देखाव्यातून निसर्गाप्रती जनजागृती

अंत्रूज महालातील पर्यावरणपूरकतेचा संदेश देणाऱ्या अशा सजावटी, देखावे अंत्रुज महालाबाहेरच्या प्रदेशातही आपल्या कक्षा रुंदावतील व निसर्गाप्रती जनजागृती निर्माण करतील.

Story: साद निसर्गाची |
15th September, 12:16 am
देखाव्यातून  निसर्गाप्रती जनजागृती

अंत्रूज महाल अर्थात अनंत ऊर्जेने व्यापलेला प्रदेश. गोव्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश म्हणजे सृजनशील कलाकारांची खाणच. शिगम्यातील चित्ररथ, चतुर्थीतील माटोळ्या व पर्यावरणपूरक गणेश देखावे, यासारख्या कलाप्रकारांतून आपल्याला इथल्या श्रीमंत कलेची झलक पहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे यंदाही फोंडा तालुक्यातील अशाच अनेक कल्पक कलाकारांनी पर्यावरणपूरकतेला दिलेले प्राधान्य स्तुत्य ठरत आहे. 

कुर्टी, प्रियोळ येथील श्रीकांत सतरकर यांनी ३०० पेक्षा जास्त फळे, फुले आणि वनौषधींचा वापर करुन माटोळीत भव्य असा रामलल्ला साकारला आहे. या रामलल्लांच्या माटोळीत वापरण्यात आलेले सर्व साहित्य हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. सतरकर यांनी ही अनोखी माटोळी साकारण्यासाठी कठीण श्रम घेतले आहेत. कांगले, खुळखुळे, देवकेळी, भेकरे, माट्टे, रानआंबाडे, भिल्लफळ, आसाळे, तिरफळ, रिटो, पडवळ, कुड्डया कात्रे, कोयत्यावेल, फणस, निरफणस, चिबड, काराते, भोपळा, चिंच, करमल, तोंडली, करवंदे, दोडगी, इडलिंबू, रानआवाळे, जगमे, पांडवगदा, रानपेरु, रानकेळी यासारख्या दुर्मिळ फळांचा वापर करुन त्यांनी भव्य माटोळी साकारली आहे. या कामात त्यांना साथ लाभली आहे ती त्यांच्या कुटुंबियांची. त्यांनी साकारलेली माटोळी प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्यांच्याशी साधलेल्या संवादात कित्येक फळा-फुलांच्या व वनस्पतींच्या औषधी गुणधर्माच्या श्रीमंतीची माहिती मिळाली. 'जंगलात मिळणारी कित्येक फळे ही खाण्यासाठी उपयुक्त असतात, कितीतरी फळे औषधी गुणधर्मांनी संपन्न असतात तर काही फळे विषारी असतात. त्यामुळे या सर्वांचे अचूक ज्ञान असणे गरजेचे' असे सतरकर यांनी सांगितले.

येथीलच दत्ता नाईक यांनी ३७५ विविध फळे, फुले व औषधी वनस्पती वापरुन साकारलेली परशुरामारुपी माटोळीही लक्ष्यवेधी ठरत आहे. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देताना भारतीय संस्कृतीचे निसर्गाप्रतीचे पारंपरिक ज्ञान सर्जनशीलपणे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे कार्य हे कुटुंब गेली कित्येक वर्षे करत आहेत. नैसर्गिक माटोळीच्या माध्यमातून जैवविविधतेबद्दल नव्या पिढीमध्ये आत्मियता तयार करण्याचे मोठे काम दत्ता नाईक आणि कुटुंबिय करत आहेत. 

गोव्यातील जंगलात झाडांची मोठ्या प्रमाणात बेसुमार कत्तल सुरू आहे. ह्या कत्तलीत अनेक दुर्मिळ झाडे नष्ट होत असल्याची खंत माटोळी कलाकार श्रीकांत सतरकर यांनी व्यक्त केली. जैवसंपदेचे संवर्धन होणं गरजेचं ही त्यांची तळमळीची भावना. 'माटोळीसाठी फळे, फुले, कंदमुळे, वनस्पती गोळा करण्यासाठी आम्ही ग्रामीण गोव्यातील घनदाट जंगलांमध्ये फिरतो. रानावनात हिंडतो. जंगलात हिंडत असताना आम्हाला वर्षानुवर्षे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी भयंकर वृक्षतोड झाल्याचे निदर्शनास येते. काही वनस्पती, फळे ही फक्त विशिष्ट ठिकाणीच सापडतात. झाडांची संख्या जरी कमी होत असली तरी अजूनपर्यंत आम्हाला त्या त्या ठिकाणी ती ती फळे, फुले, वनस्पती सापडण्यात अडचण आलेली नाही. पण ज्या गतीने वृक्षतोड सुरु आहे ती पाहिल्यास भविष्यात ही दुर्मिळ वनसंपदा गोव्यातील जंगलातून नामशेष होऊ शकते' अशी भीती सतरकर यांनी व्यक्त केली. 

सावई-वेरे गावातील सामाजिक जाण आणि तळमळ असलेला युवा कलाकार गौतम नाईक ह्याने यंदा 'हाक म्हादईची' हा देखावा साकारला होता. कर्नाटकाने गोव्याच्या दिशेने वाहणारे म्हादईचे पाणी वळवल्यास गोव्याच्या जैवविविधतेवर कसा दुष्परिणाम होऊ शकतो याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी गौतमने हा सर्व खटाटोप केला आहे. म्हादई नदीचे पाणी वळविल्यास गोव्यातील जनतेला दुष्काळ, अन्न प्रदूषण, जैवसंपत्तीचा ऱ्हास, जंगलहानी यासारख्या अनेक समस्यांना कशाप्रकारे सामोरे जावे लागेल याची जागृती गौतम नाईक याने आपल्या देखाव्यातून केलेली आहे. गोव्याच्या जैवविविधतेचे संरक्षण व जैवसंपदेचे संवर्धन करण्यासाठी म्हादई क्षेत्राला व्याघ्र क्षेत्र घोषित करण्याची मागणीही त्याने ह्या देखाव्यातून केली.  

तळुले-बांदोडा येथील तानाजी गावडे यांनी पश्चिम घाटात आढळणाऱ्या २८० विविध रानटी फुलांचा वापर करुन गरुडरुपी माटोळी साकारली आहे. तर प्लास्टिक, थर्मोकोलसारख्या घातक गोष्टींचा वापर टाळून अत्यंत साध्या दिसणाऱ्या नैसर्गिक घटकापासून सुबक आणि कल्पक पद्धतीने कशाप्रकारे मखर सजावट केली जाऊ शकते ह्याचे उत्तम उदाहरण दिलेले आहे. आर्ल-केरी येथील उपाध्ये कुटुंबियांनी. येथे आनंद उपाध्ये यांनी पोफळीच्या (सुपारीची माडी) पोवळ्या वापरुन साकारलेली पर्यावरणपूरक मखर सजावट, सर्वसामान्यांच्या मनात निसर्गाप्रती असलेला आदरभाव दर्शविते. 

पर्यावरणपूरकतेचा संदेश देणाऱ्या अशा सजावटी, देखावे अंत्रुज महालाबाहेरच्या प्रदेशातही आपल्या कक्षा रुंदावतील व निसर्गाप्रती जनजागृती निर्माण करतील हीच ह्या निमित्ताने प्रामाणिक अपेक्षा.


- स्त्रिग्धरा नाईक

(लेखिका विद्युत अभियांत्रिकीच्या प्राध्यापिका आहेत.)