#काही मिनिटांची मजा, आयुष्यभर सजा#

Story: अंतरंग |
15th September, 09:27 pm
#काही मिनिटांची मजा, आयुष्यभर सजा#

राज्य एड्स नियंत्रण संस्थेच्या ताज्या अहवालानुसार, १४ वर्षात प्रथमच एचआयव्हीने तरुणाईत शिरकाव केला आहे. एचआयव्हीबाबत मोठ्या प्रमाणात जागृती झालेली आहे. लोकांनाही या रोगापासून सुटका नसल्याचे समजले आहे. यामुळेच गेल्या १४ वर्षात राज्यात एचआयव्ही बाधितांची संख्या जवळपास चार पटीने कमी झाली आहे. असे असताना १४ वर्षात प्रथमच एचआयव्ही बाधित तरुणांची संख्या वाढणे ही धोक्याची घंटा आहे.

एड्स नियंत्रण संस्थेच्या अहवालानुसार, राज्यात २००९ ते २०२२ दरम्यान एकूण एचआयव्ही बाधितांपैकी सर्वाधिक बाधित हे ३५ ते ४९ वर्षे वयोगटातील होते. मात्र २०२३ मध्ये सर्वाधिक बाधित हे २५ ते ३४ वर्षे वयोगटातील आढळले होते. २००९ ते २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्ये १५ ते २४ वर्षे या वयोगटातील एचआयव्ही बाधितांची संख्याही जास्त आहे. २०२३ मध्ये राज्यातील एकूण एचआयव्ही बाधितांपैकी जवळपास ५० टक्के बाधित हे तरुण समजल्या जाणाऱ्या १५ ते ३४ वर्षे वयोगटातील होते. आकडेवारी पाहता राज्यात २०२३ मध्ये एकूण २६० एचआयव्ही बाधित आढळले होते. यातील ९७ बाधित हे २५ ते ३४ वर्षे वयोगटातील होते. तर ८५ बाधित हे ३५ ते ४९ वर्षे वयोगटातील तर ३२ बाधित हे १५ ते २४ वर्षे वयोगटातील होते.

राज्यात २००९ ते २०२३ मध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्हीची लागण होण्याचे प्रमाण हे ९० ते ९६ टक्क्यांदरम्यान होते. २०२३ मध्ये हे प्रमाण १४ वर्षातील सर्वाधिक म्हणजेच ९७.७ टक्के इतके होते. वरील आकडेवारी पाहता असुरक्षित लैंगिक संबंध आणि तरुणाई यांचा संबंध लावणे आवश्यकच आहे. भांडवली व्यवस्थेत साबणापासून पेस्टपर्यंतची जाहिरात करताना विषय वासना हेच अधोरेखित केले जात आहे. पॉर्न साईट, चित्रपट, वेब सिरीज यातून 'सेक्स'चा भडिमार केला जातो. अशा परस्थितीमध्ये तरुण पिढी साहजिकच लैंगिक संबंधाकडे आकर्षित होते.  

तरुणाईत एचआयव्ही वाढण्यात डेटिंग अॅप हे एक कारण आहे. गेल्या दोन-तीन वर्षात राज्यात असे अॅप  वापरणाऱ्या तरुणांची संख्या वाढली आहे. अर्थात डेटिंग अॅप  असे गोंडस नाव दिले तरी त्याचे खरे नाव सेक्स अॅप  असायला हवे. टिंडर, बंबल अशा अॅप च्या मदतीने अनोळखी तरुण-तरुणी एकमेकांना भेटतात, असुरक्षित शारीरिक संबध ठेवतात. यातूनच एड्स फोफावत आहे. आता हे योग्य का अयोग्य यावर वाद करण्यापेक्षा जे आहे ते मान्य करून याबाबत जागृती केली पाहिजे. पूर्वी दूरदर्शनवर एड्सबाबत 'काही मिनिटांची मजा, आयुष्यभर सजा' अशा टॅगलाईनची जाहिरात येत होती. तरुणाईने असुरक्षित शारीरिक सबंध ठेवताना ही टॅगलाईन जरूर आठवावी.

पिनाक कल्लोळी