गोवा मुक्तीनंतरचा पहिला दिवस

भारतीय लष्कराने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केला म्हणून काही स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांनी ‘जय हिंद’च्या घोषणा देत मिरवणूक काढली. ‌बंद केलेली दुकाने उघडी करून फटाके लावले. गोवा मुक्त झाला ही बातमी अवघ्या काही वेळेत सर्वत्र पसरली, तशी पेडणे बाजारातील लोकांची गर्दी ‌वाढतच गेली.

Story: इतिहासाची पाने चाळताना... |
15th September, 12:32 am
गोवा मुक्तीनंतरचा पहिला दिवस

१८ डिसेंबर, १९६१ची सकाळ नेहमीप्रमाणेच सुस्तपणे उगवली. सकाळी उठताच हातात शेणाची ‘मशेरी’ घेऊन बोटानेच दात घासले व रामूच्या आईने दिलेला बिन दूधाचा चहा व भाकरी खाऊन पेडणेतील व्हिशकोंद हायस्कूलची वाट धरली. डोंगराच्या कड्याकपारीत वसलेल्या खाजने या माझ्या निसर्गसुंदर गावातून ४-५ मैलांची घनदाट जंगलातून पायपीट करून सकाळी ८ वाजता पेडणेत पोहचणे शक्य नसल्याने माझ्या वडिलांनी पेडणे रवळनाथ मंदिराजवळ रामूच्या घरी माझी व्यवस्था केली होती. त्या दिवशी ‘मोसिदाद’चा तास होता. त्यामुळे खाकी युनिफॉर्म घातला होता. मोसिदाद म्हणजे आजची एनसीसी! त्यावर्षी मी  १२ वर्षांचा होतो व पाचवीत शिकत होतो. गोमंतकीय मुलांवर पोर्तुगीज वसाहतवादाचे संस्कार व्हावेत म्हणून पाचवी इयत्तेपासूनच मोसिदादची सक्ती होती. सकाळी प्रार्थना झाल्यावर पोर्तुगीज राष्ट्रगीत चालू असताना मोठमोठ्याने सायरन वाजवत आलेली सशस्त्र पोलिसांची जीप येऊन थांबली. जीप थांबताच सगळ्यांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली. राष्ट्रगीत अर्ध्यावरच बंद पडले. पोलिसांनी शिक्षकांना काहीतरी सांगितले आणि आल्या पावली परतले. पोलिसांच्या आदेशाने धास्तावलेल्या शिक्षकांनी शाळेला सुट्टी जाहीर करत शक्यतो लवकर घर गाठण्याचा सल्ला दिला. ‌शाळेला आकस्मिक सुट्टी मिळाली म्हणून सगळेच विद्यार्थी खूश झाले. घरी परतत असताना रावराजे बाजारपेठेतील‌ दुकाने बंद दिसली. तेव्हा  कोणी तरी बडी असामी वारली असावी, असे वाटले. तेथून पुढे जात असताना पोलिसांच्या तीन जीप गाड्या शिवोलीच्या बाजूला भरवेगाने जाताना दिसल्या. त्यापैकी एका पोलिसाने हवेत गोळीबार केला, तेव्हा माझी बोबडीच वळली. जीवाच्या आकांताने धावत धावत घर गाठले. मी का धावतो, याची विचारणा करण्यासाठी घरातली सगळीच मंडळी बाहेर आली, तेव्हा त्यांना घरात ढकलत मी दरवाजाच बंद केला. आमच्या शाळेत पोलीस का आले, आम्हाला सुट्टी का दिली व लवकर घरी जाण्याचा सल्ला का दिला, बाजारपेठ का बंद झाली; मला काहीच कळत नव्हते. मी खूपच घाबरलो होतो. रामू आणि इतरांनी घरातच बसून राहावे, असा आग्रह मी धरला आणि त्यानेही तो मान्य केला.

भयभीत झालेल्या अवस्थेत आम्ही बराच वेळ बसून होतो. एवढ्यात हेलिकॉप्टरची घरघर  कानांवर पडली. हेलिकॉप्टरमधून आलेले सैनिक आता आमच्यावर बॉम्ब टाकणार, असा विचार मनात आला आणि सर्व संपले असे म्हणत देवाचा धावा सुरू केला. एवढ्यात... ‘घाबरू नका, तुम्हाला मुक्त करण्यासाठी आम्ही आलो आहोत,’ अशी आकाशवाणी ऐकू आली. काही छापील पत्रके खाली मात्र फेकण्यात आली. ही आकाशवाणी ऐकल्यावर तसेच पत्रके वाचल्यावर पोर्तुगीजांच्या ४५० वर्षांच्या वसाहतवादी जुलमी राजवटीतून आम्हाला मुक्त केले, भारतीय लष्कराने कारवाई केली आहे, ही गोष्ट लक्षात आली. लोक हळूहळू घरातून बाहेर पडले. बाजारात जाऊन पाहिले तर पोलीस ठाण्यासमोरच्या खुल्या जागेत २०-२५ पाकले भरदुपारच्या कडक उन्हात मान खाली घालून बसले होते. दुसऱ्या बाजूला बंदुका व काडतुसांचा खच पडला होता. कडक उन्हात त्यांची तोंडे भाजून निघाली होती. त्यांची ही केविलवाणी अवस्था पाहून मनाला बरेच दु:ख झाले, पण तसे बोलण्याचे धाडस झाले नाही.

भारतीय लष्कराने लष्करी कारवाई करून गोवा मुक्त केला म्हणून काही स्वातंत्र्य सैनिक व नागरिकांनी ‘जय हिंद’च्या घोषणा देत मिरवणूक काढली. ‌बंद केलेली दुकाने उघडी करून फटाके लावले. गोवा मुक्त झाला ही बातमी अवघ्या काही वेळेत सर्वत्र पसरली, तशी पेडणे बाजारातील लोकांची गर्दी ‌वाढतच गेली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी उर्वरित भारताबरोबरच पोर्तुगीज आपले पांढरे पाय‌ गोव्यातून काढून घेऊन तोंड काळे करतील, असे काही लोकांना वाटले होते. १९५४-५५ मध्ये झालेल्या सत्याग्रहानंतर तरी पोर्तुगीज आपले तोंड काळे करतील असे खुद्द पं. नेहरू यांनाही वाटत होते. पण हुकूमशहा सालाझार अत्यंत मुर्दाड नराधम निघाला.

आज गोवा मुक्त झाला ही सर्वात महत्त्वाची व आनंददायी बातमी माझ्या खाजने गावातील लोकांना कळविण्यासाठी पाठीला दप्तर मारून मी घनदाट जंगलातून पायपीट सुरू केली. तासाभराने मी घरी पोहचलो, तेव्हा त्यांना ही बातमी आधीच कळल्याचे दिसून आले. पण पेडणेत घडलेल्या घटनांचा आँखो देखा हाल‌ मीठ मसाला लावून रंगवून रंगवून सांगण्याचे  समाधान मिळविलेच!


गुरुदास सावळ, (लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)