दक्षिण गोवा : इन्सेंटिव्ह कमी केल्याने दक्षिणेतील स्विगीचे डिलिव्हरी बॉयज आक्रमक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
20th September, 12:26 pm
दक्षिण गोवा : इन्सेंटिव्ह कमी केल्याने दक्षिणेतील स्विगीचे डिलिव्हरी बॉयज आक्रमक

मडगाव : स्विगी फूड डिलिव्हरी अॅपमार्फत खाद्यपदार्थ घरपोच पोहचवणाऱ्या डिलिव्हरी बॉयजनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मेहनत करूनही योग्य मोबदला मिळत नसल्याने त्यांचा संताप अनवार झाला असून कंपनीच्या नव्या धोरणाविरुद्ध त्यांनी निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे.  कंपनीच्या नवीन धोरणानुसार स्विगी डिलिव्हरी बॉयजना मिळणारा इन्सेटिव्ह कमी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर दक्षिण गोव्यातील सुमारे १००  रायडर्सनी काम बंद ठेवत योग्य मोबदला दिला जात नाही, तोपर्यंत काम न करण्याचे धोरण स्वीकारले आहे. 

    दक्षिण गोव्यातील स्विगी या कंपनीच्या रायडर्सनी काम बंद करत आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. दक्षिण गोव्यातील सुमारे १०० रायडर्स मडगावातील कार्यालयाजवळ जमा झाले. यावेळी रायडर्सना मिळत असलेल्या इन्सेंटिव्ह कोणतीही पूर्वसूचना न देता कमी करण्यात आल्याने संताप व्यक्त केला. रायडर शाहरुख यांनी सांगितले की, स्विगी कंपनीकडून रायडर्सचा वापर कंपनीने गैरफायदा घेतला. आता त्यांना  मिळणार्‍या इन्सेंटीव्ह कमी करण्यात आलेला आहे. डिलिव्हरी करणारे  सकाळी सहा वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत काम करतात व यातून मिळणाऱ्या तटपुंज्या कमाईवरच आपला  उदरनिर्वाह चालवतात. 

या आधी दिलेले टार्गेट पूर्ण केले की त्याचा मोबदला मिळायचा. दिवसभरात १२ ऑर्डर पूर्ण केल्यास ५६० तर १७ ऑर्डर पूर्ण केल्यास ९६० रुपये इन्सेंटिव्ह दिला जायचा. आता कंपनीकडून पाच किलोमीटरपर्यंत केवळ २० रुपये देण्यात येतील असे सांगण्यात आलेले असून कुणालाही विश्वासात न  घेता या निर्णयाची अमलबजावणी देखील करण्यात आली आहे.  दिवसभराचा वैयक्तिक खर्च, पेट्रोल, गाडीची देखभाल सर्व खर्च रायडर्स करत असून इन्सेटिव्हमधील बदल मारक ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

स्विगीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी यात लक्ष्य देत पूर्वीचेच इन्सेंटिव्ह पुन्हा लागू करावेत. सरकारनेही कामगारांची समस्या सोडवावी. अन्यथा कंपनीला राज्यातूनच हद्दपार करावे.  जुन्या डिलिव्हरी बॉयजना कामावरून काढून टाकल्यास नव्या कर्मचाऱ्यांवर देखील हीच वेळ ओढावेल असेही येथे उपस्थित अन्य एका डिलिव्हरी बॉयने म्हटले आहे. जो पर्यंत कामाचा योग्य मोबदला मिळत नाही तो पर्यंत कामावर रुजू होणार नाही असे त्यांनी यावेळी म्हटले.