युवाऊर्जा

गोव्यातील तरुणाई साहित्य लेखनाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे याची प्रचिती येते. साहित्य हे त्या त्या प्रदेशाची स्वतंत्र ओळख असते. प्रदेशाची, तेथील माणसांची आणि या सर्वांना जोडून असलेल्या घटकांची नोंद या अनुषंगाने होते.

Story: प्रेरक सर्जक |
15th September, 12:09 am
युवाऊर्जा

युवा सर्जक... प्रेरक... उत्साही... शक्ती आणि उक्तीचे एक समीकरण. मात्र अलीकडच्या काळात युवकांविषयी एक वेगळीच नकारात्मक भावना समाजमनात रुजलेली दिसते. युवा म्हणजे व्यसनाधीनता, पब, पार्ट्या यात एकदम मशगुल झालेला. तो आपल्याच स्वप्निल दुनियेत रममाण होणारा, निराशेने ग्रासलेला, प्रसंगी आत्महत्येसारख्या विचार करून टोकाचे पाऊल उचलणारा... तो तासनतास सोशल मीडियावर सक्रिय राहतो, त्याला वास्तव जगण्याचे अजिबात भान नाही, असाच वेळ वाया घालवतो हे आणि असेच कितीतरी विचार आज समाजाच्या मनात युवकांच्या बाबतीत दृढ होत आहेत. खरंतर ही एक बाजू आहे या उत्साही युवा मनाची. त्याही पलीकडे जात असेही युवक आहेत की ज्यांच्या हातात सर्जकता आहे. ते काम करीत आहेत आपल्याच धुंदीत या मातीशी रममाण होत! नवीन काहीतरी निर्माण करीत आहेत. बा. भ. बोरकरांनी म्हटलेले आहे...

देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे 

मंगलाने गंधलेले सुंदर यांचे सोहळे

ही अशी युवा ऊर्जा प्रेरणादायी... ती सभोवताली आहेच परंतु आपण तिला हेरण्यासाठी कोठेतरी कमी पडत आहोत. एक निराशजनक चित्र युवा वर्गाविषयी आपल्या मनात ठाण मांडून बसलेले आहे की ती प्रतिमा पुसता पुसली जात नाही. त्यातून नकारात्मक भावना निर्माण होते. युवकामधील ऊर्जास्त्रोत अखंड धगधगत असलेला आपल्या इतिहासाने अनुभवलेला आहे. अन्यायाविरुद्धची चीड त्यांच्या नसानसांत भिनलेली आहे. आजच्या घडीला त्यांना योग्य मार्गदर्शन लाभत नाही, त्यांच्यातील ऊर्जेची योग्य दखल घेतली जात नाही ही खंत कायम सलत राहते. 

एक आभासी जग, जे समाज माध्यमातून विनासायास नकळत्या वयात समोर येते. तेच जग खरं आहे असे वाटत जाते... पैसा, सुबत्ता, शानशौकी, चंगळवाद, भोगवादी वृत्ती बळावत जाते. लहान चौकोनी कुटुंब... तिथेही एकत्रित बसून पालकांसोबतीने दारू पिण्याची संस्कृती वाढीस लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर युवकांकडून अपेक्षा करताना मनात थोडी साशंकता निर्माण होते. परंतु एक दुसरी बाजू अनुभवूया जिथं युवकांना पर्याय आहेत ते काहीतरी करू इच्छितात, काहीतरी बघू इच्छितात, पूर्वीपेक्षा त्यांचे विचार वेगळे आहेत. त्यांच्या वाटाही वेगळ्या आहेत. त्यांची कल्पकता, सर्जकता ही भवतालाला पचत, रुचत नसेल; परंतु तरीही त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे. 

