राष्ट्रनिर्मिती आणि शिक्षक

समाज व राष्ट्र घडवायचे काम शिक्षणातून होत असते, मात्र समाज घडवायचा म्हणजे नेमके काय करायचे? त्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही. सध्याच्या बाजारीकरणाच्या काळात इतर कोणत्याही व्यवस्थेत परिवर्तन घडण्याची शक्यता नाही. त्याकरीता शाळा, तेथे सुरू असणारी शिक्षण प्रक्रिया आणि समृद्धतेची वाट चालणारे शिक्षक हाच एकमेव मार्ग असल्याचे जगाने मान्य केले आहे.

Story: वेध |
01st September 2024, 04:52 am
राष्ट्रनिर्मिती आणि शिक्षक

शिक्षण क्षेत्रात गेली काही वर्ष सातत्याने संघर्ष वाढता आहेत. शासन आणि शिक्षक संघटना, प्रशासन आणि शिक्षक संघटना यांच्यातील संघर्षात होणारी वाढ चिंताजनक आहे. बदलापूरच्या घटनेनंतर शाळाही सुरक्षित नाहीत, असे चित्र निर्माण झाले आहे. ज्या शिक्षण प्रक्रियेने समाज आणि राष्ट्रात शांतता निर्माण करायची ते शिक्षण क्षेत्र आज अशांततेची वाट चालते आहे. शिक्षणात अनपेक्षित अशा अनेक घटना घडत आहेत. लवकरच शिक्षक दिन साजरा होईल. त्यानिमित्ताने कौतुकाच्या शब्दांची उधळण होईल.  शिक्षकांना गौरवण्यात येईल. विविध सामाजिक संघटना देखील सन्मान करतील. मात्र वर्तमानात शिक्षकांचा खरंच सन्मान होतो आहे का? अंतरिक प्रेमाने शिक्षकांचा गौरव होत नसेल तर त्यात शिक्षकांपेक्षा समाजाचे नुकसान अधिक आहे.  त्याचवेळी समाजाला शिक्षकांचा गौरव करावा वाटत नसेल तर त्याबद्दलही आत्मपरीक्षणाची गरज आहे. 

जागतिकीकरणानंतर सारेच बिघडले आहे असे म्हणून शिक्षणाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. शिक्षणात कार्यरत असलेल्या मनुष्यबळाला पुन्हा समाजमनाचा विश्वास प्राप्त करण्याचे आव्हान आहे. शिक्षणाचे झालेले बाजारीकरण थांबवण्याबरोबर हरवलेली विश्वासार्हता प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. शिक्षणाच्या बाजारीकरणामुळे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या नात्यातील बंध देखील सैल झाले आहेत. ग्राहक आणि विक्रेते हे नाते शिक्षणासाठी पूरक ठरणारे नाही.  शिक्षणाच्या  ध्येय आणि उद्दिष्टांच्या दिशेने  प्रवास केल्याशिवाय आपणाला भारताचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी अपेक्षित केलेल्या स्वप्नपूर्ततेच्या दिशेने प्रवास करणे शक्य होणार नाही. 

समाज व राष्ट्र घडवायचे काम शिक्षणातून होत असते, मात्र समाज घडवायचा म्हणजे नेमके  काय करायचे? त्यासाठी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था नाही. सध्याच्या बाजारीकरणाच्या काळात इतर कोणत्याही व्यवस्थेतून परिवर्तन घडण्याची शक्यता नाही. त्याकरीता शाळा, तेथे सुरू असणारी शिक्षण प्रक्रिया आणि समृद्धतेची वाट चालणारे शिक्षक हाच एकमेव मार्ग असल्याचे जगाने मान्य केले आहे. समाज हा उत्तम नागरिकांनी निर्माण होत असतो. उत्तम समाज असेल तरच राष्ट्र उभे राहात असते. शिक्षणातून नागरिक घडवायचा आहे.  त्यासाठी शाळांशाळांमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देण्याचे काम करणे अपेक्षित आहे.  उत्तम नागरिक निर्माण करायचे म्हणून कायदे केले म्हणजे ते घडेल असे होणार नाही. मुळात त्यासाठी मने घडवावी लागतात. ती मने केवळ शिक्षणातून घडत असतात. सद्गुणी, सद्विचारी माणसं म्हणजे उत्तम समाजाच्या निर्मितीची पाऊलवाट असते. ज्या देशात शिक्षण उत्तम आणि गुणवत्तापूर्ण असते तेच देश प्रगती करत असतात. जगाच्या पाठीवर विकासाची झेप घेणारे आणि प्रगती साधलेले जे प्रगत देश आहेत त्यातील सर्वच देशांनी शिक्षणाला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यामुळे शिक्षण प्रभावी आणि परिणामकारक व्हावे असे वाटत असेल तर तेथील शिक्षक अधिक चांगले असणे अपेक्षित असतात. आपल्याला खरोखर ज्ञानाधिष्ठित समाज निर्माण करायचा असेल तर त्याकरिता तेथे कार्यरत असलेले मनुष्यबळ हे अधिक  ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ आणि समाजनिष्ठ असण्याची गरज आहे.

