वृद्ध, दिव्यांगांची गैरसोय, लिफ्ट बंद पडत असल्यामुळे समस्या

बार्देश उपनिबंधक कार्यालय गाठताना नागरिकांचे हाल

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
20th September, 10:48 am
वृद्ध, दिव्यांगांची गैरसोय, लिफ्ट बंद पडत असल्यामुळे समस्या

मरड म्हापसा येथील उपनिबंधक कार्यालयाची लिफ्ट बंद पडत असल्याने कामानिमित्त कार्यालयात वृद्ध पालकांना नेण्यासाठी मुलांना अशी कसरत करावी
लागते. उमेश झर्मेकर

म्हापसा : येथील बार्देश उपनिबंधक कार्यालयाची लिफ्ट वारंवार बंद पडत आहे. सध्या वीज पुरवठ्यात समस्या निर्माण झाल्याने ही लिफ्ट बंद आहे. लिफ्टअभावी दुसऱ्या मजल्यावरील या कार्यालयात ये-जा करण्यासाठी विशेषतः वृद्ध व दिव्यांग लोकांसमोर मोठी समस्या उद्भवली आहे.

राज्य सरकारने मरड-म्हापसा येथील एस्सार ट्रेड सेंटर या खासगी दुमजली इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर उपनिबंधक कार्यालय सुरू केले आहे. शिवाय या कार्यालयासाठी खास लिफ्टची व्यवस्था केली आहे. मात्र ही लिफ्ट वारंवार बंद पडत असल्याने नागरिकांना जिन्याच्या शंभरवर पायऱ्या चढ-उतार करण्याची मोठी कसरत करावी लागते.

खासकरून दिव्यांग व वृद्ध लोकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. अनेकांना पालक किंवा नातेवाईकांना उचलून दोन मजले चढावे लागतात. जिन्यावर चढ-उतार करण्यासाठी कोणतीही रेलींग आधाराची सोय करण्यात आलेली नाही. यामुळे लोकांना भिंतींचा आधार घ्यावा लागतो.

उपनिबंधक कार्यालयाची लिफ्ट बंद
बार्देश उपनिबंधक कार्यालयाच्या लिफ्टच्या वीज पुरवठ्याच्या फेसमध्ये दोष निर्माण झाल्याने ही लिफ्ट बंद ठेवण्यात आली आहे. हा दोष तज्ञांकडून शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. वीज पुरवठ्यातील समस्येचे नेमके निदान झाल्यानंतर तत्काळ ती दुरुस्त केली जाईल, अशी माहिती एका अधिकाऱ्यांनी दिली.

मालमत्ता खरेदी- विक्रीसाठी उपनिबंधक हे महत्त्वाचे कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये वयोवृद्ध लोकांची रेलचेल असते. त्यामुळे त्यांच्या सोयीच्या दृष्टीने कार्यालयाला सरकारने जागा घ्यायला हवी. येथील लिफ्ट सतत बंद पडत असल्याने सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. सरकारने यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा.
- संजय गडेकर




हेही वाचा