विराट विश्वविक्रमापासून केवळ ५८ धावा दूर

Story: क्रीडारंग |
17th September, 02:10 am
विराट विश्वविक्रमापासून केवळ ५८ धावा दूर

भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. मात्र पहिल्याच सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीला एक मोठा विक्रम खुणावत आहे. या विक्रमाद्वारे कोहली सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार आहे. कोहलीला इतिहास रचण्यासाठी फक्त ५८ धावांची आवश्यकत आहे.

५८ धावा केल्यानंतर कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा पूर्ण करेल. तो केवळ या आकड्याला स्पर्श करणार नाही, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २७ हजार धावा करणारा फलंदाज बनणार आहे. सध्या हा विक्रम तेंडुलकरच्या नावावर आहे. तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या ६२३ डावांमध्ये २७ हजार धावा केल्या तर कोहली आतापर्यंत ५९१ आंतरराष्ट्रीय डाव खेळला आहे. अशा परिस्थितीत, तेंडुलकरचा हा विक्रम मोडण्यासाठी कोहलीकडे पुरेसे डाव आहेत. कोहलीने आतापर्यंत २६,९४२ आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या टॉप-१० फलंदाजांची यादी पाहिली, तर सध्या कोहली हा एकमेव सक्रिय खेळाडू आहे.

या यादीत तेंडुलकर ३४,३५७ धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्यानंतर श्रीलंकेचा कुमार संगकारा, ज्याने २८,०१६ धावा केल्या आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग, ज्याने २७,४८३ धावा ठोकल्या आहेत. यानंतर कोहली चौथ्या क्रमांकावर आहे. कोहलीने आतापर्यंत ११३ कसोटी सामने खेळून १९१ डावांमध्ये ४९.१५ च्या सरासरीने ८,८४८ धावा केल्या आहेत. त्याने २९ शतके आणि ३० अर्धशतके ठोकली आहेत. सध्या सरावादरम्यानचा कोहलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोहलीने आपल्या शॉटने ड्रेसिंग रूमची भिंत फोडली आहे. सरावादरम्यान कोहलीने एक असा शॉट मारला की ड्रेसिंग रूमची भिंत फुटली. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. कोहलीने मैदानावर उतरण्याआधी सरावावेळीच आपली झलक दाखवली आहे. कोहली २०२४ च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर शेवटची कसोटी खेळला. त्यानंतर, वैयक्तिक कारणांमुळे तो घरच्या मैदानावर इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून बाहेर राहिला. आता कोहली कसोटीत पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे लक्ष लागलेले आहे.


प्रवीण साठे,  दै. गोवन वार्ताचे उपसंपादक आहेत