..तर कुडचडेच्या आमदारांच्या घरासमोरच टाकणार कचरा : अमित पाटकर

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
20th September, 01:56 pm
..तर कुडचडेच्या आमदारांच्या घरासमोरच टाकणार कचरा  : अमित पाटकर

पणजी :  सरकारने काही महिन्यांपूर्वीच १५० कोटी रुपये खर्चून कुडचडे जवळ नवा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. तरी देखील अजूनही कुडचडे मुख्य शहरातच कचरा वर्गीकरण केले जात आहे. यामुळे स्थानिकांत आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. येत्या बुधवारपर्यंत वर्गीकरणाची जागा न बदलल्यास हा कचरा उचलून स्थानिक आमदारांच्या घरासमोर टाकण्याचा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी दिला. 

शुक्रवारी पाटकर यांनी स्थानिकांसह घनकचरा व्यवस्थापन मंत्री बाबुश मोन्सेरात यांना याबाबत निवेदन दिले. यानंतर पाटकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, गेली काही वर्षे कुडचडे शहरातील नागरी वस्तीत कचरा टाकला जात आहे. येथील चर्च , शाळेकडे जाण्यासाठीचा हा मुख्य रस्ता आहे. सांगे , सावर्डे येथून येणारे लोक देखील हाच रस्ता वापरतात. स्थानिक आमदारांचे घर येथून केवळ १०० मीटर अंतरावर आहे. 

असे असूनही भर वस्तीत कचरा टाकला जातो आणि त्याचे वर्गीकरण केले जाते. यामुळे येथे डेंग्यू सारखे आजार वाढत आहेत. याबाबत आम्ही काल आरोग्य अधिकारी आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावले होते. आरोग्य अधिकाऱ्यांनी देखील हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत कचरा टाकू नये अशा सूचना केल्या होत्या. यानंतर पालिका प्रशासनाने येथील सर्व कचरा उचलला होता. मात्र संध्याकाळी पाच वाजता येथे पुन्हा कचरा टाकण्यात आला. 

यामुळेच आज आम्ही आरोग्य आणि नगर विकास मंत्र्यांना भेटायला आलो होतो. मात्र ते मंत्रालयात नव्हते. सामान्य जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी मंत्री उपस्थित नसावेत ही दुर्दैवी गोष्ट आहे. यानंतर आम्ही घनकचरा व्यवस्थापन मंत्र्यांना भेटलो. त्यांनी आम्हाला यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे. 


हेही वाचा