‘युपीएससी’साठी नेमके काय वाचावे?

‘युपीएससी’च्या दोन्ही परीक्षांसाठी अनेकविध विषय असतात. सामान्यज्ञान, भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, पर्यावरण, गणित, इंग्रजी, चालू घडामोडी असे. या विषयांचा अभ्यास करताना वाचन आणि मनन आवश्यक असते.

Story: यशस्वी भव: |
15th September, 12:25 am
‘युपीएससी’साठी  नेमके काय वाचावे?

‘युपीएससी’च्या दोन्ही परीक्षांसाठी प्रत्येक विषयाच्या स्पेशल नोट्स काढायच्या असतात. त्यामुळे एकंदरीत विषय वाचताना सर्वच्या सर्व गोष्टी लक्षात रहातात व त्याचा उपयोग होतो. उदाहरणार्थ, भारताचा स्वातंत्र्यलढा. या विषयाची सुरुवात ‘भारत’ देशापासून होते. भरत नावाच्या राज्याच्या गोष्टीपासून सुरुवात करावी लागते. त्यानंतर पुढे अनेक राजवटी आल्या, विस्तारल्या व लय पावल्या. त्यांचा इतिहासाचा क्रम लक्षात ठेवावा लागतो. त्यानंतर मुघल हा विषय घ्यावा लागतो. ज्या राजवटीमध्ये भारतात काही विशेष घडले याचाही आढावा घ्यावा लागतो. त्या विषयांवर आधारित प्रश्न येतात. मुघल साम्राज्य, शिवरायांचे स्वराज्य, अनेक लढे आणि इंग्रज पुढे आले, लढाया, पेशवाई यांची माहिती घ्यावी लागते. या विषयांसाठी युट्युबवर अनेक उपयुक्त माहिती उपलब्ध विदयार्थ्यांना होऊ शकते. इन्सायक्लोपिडीया आणि गुगलवर देखील यांचा ऊहापोह आहे. परंतु सर्वच्या सर्व गोष्टी अगदी खऱ्या असतीलच असे नाही त्यामुळे NCERT पाठ्यपुस्तकातून यातील खरेपणाची खातरजमा करून घ्यावी, सनसनावळ व विशिष्ट घटना यांचा क्रम लक्षात घ्यावा, ऐतिहासिक तह व त्याचे परिणाम यांचाही समन्वय साधणे गरजेचे आहे. 

१८५७ नंतरच्या लढ्यानंतर व त्या आधीच्या राजकीय परिस्थितीचा अभ्यास असणे गरजेचे आहे. महात्मा गांधीच्या आधी व गांधींच्या नंतरचा इतिहास लक्षपूर्वक वाचणे गरजेचे आहे. १९४७ नंतरचा इतिहास व आधीची पार्श्वभूमी अभ्यासणे गरजेचे आहे. जालियनवाला बाग, खिलाफत चळवळ तसेच फाळणीपूर्व व आधीची राजकीय पार्श्वभूमी अभ्यासणे गरजेचे आहे. www.mrunal.org या संकेतस्थळावरील माहिती घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यानंतर भारतातील स्थित्यंतरे, आणीबाणी, पंचवार्षिक योजना व त्यांची कार्यवाही या महत्त्वाच्या गोष्टी अभ्यासल्या पाहिजेत. स्वातंत्र्यानंतरची विज्ञान व तंत्रज्ञानाचा विकास व त्याची परिणाम समजून घ्यावे लागतील. सरकार व त्यांची कार्यप्रणाली यावर विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. क्रांतिकारी सरकारी योजना, तसेच लाभार्थी यांचा अभ्यास उपयोगी पडतो, त्याकाळातील परराष्ट्रीय धोरणे, विकासाची कामे, तह व करार अणुविषयक धोरणे यांचा अभ्यास होणे आवश्यक आहे. या उल्लेख केलेल्या सर्व गोष्टी अभ्यासणे, मुळातून त्या माहीत असणे आवश्यक आहे. 

एकदा विषय व इतिहास नीट कळाला की आकलन पटकन होते. श्री लक्ष्मीकांत यांचे ‘Indian Polity’ हे पुस्तक वाचनात ठेवावे. यातील संदर्भ व सूचीवर थेट प्रश्न प्रिलिम्स व मेन्स परीक्षेत विचारले जातात. भारताचे स्वातंत्र्यपर्व, घटना समिती, मसुदा समिती यांचे गठन करणे अनिवार्य आहे. ‘युपीएससी’साठी हे वरील विषय अतिशय आवश्यक आहेत व या विषयांवरील अभ्यास मुलाखतीसाठी खूप उपयोगी पडतो.


- अॅड. शैलेश कुलकर्णी

कुर्टी - फोंडा

(लेखक नामांकित वकील आणि 

करिअर समुपदेशक आहेत.)