 मुळात समाजाला उन्नत करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनात स्वप्ने पेरण्याची गरज असते. ते काम शिक्षकच करू शकतात. शिक्षक  ज्ञानाधिष्ठित असतील तरच विद्यार्थी ज्ञानाची वाट चालण्याची शक्यता असते. त्यामुळे शिक्षक कसे आहेत  त्यावरच समाजाची उंची अवलंबून असते.  शिक्षक ज्ञानसंपन्न असेल तरच विद्यार्थ्यांच्या मनात ज्ञानसाधनेची आस्था निर्माण होऊ शकते. 

वर्तमानातील विविध सर्वेक्षणात प्राथमिकपासून उच्च शिक्षणापर्यंत ही वाट काहिशी कठीण होत चालली असल्याचे समोर येते आहे. असं म्हटले जाते की, शस्त्र हाती घेऊन लढाया केल्या तर आपण प्रदेश जिंकू शकू, पण हदय कशी जिंकणार?  सत्तेच्या जोरावर कोणालाही प्रशासन करता येईल पण त्या शक्तीच्या जोरावर आपण माणूस उभा करू शकणार नाही. पैशाच्या जोरावर माणूस विकत घेता येईल, पण निष्ठा कशी विकत घेणार? हा प्रश्न आहे. त्यामुळे शिक्षणातून समर्पण भावनेची माणसं हवी आहेत. आपल्याला ज्ञानसंपन्न शिक्षकांप्रमाणे उन्नत आणि समृद्धतेची वाट चालणा-या शिक्षकांची अधिक गरज आहे. 

मूल्यांची वाट चालणारी माणसं शिक्षणात आली नाहीत तर शिक्षणाचा प्रवास सुयोग्य दिशेने घडण्याची शक्यता अजिबात नाही. एका भारतीय शास्त्रज्ञांनी बेंगलोर येथे शाळा सुरू केली होती. त्यांना शाळेसाठी शिक्षक भरायचे होते. त्यासाठी त्यांनी जाहिरात दिली होती. निश्चित केलेल्या दिवशी अनेक उमेदवार मुलाखतीसाठी आले होते. मुलाखत झाली की, संबंधित संस्थेच्या वतीने उमेदवाराने जाण्या येण्याचे भाडे दिले जाणार होते. मुलाखत झाली की, संबंधितांनी तेथील क़ार्यालयात जाऊन बिल घ्यायचे होते. त्याप्रमाणे येणारा प्रत्येक उमेदवार करत होता. मुलाखती संपत आल्या. मुलाखत घेणारे शास्त्रज्ञ बाहेर आले. त्यांनी दुपारी मुलाखत घेतलेला एक उमदेवार अजूनही तेथेच उभा होता हे पाहिले. त्यांची मुलाखत होऊन बराच वेळ झाला होता. त्याच्या सोबतचे असलेले अनेक उमदेवार निघून गेले होते. हा उमेदवार मात्र बराच वेळ तेथेच घोटाळत होता. अखेर त्याला बोलावत स्पष्ट सांगितले की, तुमची मुलाखत फारशी चांगली झाली नाही. तुम्ही आमच्या अपेक्षांना उतरलेले नाहीत.  त्यामुळे तुम्ही मुलाखतीत उत्तीर्ण झाला नाहीत, तुम्हाला जाण्यास सांगितले आहे तरी तुम्ही का थांबला आहात ? 

