गडकरींच्या वक्तव्यामागे कोणाचा ‘हात’?

गडकरी कार्यक्षम, बोलके आहेत म्हणून विरोधकांना ते जवळचे वाटतात. मात्र त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मोदींना शह देण्याचा विरोधकांचा हेतू लक्षात यायला वेळ लागत नाही. गडकरींचा राजकारणातील अनुभव पाहता, याची जाणीव त्यांना निश्चितपणे आहे.

Story: विचाराचक्र |
18th September, 10:30 pm
गडकरींच्या वक्तव्यामागे कोणाचा ‘हात’?

भाजपचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देशातील राजकारणात नेहमीच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत राहिलेले एकमेव महाराष्ट्रीय नेते ठरले आहेत. तसे पाहता, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली प्रतिमा राष्ट्रीय नेता म्हणून तयार करण्यात कोणतीच कसर बाकी ठेवली नाही, पण अलीकडे ते केवळ महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राजकारण करतात. विरोधकांची देश पातळीवर इंडी आघाडी करण्यात त्यांनी स्वारस्य दाखवले होते, तथापि महाराष्ट्रातच एवढ्या मोठ्या घटना, पक्षांतरे होत राहिली की त्यांना देशाच्या राजकारणाकडे लक्ष द्यायला सवड मिळाली नाही. पक्षासाठी राज्य सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर आली. पुतण्या अजित पवार पुन्हा परतण्याचे संकेत मिळत असल्याने कदाचित त्यांच्याकडे पक्ष सोपवून ते निवृत्त होतील. कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे राष्ट्रीय पातळीवरचे राजकारण सोपविले जाईल, असे वाटते. एकंदरित पवार कुटुंबीय राज्यावर लक्ष केंद्रित करत असतानाच देश पातळीवर भासणारी मराठी नेत्याची उणीव नितीन गडकरी भरून काढत असल्याचे दिसून येते. गडकरी तीन वेळा नागपूर लोकसभा मतदारसंघातून निवडून येऊन केंद्रातही मंत्री बनले. भाजपसारख्या देशव्यापी पक्षात त्यांना मानाचे स्थान जसे आहे, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशीही त्यांची जवळीक आहे. त्यामुळे अलीकडे त्यांनी केलेले एक विधान देशात चर्चेचा विषय बनले आहे. 

२०२४ च्या निवडणुकीदरम्यान मला एका ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्याने पंतप्रधानपदासाठी समर्थन देण्याची ऑफर दिली होती, असे गडकरी यांनी नागपूर येथील पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात म्हटल्यावर अनेकांच्या भुवया उंचावल्या. गडकरी यांना हे आताच सांगायची गरज होती का, येथपासून त्यांचे नाव हेतूपूर्वक पुढे आणले जात आहे, असे राजकीय विश्लेषक म्हणू लागले आहेत. गडकरी यांनी विरोधकांमध्ये नव्याने उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न का करावा अथवा भाजपमध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासारखे का बोलावे, असे प्रश्न विचारले जात आहेत.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर झाल्यावर, त्यात नितीन गडकरी यांचे नाव न आल्यामुळे विरोधकांनी त्यांना डावलण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त केला होता. खरे तर भाजप उमेदवारांविषयी विरोधकांना चिंता करण्याचे कारण नव्हते. असे असले तरी नरेंद्र मोदी यांना पक्षांतर्गत शह देऊ शकणारा नेता म्हणून काँग्रेससह विरोधी पक्ष त्यांच्याकडे पाहतात. गडकरी यांच्याविषयी त्यांचे प्रेम उतू जात असते, तर त्यांना बिनविरोध निवडण्यात आले असते. गडकरी कार्यक्षम आहेत, बोलके आहेत म्हणून विरोधकांना ते जवळचे वाटतात. मात्र त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवून मोदी यांना शह देण्याचा विरोधकांचा हेतू लक्षात यायला वेळ लागत नाही. गडकरी यांचे राजकारणातील अनुभव पाहता, याची जाणीव त्यांना निश्चितपणे आहे. काँग्रेस पक्षाची मदत घेऊन मोदी यांना टक्कर देण्याचा वेडेपणा ते कधीच करणार नाहीत, याची भाजपला खात्री आहे. असे असतानाही, मला पंतप्रधानपदाची ऑफर होती असे म्हणत त्यांनी आपली महत्त्वाकांक्षा उघड केली असे म्हणायचे का? गडकरी यांनी अशी कोणतीही आपली इच्छा नसल्याचे स्पष्ट केले आहे. राजकीय विश्लेषकांना यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात दिसतो आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्या वेळी पंतप्रधान झाले असले तरी ते भाजपला बहुमत मिळवून देऊ शकलेले नाहीत. याचा विचार करता नेतृत्वबदल करण्याचा संघाचा इरादा आहे, असा निष्कर्ष राजकीय पातळीवर काढला जात आहे. पुढील वर्षी मोदी वयाची ७५ वर्षे पूर्ण करतील, त्यावेळी नेताबदल करण्याची ही पूर्वतयारी तर नसेल ना, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. 