त्याहीपेक्षा ते स्वतःचा मार्ग स्वतः निवडत आहेत. वैचारिक प्रगल्भता त्यांनी आत्मसात करून ते पुढे पुढे जात आहेत. परंपरेने आखून रेखून दिलेला रस्ता बऱ्याच युवकांना मान्य नाही. ते स्वतः वेगळ्या वाटेचे सहप्रवासी आहेत. ते स्वतःच्या मनाचे करतात याचा अर्थ मोठ्यांचा आदर करीत नाहीत असं अजिबात होत नाही. परंपरेने चालत आलेली, मळलेली वाट सहज पादाक्रांत करता येते परंतु नवीन वाट निर्माण करण्यासाठी कल्पकता हवी. संकटांना सामोरे जाण्याचं धाडस लागतं आणि अपयश आलं तरीही ते पचवण्यासाठी सामर्थ्यही लागतं. तेव्हाच कुठे इच्छित ध्येय साध्य होतं जे आजही युवकांकडे आहेच. आपली फक्त बघण्याची दृष्टी तेवढी बदलायला हवी. या वयाला शक्तीयुक्तीचे वरदान लाभलेले आहे. लाथ मारीन तेथे पाणी काढीन अशी धमक असल्याचे प्रतीक म्हणजे युवावर्ग! पहाडासारख्या संकटांना सामोरे जाताना तो स्वतःच्या जीवाची पर्वा करीत नाही. कष्टाची कामे असोत, अथवा अतिशय संवेदनशील कामे ती तो लीलया पार पाडताना दिसतो. आकाशाला गवसणी घालताना मातीलाही तो विसरत नाही... पर्यावरण, समाज, संस्कृती, साहित्य, राजकारण अशा सर्वच क्षेत्रात युवकांनी आपल्या कर्तृत्वाचा अमीट ठसा उमटविलेला आहे. 

या सगळ्याचा विचार करताना गोव्यातील तरुणाई साहित्य लेखनाच्या क्षेत्रातही अग्रेसर आहे याची प्रचिती येते. साहित्य हे त्या त्या प्रदेशाची स्वतंत्र ओळख असते. प्रदेशाची, तेथील माणसांची आणि या सर्वांना जोडून असलेल्या घटकांची नोंद या अनुषंगाने होते. मनाची घुसमट, आकांत, वेदना, आनंद, यश-अपयश, एकंदरीत जीवन जाणिवांचा गोषवारा साहित्य लेखनातून अभिव्यक्त होत राहातो. कथा, कविता, ललित, काव्य, नाटक अशा विभिन्न प्रकारातून जेव्हा भावना संवेदनांची वीण पक्की होत जाते, तेव्हा त्यातून युवा शक्तीच्या विचारांची उंची लक्षात येते. आजचा युवा भरकटलेला आहे असे म्हणण्याऐवजी त्याला योग्य दिशादर्शक लाभले तर तो सहजपणे स्वतःला सिद्ध करू शकतो. 

गोमंतकीय मराठी साहित्य लेखनात ज्यांनी आपले वेगळेपण अधोरेखित केलेले आहे अशी एक फळीच आज दिसत आहेत. काहींची पुस्तके प्रकाशित झालेली आहेत तर काही जण स्वतःच्या ब्लॉगवर, फेसबुक, वर्तमानपत्रे, नियतकालिके, इंस्टाग्रामच्या माध्यमातून आविष्कृत होत आहेत. माध्यम कोणतेही असू दे, अभिव्यक्ती महत्त्वाची आहे. तरुण-तरुणी वाचन करीत आहेत ही जमेची गोष्ट आहे. गोवा मराठी अकादमीसारखी संस्था दरवर्षी शेकडो मराठी पुस्तकांना आर्थिक सहाय्य करीत आहे. ही पुस्तके प्रकाशित होत आहेत. स्वतंत्रपणे पुस्तकांची प्रकाशने होत आहेत. त्याशिवाय साहित्य सेवक मंडळ, गोमंत विद्या निकेतनसारख्या संस्थांचे कार्यक्रम ही तरुणाईला लेखनासाठीची ऊर्जा पुरवित आहेत. 

अशाच काही लिहित्या हातांची, हळव्या सुकोमल भावनांची ओळख करून घेऊया. ही युवा स्पंदने आहेत. त्यात भारलेपण असेल, तर कधी त्यात झिणझिणून आलेले जगणेही दिसेल. जगण्यासाठीचा संघर्ष आहेच, पण त्यावरही मात करून अदम्य विश्वासाने पुढे जाण्याचे बळही दिसणार. ती ठरणार प्रेरणा लिहू पाहणाऱ्या हातांसाठी... जी पुरविणार जीवन जगण्यासाठीची सकारात्मक ऊर्जा!

शब्द... शब्दच असतात

जळणारे... जाळणारे.  

मूक वेदनेतून छळणारे...

ही अशी घुसमट व्यक्त करीत, प्रसंगी आनंदाचा शोध घेत शब्दांचा उत्सव साजऱ्या करणाऱ्या सर्जक, प्रेरक तरूणाईची ओळख या सदरातून करून घेऊया...


- पौर्णिमा केरकर

(लेखिका लोकसाहित्याच्या अभ्यासक, 

कवयित्री आणि शिक्षिका आहेत.)