खरंतर त्यांच्या बोलण्यात संताप होता. त्यांचे बोलणे झाल्यावर तो उमेदवार म्हणाला  सर, तुम्ही जायला सांगितले, तेव्हाच मी निघालो होतो; पण तुमच्या कॅशिअरने मला जाण्या येण्याचे जे भाडे दिले आहे ते झालेल्या खर्चापेक्षा अधिक आहेत. त्यामुळे ते परत देण्यासाठी थांबलो आहे. त्यांना विनंती केली, पण ते थांबा म्हणाले आहेत. 

 हे ऐकल्यावर वैज्ञानिकांना धक्काच बसला. मग त्यांनी पुन्हा त्यांना आत बोलावले.  आपल्याला माघारी जाण्यास सांगितले असताना परत कशाला आत बोलावले असेल ? असा प्रश्न पडला उमेदवाराला पडला होता.  आत गेल्यावर उमदेवाराला बसण्यास सांगितले आणि हा घ्या तुमचा नियुक्तीचा आदेश. आता केव्हापासून जॉईन होता, असे विचारले !  तात्पर्य इतकेच की, शिक्षक केवळ ज्ञानवंत असूनही उपयोगाचा नाही तर तो प्रामाणिक देखील असावा लागतो. त्याच्यामध्ये सद्गुणाचा परिपोष असावा लागतो. माणूस म्हणून आवश्यक असलेल्या सर्व गुणांनी युक्त तो असावा अशी समाजाची अपेक्षा असते. त्यामुळे शिक्षकाने थोडीशी जरी चूक केली तरी समाजाच्या डोळ्यात भरते. याचे कारण त्याच्यावरच राष्ट्राचे भविष्य अवलंबून असणार आहे.  शिक्षकांच्या अंगी असलेल्या गुणांचा परिणाम विद्यार्थ्यांच्या मनावर होत असतो. आपल्याला उद्याचा भारत कसा हवा आहे ? त्याची पेरणी शाळांमधील शिक्षक करत असतात म्हणून शिक्षकाची उंची इतरांपेक्षा अधिक असावी असे म्हटले जाते. ही उंची तर त्यांना अध्यापनातून लाभत असते. 

सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणत असत की, तुम्ही काय शिकवता याकडे विद्यार्थी फारसे पाहणार नाहीत. मात्र तुम्ही तुमच्या अध्यापनातून जो आदर्श उभा करता त्याकडे विद्यार्थी काळजीपूर्वक पाहत असतात. त्यामुळे अध्यापनातून आदर्श उभा करण्याचे स्वतंत्र प्रज्ञेचे सामर्थ्य, प्रतिभा शिक्षकांकडे असायला हवी.  त्याचं वाचन प्रचंड असायला हवे. चिंतन असायले हवे. विश्लेषणाची शक्ती असायला हवी. त्याचे आचार, विचाराची वाट योग्य असायला हवी. आत्मविश्व ठासून भरलेला असायला हवा. ज्ञान, चिंतन, मननाच्या शक्तीमुळे स्वतःची शैली त्यांने विकसित केलेली असायला हवी. त्याच्या ज्ञानाच्या प्रकाशाने विद्यार्थी दिपून जायला हवेत. शेवटी विद्यार्थी जो घडतो तो शिक्षकांच्या प्रतिमा आणि प्रतिभेच्या जोरावर. त्यामुळे प्रतिभावान शिक्षकांची अपेक्षा समाज करत आलेला आहे. इतिहासातही अपेक्षा होती आणि आजही तिच अपेक्षा आहे. ही वाट चालण्याचा प्रयत्न झाला तर पुन्हा सन्मान प्राप्त करणे शक्य आहे. ही वाट सोपी नाही. मात्र ती चालली नाही तर उद्याचे उत्थान देखील घडणार नाही. समाजाने आपल्याला सन्मान द्यावा असे वाटत असेल तर शिक्षकांच्या ज्ञानाची उंची समाजाच्या कितीतरी पट पुढे असायला हवी. ती जितकी अधिक असेल तितका सन्मान अधिक मिळेल यात शंका नाही.


संदीप वाकचौरे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