समन्वयाच्या अभावामुळेच रस्त्यांची दुरवस्था

Story: अंतरंग |
18th September, 09:56 pm
समन्वयाच्या अभावामुळेच रस्त्यांची दुरवस्था

राज्यात दिवसेंदिवस अपघाती बळींचे प्रमाण वाढत आहे. एकाच दिवशी अनेक ठिकाणी अपघात होऊन अनेकांचे मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. गेल्या शनिवारी मांद्रे व नानोडा येथे अपघात होऊन चार जाणांचे बळी गेले. या अपघातानंतर रस्त्यांवरील खड्डे व त्यांच्या दर्जाची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. रस्ते तसेच इतर पायाभूत सुविधांची कामे करण्यात राज्य अग्रेसर आहे. सर्व रस्त्यांची कामे झालेली असली तरी त्यांच्या दर्जाचे काय? असा प्रश्न पडतो. पणजीसह सर्व रस्त्यांवर पडलेले खड्डे अद्याप बुजवलेले नाहीत. स्मार्ट सिटीची कामे पूर्ण झालेली असली तरी रस्ते पूर्वीसारखे गुळगुळीत झालेले नाहीत. रायबंदरच्या रस्त्यांची दुरुस्ती सुद्धा स्मार्ट सिटीच्या कामाअंतर्गत झालेली आहे. रायबंदरच्या रस्त्यांवरून वाहने चालविताना चालकांना कसरत करावी लागते. या कसरतीत अपघात घडण्याची शक्यता मोठी असते. या रस्त्यावर खड्डे आहेतच, शिवाय काही ठिकाणचे डांबरही उखडलेले आहे. यामुळे संतप्त झालेल्या रायबंदरवासीयांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. 

सध्या सार्वजनिक बांधकाम खाते मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे आहे. विधानसभा अधिवेशनात आमदारांनी रस्त्यांच्या निकृष्ट कामाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यानंतर लागलीच मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याची बैठक घेत अभियंत्यांना धारेवर धरले. निकृष्ट काम करणाऱ्या कंत्राटदारांना नोटिसा पाठविण्यात आल्या तर अभियंत्यांवरही कारवाईचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. रस्त्यांवर पडणारे खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात ही दरवर्षीची समस्या आहे. 

या वर्षी मुसळधार पडलेल्या पावसामुळे खड्ड्यांचे प्रमाण नेहमीपेक्षा अधिक आहे. पावसातही रस्ते कसे गुळगुळीत राहतील, याचा विचार सरकार वा अभियंत्यांनी करायला हवा. रस्त्यावर पाणी साचून राहिले तरी तेथे खड्डा निर्माण होणार नाही, याची दक्षता ​अभियंते व कंत्राटदारांनी घ्यायला हवी. अपघात घडण्यामागे खड्डे व निकृष्ट रस्ते हेही एक कारण आहे. तसेच रस्ते दुरुस्त केले की जलवाहिनी किंवा वीजवाहिनी घालण्यासाठी ते पुन्हा खणले जातात. रस्ते खणले की पूर्वीपेक्षा ते खराब होतात. विविध खात्यांमध्ये रस्ते किंवा गटारांची कामे करताना समन्वय असायला हवा. खात्यांमध्ये समन्वय नसल्याने रायबंदर रस्त्यांची फार दुर्दशा झालेली आहे. समन्वयाचा अभाव हेसुद्धा रस्त्यांच्या दुरवस्थेमागील एक कारण आहे.

- गणेश जावडेकर