माहेर

आता यापुढे कुणी विचारलं तर ती “माहेरी जाते” असं न म्हणता “भावाकडे जाते” असं म्हणणार होती...

Story: कथा |
15th September, 12:21 am
माहेर

व्हरांड्यावरची गेट उघडून ती मुख्य दरवाज्याकडे आली. ‘घर क्रमांक ३५२’ दरवाजाच्या बाजूला भिंतीवर असलेल्या पाटीवरची धुळ तिने पुसली. विजूने कुलूप उघडून दरवाजा ढकलला. तिने आत डोकावलं. कित्येक दिवस कोंडून राहिलेला काळोख एकदम तिच्या अंगावर आल्यासारखा तिला वाटला. विजूने लाईट लावले. हॉलभर भिरभिरलेली तिची नजर आई आणि अण्णांच्या फोटोवर स्थिरावली. क्षणात तिचे डोळे ओले झाले. हॉल,  स्वयंपाक, घर, आई-बाबांची खोली, दादा, विजू, तिची खोली, सगळं घर तिने फिरून घेतलं. जमिनीवरच्या धुळीत उमटणाऱ्या तिच्या पावलांबरोबरच अनेक आठवणींच्या पाऊलखुणा तिच्या मनावर उमटू लागल्या. त्यात माहेरपणाच्या आठवणी खूपच जास्त होत्या. 

माहेरपणाला आल्यावर घरात पाऊल ठेवता क्षणी छान, हलकं, निवांत वाटायचं. अगदी आईच्या उबदार कुशीत शिरल्यासारखं. नव्या नवरीपासून ते तिची मुलं होईपर्यंत. ती माहेरी यायला बाहेर पडताना नवरा नेहमी म्हणायचा, “माहेरी जायचं म्हणजे तुमच्या अंगात काय संचारतं देव जाणे!” 

माहेरी आल्यावर मग भावंडांबरोबर गप्पांचा फड रंगायचा. बाबा तिला आवडतात ते ते पदार्थ बनवायचे फर्मान आईला सोडायचे. आईची किती लगबग असायची. उन्हाळी सुट्टी असेल तर वाळवणाचे पदार्थ, मसाले, आंबे, आमसूल, लाडू आणि दिवाळीची सुट्टी असेल तर फराळाचे पदार्थ असं किती किती नि काय काय ती बांधून द्यायची. ती, दादा आणि विजू तिघांचीही लग्न झाली, त्यांना मुलं झाली आणि त्यानंतर माहेरी रहायला गेल्यावर होणारा कल्ला तर विचारूच नका.

 दोन्ही भावांची मुलं मोठी झाल्यावर त्यांनी त्या गावापासून थोडी दूर, नवीन जागेत प्रशस्त अशी स्वतःची घरं बांधली. दोन वर्षांपूर्वी प्रथम दादाने आणि त्यानंतर गेल्या महिन्यात छोट्या विजूने. गेल्या वर्षी बाबा आणि चार महिन्यांपूर्वी आई हे जग सोडून गेली. विजू नवीन घरी रहायला गेल्यावर, मूळ घर कायमचं भाड्याने  रहायला देण्याचा दादा आणि विजूने निर्णय घेतला होता. उद्यापासून भाडेकरू राहायला येणार होते. त्या अगोदर एकदा ते घर बघायला जावं, साफसफाई करून घ्यावी आणि आवश्यक ते सामान तिथून घेण्यासाठी आज ती आणि विजू तिथे आले होते.

आई बाबा गेल्यापासून तिच्या माहेरी येण्याला दुःखाची किनार असायची पण माहेरची ओढ काही कमी झाली नव्हती. तिच्या दोन्ही वहिनींबरोबर खूप जिव्हाळ्याचे संबंध होते.  गेल्या महिन्यात विजू त्याच्या बायको मुलांसकट नवीन घरात राहायला गेला. यावेळी माहेरी आल्यावर दोन दिवस दादाकडे आणि दोन दिवस विजूकडे राहिली. दोन्ही भावा आणि वहिनींनी तिला काही कमी केलं नसलं तरी काहीतरी चुटपूट, एक प्रकारची अस्वस्थता तिच्या मनाला जाणवत होती. काय होतंय हे तिचं तिला देखील कळत नव्हतं पण आज वेगळीच बेचैनी वाटत होती एवढं नक्की.

“सगळी साफसफाई झाली ना?” विजूने साफसफाईसाठी बरोबर आणलेल्या माणसाला विचारलं.

“हो!”

“ठीक आहे. आता इथून जे घ्यायचं आहे, ते सामान बांधायला सुरुवात करूया.” सामान बांधून झालं. सगळ्यात शेवटी आई आणि बाबांचा फोटो भिंतीवरून उतरवला गेला.

“हे फोटो मी नेते.” ती म्हणाली. तिने ते फोटो छातीजवळ घट्ट धरले. घरातून बाहेर पडण्याअगोदर एक वार तिने संपूर्ण घरावर नजर फिरवली. शेवटची. डोळ्यांवाटे तिने ते घर तिच्या मनात साठवून घेतलं. तिला आता ती वास्तु कायमची अंतरणार होती. 

दोन-तीन दिवस तिच्या मनात चालणाऱ्या चलबिचलतेचं, अस्वस्थतेचं उत्तर तिला आता मिळालं होतं. ते घर म्हणजे फक्त भिंती आणि छपरापासून बनलेला सांगाडा नव्हता. सुरुवातीची पंचवीस वर्षं वात्सलतेने तिचं संरक्षण करणारा, खिडकीतून नव्या जगाची स्वप्नं दाखवणारा, तिच्याइतकंच तिला आत बाहेर ओळखणारा, तिच्या अस्तिवाचा एक अदृश्य भाग होता. तिच्या माणसांच्या सहवासाचा दरवळ तिथल्या भिंतींना होता. काळानुरुप आणि आवश्यकतेनुसार घराची रचना बदलत गेली पण आत्मा तोच राहिला. प्रत्येक खपेला ती माहेरी आल्यावर आईच्या मायेने तिला जवळ घेणारा. 

आई बाबा नंतर आता या वास्तू बरोबर माहेरपणाचा आणखीन एक कंगोरा तिला कायमचा अंतरणार होता. यापुढे माहेरी यायचं झालं तर एकावेळी दोघांपैकी एका भावाकडे तिला जावं लागणार होतं. 

आता यापुढे कुणी विचारलं तर ती “माहेरी जाते” असं न  म्हणता “भावाकडे जाते” असं म्हणणार होती...


सोनाली परब

पालये-गोवा

(लेखक कथाकार, कवयित्री, निवेदक आहेत. प्रकशित साहित्य : 'ओळख' (कथासंग्रह) 

२०२३ साली प्रकाशित)