंतचतुर्दशीला व्यक्त केली जाते.

ख्रिस्तपूर्व कालखंडापासून गोव्यावर सुमेरियन धर्म आणि संस्कृतीचा प्रभाव पडला होता, असे प्रतिपादन अनंत धुमे यांनी आपल्या गोव्याच्या सांस्कृतिक इतिहास विषयक ग्रंथात केलेले आहे. सुमेरियन संस्कृतीतल्या देवदेवतांतून इथल्या संस्कृतीवर दृष्टीस पडणाऱ्या विविध संचितांचा शोध घेताना, त्यांना सावईवेरे आणि परिसरातल्या मंदिरात त्यांचा प्रभाव जाणवला. सावईवेरेतील श्री अनंताच्या देवस्थानावर आणि तेथे प्रचलित असलेल्या काही विधी, परंपरांवर सुमेरियन संस्कृतीशी निगडित अनुबंध उल‌गडून दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. शेषशायी अनंताचे मूर्तीरूप शैव, वैष्णव संप्रदा‌यांच्या प्रभावातून विकसित पावलेले आहे. महाभारतात अनंताचा संदर्भ‌ आढळत असून, श्रीकृष्णाने त्याला आपली विभूती मानलेली आहे. प्राचीन शिल्पकृतीत नागराज बहुधा अर्धसर्प व अर्धमानव अशा स्वरुपात दाखवलेला आहे. मूर्ती वर्णनात अनंताला चतुर्भूज, अनेक फणा, मधल्या फणेवर पृथ्वीदेवतेची मूर्ती, उजव्या हातात कमळ व मुसळ, डाव्या दोन हाती फाळ व शंख अशा स्वरुपात सांगितलेला आहे. अनंतनागाचे मूर्तिकलेच्या दृष्टीने संकर्षण आणि बलराम यांच्याशी साम्य दिसते. शेषशायी विष्णूला मूर्तिस्वरुपात दाखवताना संपूर्णपणे सर्परूपात चित्रित करतात. 

कुडणेत अर्धमानव अणि अर्धसर्प स्वरूपात मूर्ती असून, लोलयेतही श्रीविष्णूच्या मंदिरात अशीच लक्षवेधक मूर्ती आहे. त्यांचा संबंध अनंताच्या पूजन परंपरेशी असला पाहिजे. गोव्यात अनंतचतुर्दशीचे व्रत शेकडो वर्षांच्या इतिहासाची उज्ज्वल परंपरा असणाऱ्या पणजीतील म्हामाय कामतांच्या कुटुंबात आहे. परंतु या दिवशी त्यांच्याकडे पूर्वापार अस‌लेल्या शंखाची विधियुक्त पूजा करण्याची परंपरा आहे. देशविदेशाशी व्यापारी संबंध असणाऱ्या म्हामाय कामतांच्या घरी प्रचलित व्रत आणि त्यानिमित्त होणारे शंखाचे पूजन वैशिष्ट्यपूर्ण असेच आहे. 'कोंग्याचे फेस्त' या नावाने संपन्न होणाऱ्या या व्रताला उत्सवाचे स्वरूप प्राप्त होते. यावेळी या प्रासादतूल्य ऐतिहासिक वास्तूत शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी भाविक आवर्जुन उपस्थिती लावतात. सागरी शंखाच्या रुपात संपन्न होणारी अनंतचतुर्दशीच्या व्रताची परंपरा आणि अन्य कुटुंबात प्रचलित पूजन यातून गोव्यातल्या वैविध्यपूर्ण श्री अनंताच्या स्वरूपाचे दर्शन घडते. सागरात शेषशायी अनंत स्वरूपाचे मूर्ती शिल्पातली निर्मिती गोव्याच्या विलोभनीय संस्कृतीचा साक्षात्कार घडवते.


- राजेंद्र पां. केरकर

(लेखक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते 

असून पर्यावरणप्रेमी आहेत.), मो. ९४२१२४८५४५