वळण हवे, ‘वळ’ नको

शिक्षकांनी छडी उगारली तर मारहाण केल्याचा उगाच आरडाओरडा पालकांनी करू नये. एका मर्यादेपर्यंत शिक्षक आणि पालकांनी सामंजस्याने अशा गोष्टी सोडवाव्या. आपल्या मुलाच्या नावाने राजकारण होऊ नये यासाठी पालकांनीही सतर्क रहायला हवे. मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या व्हायलाच हव्यात त्यासाठी शाळा व्यवस्थापन, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय असणे तितकेच गरजेचे आहे.

Story: उतारा |
15th September, 12:38 am
वळण हवे, ‘वळ’ नको

गेल्यावर्षी ३ डिसेंबरच्या अंकात ‘छडी वाजायला हवी, पण मोडायला नको’ या मथळ्याखालील लेखात शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणाऱ्या मारहाणीच्या आरोपांविषयी चर्चा केली होती. आज पुन्हा तसाच विषय घेण्याची वेळ आली आहे. समाजाने शिक्षकी पेशाला खूप मान सन्मान दिला आहे. गावापासून शहरापर्यंत शिक्षकाला फार महत्त्व आहे. शिक्षक म्हणजे दुसरा देवच. देशातील अनेक राज्यांमध्ये या पेशात उतरलेल्या अनेक शिक्षकांनी सरकारी वेतनासाठी या पदाशी प्रतारणा केली. काही राज्यांमध्ये काहीच न येणाऱ्यांना शिक्षक म्हणून नियुक्त केल्याची प्रकरणे आहेत, तर काही ठिकाणी शिक्षकांचा पगार भलताच माणूस खातो आणि त्याच्या जागी दुसराच माणूस शिकवणी देतो असेही प्रकार घडतात. शिक्षक भरतीमधील भ्रष्टाचार काही राज्यांमध्ये पुन्हा पुन्हा चौकशीच्या घेऱ्यात सापडला. गोव्यातील शिक्षण व्यवस्थेत मात्र अद्याप असे प्रकार होत नाहीत. पण गोव्यातील शिक्षण क्षेत्रात घुसलेल्या काही अपप्रवृत्तींमुळे शिक्षण क्षेत्राची काहीवेळा बदनामी झाली आहे. या काही शिक्षकांमुळे सर्वांनाच गैर म्हणता येणार नाही. शिक्षकांची काळीमा फासणारी अनेक गैरकृत्ये उघडकीस आली. अशा अगदी किरकोळ अपप्रवृत्ती वगळल्या तर गोव्यातील शिक्षण क्षेत्रातील कार्य फार आश्वासक दिशेने चालले आहे.

पावला-पावलांवर उभ्या राहिलेल्या शाळांमुळे सर्वांनाच शिक्षणाचा मार्ग खुला झाला. पोर्तुगीज काळापासून ते आतापर्यंत गोव्यात शिक्षणाचा प्रसार सुरूच आहे. या कार्यात हजारो शिक्षकांनी आपले आयुष्य शिक्षादानाच्या कामासाठीच खर्ची घातले. त्यामुळे एखाद्या गैरकृत्यामुळे काहीवेळा संपूर्ण शिक्षण क्षेत्रावरच चर्चा सुरू होते. ते अगदीच काळीमा फासणारी काही गैरकृत्ये वगळली तर अन्य एका गोष्टीमुळे वारंवार शिक्षण क्षेत्र ढवळून निघते, ते म्हणजे शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना होणारी मारहाण. कान पिळणे, हातावर वळ उठेपर्यंत छडीने मारणे अशा गोष्टी आता शिक्षकही करत नाहीत, कारण लहान मुलांना मारहाण केल्याच्या गोष्टींचा लगेचच बाऊ केला जातो.

मुलांच्या संरक्षणासाठी सक्रिय असलेल्या संस्था लगेच अशा गोष्टी कायद्याच्या कचाट्यात घेऊन जातात. तथाकथित समाजसेवक यावरून राजकारण करतात. विद्यार्थ्यांच्या पालकांना लगेच पोलिसांत जाण्यासाठी आणि सोशल मीडियावरून शिक्षकांना बदनाम करण्यासाठी तथाकथित समाजधुरीन टपून बसलेले असतात. त्यामुळे हल्ली ते ‘मारके’ शिक्षकही दिसत नाहीत आणि मार खाऊन गप्प बसणारे ‘सोशिक’ विद्यार्थीही सापडत नाहीत. बदलत चाललेल्या समाज व्यवस्थेचे किंवा शिक्षण व्यवस्थेचे हेही एक चित्र आहे. वीस-पंचवीस वर्षांपूर्वीपर्यंत शिक्षकांकडून कान पिळणे किंवा छडीने विद्यार्थ्यांना चोप देणे हे ‘रुटीन’ होते. विद्यार्थ्यांनी घरात सांगितले तर पालक शिक्षकांना पुन्हा सांगत की ‘अजून चोपा पण थोडी शिस्त लावा’. विद्यार्थ्यांना मारहाण करणे हा काही कधी गुन्हा नव्हता. तो शिस्तीचा भाग होता. विद्यार्थी गळती होऊ नये म्हणून मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकही एका काळात शिक्षकांपेक्षा जास्त आग्रही होते. मुलांना शिस्त लागण्यासाठी शिक्षणासोबतच शिक्षकांनी दमदाटी करणे हाही शिक्षणाचाच भाग मानला जायचा. कालांतराने ही स्थिती बदलली. बालमनावर संस्कारांसाठी त्यांना छडीचा दम देणे किंवा छडीने वळ उठेपर्यंत मारणे तसे गरजेचे नाही. काही विद्यार्थ्यांना मात्र वळ आणल्याशिवाय वळण लागत नाही हेही तितकेच खरे. आता तर विद्यार्थ्यांना छडीने मारल्यास शिक्षक बरेच अडचणीत येतात. तुरुंगातही जावे लागते.

विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणात २०२३ मध्ये एका शिक्षिकेला अटक झाली होती. दुसऱ्या प्रकरणात गुन्हा नोंद झाला होता. त्याचीच पुनरावृत्ती आता झाली आहे. वागाळी-कामुर्ली येथील श्री सरस्वती मंदिर प्राथमिक विद्यालयातील इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी दोन शिक्षिकांना निलंबित केले आणि त्यांना नंतर अटकही झाली. सध्या त्या जामिनावर सुटल्या आहेत. या प्रकरणात विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केल्यामुळे या शिक्षिकाही वादात सापडल्या. विद्यार्थ्याला झालेली मारहाण आणि त्याच्या शरीरावर उमटलेले वळ सोशल मीडिया आणि प्रसारमाध्यमांमध्ये दाखवले गेल्यामुळे शिक्षकांविषयी रोषच जास्त व्यक्त झाला. ज्या वयात मुलांना प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमातून वळण लावायचे असते अशा वयात त्यांना जबर मारहाण करण्याचा पर्याय या शिक्षिकांनी निवडला. त्यामुळे या शिक्षिकांच्या पात्रतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणावर चिंता व्यक्त करून शिक्षकांसाठी समुपदेशनाची गरज व्यक्त केली आहे. कामुर्लीतील घटना पाहता शिक्षिका निवडताना शिक्षण संस्थांनी जास्त सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

२०१४ मध्ये दोन विद्यार्थिनींना मारहाण केल्याचा आरोप एका शिक्षिकेवर होता. गेल्यावर्षी न्यायालयाने त्या शिक्षिकेला निर्दोष मुक्त केले. न्यायालयाने या खटल्यात महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले आहे. शिक्षिकेने केलेली मारहाण ही विद्यार्थिनींना शिस्त यावी यासाठी होती. शिक्षकांना काहीवेळा कठोर व्हावे लागते. त्यामुळे त्यासाठी केलेली कृती हा गुन्हा ठरत नाही असे मत न्यायालयाने नोंदवले आहे. विशेष म्हणजे शिस्तीसाठीच विद्यार्थी शाळेत पाठवले जातात. फक्त शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी शिस्तीची गरज आहे, असे न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाचा हा निवाडा शिक्षकांसाठी दिलासादायक आहे. शिस्तीसाठी, विद्यार्थ्यांना वठणीवर आणण्यासाठी केली जाणारी कृती गुन्हा ठरू नये. याचा अर्थ शिक्षकांना बेदम मारहाण करण्याचा परवाना मिळतो असाही नव्हे. शिक्षण, शिस्त यासाठी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवले जाते. त्यामुळे शिक्षक आणि पालक यांच्यातही एक दुवा असायला हवा. ज्यात शाळा व्यवस्थापनाची भूमिका महत्त्वाची असते. परवा एका पालकाने सांगितलेली गोष्ट आठवली. एका सरकारी कर्मचाऱ्याचा मुलगा शाळेत प्रचंड मस्ती करतो. दुसऱ्या विद्यार्थ्यांना मारहाण करतो. पण त्या पालकाला त्याचे काहीच सोयरसूतक नाही. त्या मुलाच्या भीतीने इतर पालकांनी आपल्या मुलांना दुसऱ्या शाळेत पाठवण्याची तयारी केली, तरी त्या संबंधित विद्यार्थ्याचे वडील समजूतदारपणा दाखवत नाहीत. पालक उलट शिक्षकांनाच दम भरतात. अशा प्रकरणात शिक्षक आणि पालक यांच्यात समन्वय हवा. त्या मुलाला कसे हाताळावे यासाठी पालकाने शिक्षकांचेही थोडेफार ऐकायला हवे. प्रसंगी त्या विद्यार्थ्याला वठणीवर आणण्यासाठी शिक्षकांना कठोर भूमिका घ्यावी लागेल. त्यासाठी पालकानेच शिक्षकांना तसे सांगणे गरजेचे आहे.

हल्ली मुलांना शिस्त लावण्यासाठी कान पिळला तरीही कानातून रक्त आले म्हणून शिक्षकांना पोलीस स्थानकात नेणारे पालक आज मुलांना मोबाईल देऊन, त्यांचे नको ते लाड पुरवून त्यांना शाळेपेक्षा नको त्या आनंदाचे धनी करण्याला जास्त महत्त्व देतात. शाळेचा वापर हा ज्ञानार्जनासह शिस्तीसाठी व्हायलाच हवा. ज्यात शिक्षकांनी आपली मर्यादा ओलांडून बेदम मारहाण करण्याचा पर्याय स्वीकारू नये. शिक्षकांनी छडी उगारली तर मारहाण केल्याचा उगाच आरडाओरडा पालकांनी करू नये. एका मर्यादेपर्यंत शिक्षक आणि पालकांनी सामंजस्याने अशा गोष्टी सोडवाव्या. आपल्या मुलाच्या नावाने राजकारण होऊ नये यासाठी पालकांनीही सतर्क रहायला हवे. मुलांचे भवितव्य घडविण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या व्हायलाच हव्यात त्यासाठी शाळा व्यवस्थापन, पालक आणि शिक्षक यांच्यात समन्वय असणे तितकेच गरजेचे आहे.

पांडुरंग गांवकर, (लेखक दै. गोवन वार्ताचे संपादक आहेत.)

मो. ९७६३१०६३००