मोदी यांनी आपल्या कार्यकाळात संघाच्या धोरणानुसार अनेक योजना, प्रकल्प राबविले असे म्हटले जाते. वैयक्तिक लाभासाठी त्यांना सत्ता राबवायची नाही, कारण त्यांना कुटुंबच नाही. मग तरीही संघ आता अचानक गडकरींचे नाव पुढे आणत असेल, ही शक्यता कमीच आहे. मोदी स्वतंत्रपणे निर्णय घेतात, सल्लामसलत करीत नाहीत असा ठपका त्यांच्यावर ठेवला जात असेल तर जनता तो मान्य करेल असे वाटत नाही. तसा आक्षेप संघातर्फे घेतला जाईल, असे दिसत नाही. सरसंघचालकांनी अलीकडे दोन-तीन वेळा अप्रत्यक्षपणे मोदी यांना कानपिचक्या दिल्या असे म्हटले जाते. त्याचा थेट संबंध नेताबदलाकडे जोडण्याची घाई विरोधकांना झालेली दिसते. यास्तव गडकरी यांच्या पंतप्रधानपदाच्या मुद्याचा वापर केला जात असावा.

गडकरी काँग्रेसचे सहकार्य घेतील, असे भाजप कार्यकर्त्यांना स्वप्नातही वाटणार नाही. ज्येष्ठ नेते जगजीवनराम यांनी आणीबाणीचे पाऊल पसंत न पडल्याने १९७७ नंतर काँग्रेसमध्ये बंड केले होते, त्यांचा धडा गडकरी यांनी गिरवावा, असा सल्ला ठाकरे शिवसेनेचे बोलके प्रवक्ते संजय राऊत यांनी दिला आहे. अर्थात त्यांचा सल्ला कोणी गांभीर्याने घेत नाही. विरोधकांजवळ तगडे नेते असताना गडकरी यांना आयात करण्याची गरज वाटत नाही, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या महिला प्रवक्त्याने दिली आहे. अशा वातावरणात गडकरी कोणताच पक्षविरोधी निर्णय घेतील असे वाटत नाही. संघाशी संबंध जोडून हा डाव खेळला जात असल्याचा काही राजकीय निरीक्षकांचा अंदाजही बरोबर नाही. नेतेबदल योग्यवेळी आणि योग्य व्यक्तीच्या निवडीनेच होईल, त्यासाठी जनता दल (यू) व तेलगू देसम या घटक पक्षांशी विचारविनिमय करावा लागेल, हे भाजप नेत्यांना कळत नाही असे म्हणता येणार नाही. नितीन गडकरीच नव्हे, तर अमित शहा, योगी आदित्यनाथ, हेमंत विस्व सर्मा आदी नेते प्रतीक्षा करीत नसतील असे कोणीही म्हणणार नाही. भाजपमध्ये दुही माजवण्याची संधी म्हणून अन्य पक्ष गडकरींच्या वक्तव्याचा उपयोग करीत असतील, तर त्यात त्यांची फसवणूक होण्याचीच अधिक शक्यता आहे.


- गंगाराम केशव म्हांबरे

(लेखक पत्रकार असून विविध 

विषयांवर लेखन करतात)

मो. ८३९०९१७०४४