केजरीवालांची अग्निपरीक्षा

केजरीवाल मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे काही प्रमाणात हरयाणाच्या निवडणुकीत त्यांना लक्ष घालणे सोपे जाणार आहे. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांमध्ये आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला केला आहे.

Story: संपादकीय |
17th September, 11:06 pm
केजरीवालांची अग्निपरीक्षा

आम आदमी पक्ष. २०११ मधील भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून मूर्तस्वरुप घेत स्थापन झालेला राजकीय पक्ष. नव्या विचारांचा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात उभा राहणारा पक्ष म्हणून देशातील जनतेने सुरुवातीच्या काळात ‘आप’कडे मोठ्या आशेने पाहिले. गेल्या बारा वर्षांमध्ये आम आदमी पक्षानेही देशभर जनतेचा विश्वास संपादन करण्यासाठी अनेक उपक्रम राबवले. दिल्ली, पंजाबसारख्या राज्यांमध्ये सत्ता स्थापन केली. गुजरात, गोवासारख्या राज्यांमध्ये विधानसभेत आपले आमदार पाठवले. अवघे बारा वर्षे वयोमान असलेल्या या राजकीय पक्षाने देशातील राजकारणात आज आपले महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. भाजपच्या विरोधात एकत्र आलेल्या राजकीय पक्षांच्या इंडिया गटात आम आदमी पक्षाचे आणि विशेषत: अरविंद केजरीवाल यांचे मोठे स्थान आहे. भलेही या बारा वर्षांमध्ये पक्षाला भगदाड पडण्याचे प्रसंग अनेकदा आले. पक्षाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून पक्षाच्या नेत्यांवर, केजरीवाल यांच्यावर हेकेखोरपणाचे आरोप केले असले, तरीही पक्षाची लोकप्रियता कमी झालेली नाही. दोन राज्यांमध्ये सरकार आणि दोन राज्यांच्या विधानसभांत पक्षाची उपस्थिती आहे. लोकसभा आणि राज्यसभेतही प्रतिनिधी पाठवले. ज्या दिल्लीवर कब्जा करण्यासाठी भाजप आपली सर्व ताकद पणाला लावते, त्या दिल्लीची सत्ता आम आदमी पार्टीने सलगपणे आपल्या हाती ठेवली आहे. भाजपने सर्व प्रकारचे प्रयत्न करूनही आम आदमी पक्षाला तेथून हटवणे शक्य झालेले नाही. शेवटी मद्य धोरणाच्या कथित घोटाळ्याचा आधार घेत पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तसेच त्यांचे जुने सहकारी आणि पक्षातील दुसऱ्या क्रमांकाचे नेते मनीष सिसोदिया यांना तुरुंगात टाकण्यात आले. कुठल्याच दबावाला बळी पडून केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडले नाही. तुरुंगात राहूनच दिल्लीचे काम पाहिले. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी लगेच आपण मुख्यमंत्रिपद सोडणार, अशी घोषणा केली आणि चर्चा सुरू झाली ती पुढील काही काळासाठी त्यांचा उत्तराधिकारी म्हणून कोण येणार याची. दोन दिवस वेगवेगळ्या नावांची चर्चा होती. भाजपने आपल्यावर भ्रष्टाचाराचा शिक्का मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे लोकांमध्ये पुन्हा जाऊन निवडून येण्याची घोषणा केजरीवाल यांनी केली. केजरीवाल ज्या कारणामुळे राजीनामा देत आहेत, ते पाहता मनीष सिसोदिया यांना मुख्यमंत्रिपद दिले जाणार नाही हे स्पष्ट होते. या दोघांच्या अनुपस्थितीत दिल्लीत चांगले काम केलेल्या आतिशी यांना आम आदमी पक्षाने बक्षिसी दिली आहे. आतिशी यांच्या रुपाने दिल्लीला आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात तिसऱ्यांदा महिला मुख्यमंत्री मिळणार आहे.

हरयाणामध्ये सध्या विधानसभा निवडणूक आहे. त्यानंतर महाराष्ट्र, दिल्लीत निवडणुका होतील. केजरीवाल मुख्यमंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यामुळे काही प्रमाणात हरयाणाच्या निवडणुकीत त्यांना लक्ष घालणे सोपे जाणार आहे. त्यामुळे एका अर्थाने ते तुरुंगातून बाहेर आल्याचा पक्षाला फायदाच होऊ शकतो. महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाली तर तिथेही केजरीवाल यांना काम करता येईल. मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देऊन केजरीवाल यांनी दिल्लीतील मतदारांमध्ये आपली प्रतिमा स्वच्छ असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केला केला आहे. जनता सांगत नाही, तोपर्यंत पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसणार नाही असे म्हणत केजरीवाल यांनी जनतेच्या हाती आपले भवितव्य सोपवले आहे. एवढा मोठा राजकीय निर्णय घेऊन जोखीम पत्करण्यासाठीही धाडस लागते. केजरीवाल यांनी हे धाडस दाखवले आहे. दिल्लीतील जनतेला हे धाडस पसंत पडले तर तिथले मतदार त्यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवतील. आतिशी यांच्यासारख्या नेत्याची मुख्यमंत्रिपदी केलेली निवडही केजरीवाल यांच्या फायद्याची ठरू शकते. उच्चशिक्षित आणि लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या आतिशी यांना संधी देऊन केजरीवाल यांनी जनतेच्या मनात आपले स्थान मजबूत केले आहे. देशभर भाजप विरोधी पक्षांच्या मुळावर उठलेला असताना अशा राजकीय वातावरणात मुख्यमंत्रिपदाचा त्याग करून अग्निपरीक्षा देण्याची तयारी करणे हे केजरीवाल यांच्या पक्षाला दिल्लीतच नव्हे, तर इतर ठिकाणीही फायद्याचे ठरू शकते असे राजकीय जाणकारांना वाटते. त्यामुळे केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपद सोडणे आणि आतिशी यांच्याकडे सूत्रे देणे या गोष्टीचा फायदा निवडणुकीत आम आदमी पक्षालाच होऊ शकतो.