गोमंतकातील मराठी परंपरा : एक दृष्टिक्षेप


01st September, 12:06 am
गोमंतकातील मराठी परंपरा : एक दृष्टिक्षेप

सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त कोंकणी लेखक श्री. दामोदर मावजो यांच्या वक्तव्याने मराठी भाषा आणि साहित्याच्या क्षेत्रात प्रचंड खळबळ माजविली आहे. गोमंतकातील मराठी अस्मितेला डिवचण्याचे त्यांचे हे काम अत्यंत खेदजनक आहे असेच म्हणावेसे वाटते. मराठी ही कोंकणी प्रमाणेच गोमंतकातील स्वाभाविक भाषा आहे.  ती बाहेरुन आलेली परकी भाषा नसून ती कोंकणी प्रमाणेच गोमंतकाच्या भूमीची भाषा आहे ही गोष्ट पद्धतशीरपणे दुर्लक्षित केली गेली. तिचे साहित्य-संस्कृती-आध्यात्म यांतील श्रेष्ठत्व डावलून तिला राजभाषा न करता सहभाषेचा दर्जा दिला. तरीही गेल्या तीन दशकांहून अधिक काळ येथील मराठी आपल्या प्रकृतीने अभिवृद्ध होतच राहिली.     

 

सोळाव्या शतकानंतर पोर्तुगीजांच्या आडमुठ्या भाषिक धोरणामुळे गोमंतकातील देशी भाषा जतन करुन ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम तत्कालिन गोमंतकीयांनी केले त्यामुळेच महाराष्ट्रीतील अनेक शब्द जरी आज मराठीत कालबाह्य झालेले दिसत असले, तरी ते शब्द आजच्या गोमंतकी कोंकणीत मात्र तसेच वापरले जात असलेले दिसतात. उदा. यादवकालीन महाराष्ट्रीत वापरलेले उदक, सांज, फातोड, शीत, दादलो, बापुय असे कितीतरी शब्द आज कोंकणीतील प्रमाण शब्द आहेत. प्राचीन गोमंतकात असलेले महाराष्ट्री भाषेचे महत्त्व अधोरेखित करण्यास असे अनेक दाखले देता येतील.   

सक्तीच्या धर्मांतरानंतर  नवमिशनऱ्यांना  ख्रिस्ती धर्मतत्व समजून देण्यासाठी वा त्यांची पुराण श्रवणाची भूक भागविण्यासाठी परभाषिकांनाही ‘दौत्रिन क्रिस्ता’, ‘ख्रिस्तपुराण’ सारख्या ग्रंथाची रचना मराठीतूनच करावीशी वाटली, इतकेच नव्हे तर ग्रंथारंभी फादर स्टिफन्सला ‘मराठी प्रशंसा’ही लिहाविशी  वाटली या वास्तवाकडेही डोळेझाक करता येत नाही. 

सोळाव्या शतकात पोर्तुगीजांनी दमण, दीव, मुंबईसह वसई प्रांत, चौल, गोवा बेट असे आणखीही काही प्रदेश आपल्या ताब्यात घेतले असले तरी आजच्या उत्तर गोव्यातील पेडणे, डिचोली आणि सांखळी हे विभाग बरीच वर्षे सावंतवाडी संस्थानकडे होते. त्यामुळेच या भागात  प्रामुख्याने कोंकणपट्टीतील महाराष्ट्री भाषेचाच प्रभाव दिसत होता. त्याकाळातही सांस्कृतिक पातळीवर अखिल महाराष्ट्राप्रमाणेच कोंकण आणि नव्या  काबिजाजीत ‘ज्ञानबा तुकारामचा’ गजर सुरुच होता. धार्मिक कार्यांमध्ये संस्कृतबरोबरच मराठीचाही वापर होत होता. संपूर्ण कोंकणपट्टीत वाचिक व्यवहार प्रांतिक कोंकणीत होत असला तरी इतर कोंकण प्रदेशाप्रमाणेच लेखन, भाषण, नाटक, किर्तन अशा औपचारिक-सांस्कृतिक कामासाठी मराठीचा वापर गोव्यातही केला जात होता. विपरित राजकीय परिस्थितीतही खंड न पाडता अखिल गोमंतकीय मराठी साहित्यसंमेलने भरविली जात होती हेही सूर्यप्रकाशाइतके सत्य आहे.  

एकूणच गोमंतकात मराठीची परंपरा कोंकणी इतकीच प्राचीन आहे. आजही मराठी अस्मिता बाळगणारे, मराठी संस्कृतीचे अनुकरण करणारे, तिचे गोडवे गाणारे गोमंतकीय मराठीप्रेमी आपापसातील संवाद कोंकणीतच करतात. तसेच कोंकणी अस्मिताय बाळगणारे कट्टर कोंकणीप्रेमी आरत्या, भजन, मराठीतील संतमहंतांनी लिहिलेल्या रचनांची पारायणे करतात. मंदिरातील उत्सवांमध्ये मराठी नाटके सेवा म्हणून सादर करतात. बहुतेक हिंदू घरांमध्ये श्रावण महिन्यात भागवत सप्ताह, सत्यनारायण व्रत, गुरुचरित्र या मराठी ग्रंथांचे वाचन-पारायण केले जाते.  

शतक उलटून गेल्यानंतरही सातत्याने मराठीसाठी राबणारी गोमंतविद्या निकेतन सारखी संस्था आजही तितक्याच जोमाने कार्यरत आहे. स्वतंत्र गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांनी गावागावात मराठीच शाळा सुरु केल्या होत्या. मुक्तिनंतरही बराच काळ गोव्यात धार्मिक-सांस्कृतिक, साहित्यिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मराठीचेच अधिराज्य होते. भाषिक सर्वेक्षण केल्यास गोमंतकाचे आणि मराठीचे भावसंबंध किती जवळचे आणि शतकानुशतकांचे आहेत हे सहज लक्षात येते.

आजही कितीतरी विना अनुदानित संस्था, गट मराठी भाषेचे ऋण फेडण्यासाठी, मराठी साहित्य आणि भाषेची परंपरा जतन आणि संवर्धित करण्यासाठी  तळमळीने  झटत आहेत. अनेक नियतकालिके, लेखक आणि वाचक घडवित आहेत. गोमंतकातील मराठी ही आज बाहेरुन आलेली परकी भाषा नसून ती प्राचीन काळापासून कोंकणी प्रमाणेच स्वाभाविक भाषा आहे. ज्या काळात पोर्तुगीज सत्तेने या दोनही देशी भाषांवर बंदी आणून  गोमंतकाच्या संस्कृतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या त्या प्रयत्नांना उलथून पाडून आपल्या कोंकणी आणि मराठी भाषांशी निगडित असलेल्या संस्कृतीचे गोमंतकीयांनी जतन आणि संवर्धन केले हेही तितकेच सत्य आहे. 

गोमंतकीय समाजातील सौहार्दपूर्ण असे हे पारंपरिक भाषिक चित्र असताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविलेल्या, ज्ञानपीठासारख्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित झालेल्या श्री. दामोदर मावजोंनी गोमंतकातील मराठीलाच संपविण्याचा घाट घालावा ही गोष्ट अजूनही मनाला पटत नाही. गोमंतकातील ‘भारत’ वा तत्सम अनेक मराठी नियतकालिकांनी, संस्थांनी मराठीसाठी केलेले काम समोर असूनही अशा वक्तव्यांना काय म्हणावे? आज तीन दशके उलटल्यानंतर हा सहभाषेचा दर्जाही काढून घेण्याची मागणी करण्याची विपरित बुद्धी त्यांना का सुचावी याचे कोडे मात्र उलगडत नाही. 


विद्या प्रभुदेसाई