रेडिओचा तो सुवर्ण काळ

रेडिओ हे मनोरंजनाचं, लोकशिक्षणाचं व माहिती म्हणजे बातम्या प्रसारित करण्याचं एक शक्तीशाली माध्यम बनलं होतं. त्या काळी आमच्या व्यक्तिमत्त्वाची, आमच्या सामान्य ज्ञानाची घडण त्या संस्कारातून झाली.

Story: ये आकाशवाणी है |
15th September, 12:35 am
रेडिओचा तो सुवर्ण काळ

आमच्या लहानपणी रेडिओ हे एकमेव मनोरंजनाचे साधन होते. टीव्ही नव्हता. १९६९ साली मी सहा वर्षांचा होतो. आजोळी होतो. प्रियोळला. एका कपाटावर उंचावर रेडिओ ट्रान्सिस्टर होता. मोठ्ठा. त्याला पांढरे किती तरी प्लॅस्टिक बटण होते. 

आमचा मामा तिथं उभं राहून हात उंचावून ते बटण कट्-कट् करून दाबायचा. एक वर्तुळावर मोठे बटण असायचे. ते फिरवले की स्टेशन बदललं जायचं. खरखरत नव्हतं असं नाही. टीव्ही युग अवतरलं तेव्हा आरंभीच्या काळात एन्टेना असायचा तसाच रेडिओला एरियल असायचा. आताच्या पिढीला एन्टेनाही माहीत नसेल आणि रेडिओची एरीयलही.   

 

कोंकणी कार्यक्रम पणजीहून यायचे. प्रादेशिक खबरो संध्याकाळी असायच्या. दत्ता कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे, इंदूमती काळे आपल्याला बातम्या देत आहे हे मराठी वृत्तनिवेदनाचे आवाज घरचेच झाले होते. इंग्रजी, हिन्दी बातम्या असायच्या. 

गाजत होतं ते बिनाका गीतमाला. नंतर झालं सिबाका गीतमाला. अमीन सायानीने हा कार्यक्रम जगभर लोकप्रिय केला. त्यांचा आवाज व मोड्यूलेशन इतकं गोड व लाघवी होतं की थेट हृदयात रूतत असे. या विषयावर सविस्तर नंतर कधी तरी. 

रेडिओची मक्तेदारी होती त्या काळी. रेडिओला वाहनासारखं लायसन्स लागायचं हे ऐकून आजच्या पिढीला गंमतच वाटेल. ते पंचायत वा नगरपालिकेकडून मिळवायचे सायास असायचे. आम्हा मुलांना रेडिओतील आवाज येतो कुठून? हे जबरदस्त कुतूहल असे. 

हिंदी फिल्मी गाणी जबरदस्त असायची. ती जिभेवर खेळू लागली. दृश्यचित्रे समोर नाचायची. ‘ये नीले गगन के तले, धरती का प्यार तले...’ हे गीत लागल्याबरोबर त्या गीताची, संगीताची आपली जुनी ओळख आहे असे का वाटे समजत नाही. नीला गगन, धरती ही दृश्ये डोळ्यांसमोर नाचत. दर गुरूवारी ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘माझी देवपूजा पाय तुझे गुरूराया’ अशी दत्तभजने लागायची. माझ्या आजोबांची आवडती. ते ही भजने गुणगुणत असायचे. आता गुरूवारी ही भजने का लावत नाहीत? हे कळायला मार्ग नाही. असो!

क्रिकेटची कॉमेंट्री म्हणजे धावतं वर्णन ही एक पर्वणीच होती. आम्ही लहान होतो, म्हणून आनंद सटलवाजची इंग्लिश कमेंट्री कळत नसायची. पण “विश्वनाथने चौकार मारला!” असं मामा सांगायचे व जोरजोरात टेबलावर हातातील कुळागरातील पोवली बडवत राहायचे. आम्हीही “फोर!” म्हणून उड्या मारायचो. त्या समालोचकाची मिमिक्री करायचो. आनंदाची कारंजी उसळायची. इंग्लंडचा फलंदाज बाद झाल्यावर आम्ही आमची माडाच्या पिरड्यापासून केलेली बॅट बसण्याच्या सोप्यावर बदडून आनंद व्यक्त करत असू. क्रिकेट स्कोअर समजायला रेडिओ हे एकमेव साधन होतं. नंतर रात्री बातम्यातून कळे. 

त्या काळी रेडिओ विक्री दुकाने होती. त्यात वेगवेगळ्या आकाराचे ट्रान्सिस्टर असायचे. सगळ्यांत लहान ट्रान्सिस्टर हा गाड्यांवर दिसायचा, किंवा लहान पुस्तकाच्या आकाराचा ट्रान्सिस्टर असायचा. हॉटेलात रेडिओ चालू असायचा. गाड्यावर तर रेडिओ चालूच असायचा. बॅटरीवरचा. गाणी, बातम्या चालूच असे.

“ये आकाशवाणी का पंचरंगी कार्यक्रम है, विविध भारती” असा भारदस्त bass, baritone मंद्र खर्ज आवाज कानी पडायचा. तो आवाजच जादुई होता. रेडिओ म्हणजे फक्त आवाजाची दुनिया. कंठाचं विश्व. निवेदन अथवा गाणी. चर्चात्मक कार्यक्रम असायचे. ‘टॉक’ म्हणजे भाषणं असायची. सर्व भाषांतील भाषणं प्रसारित व्हायची. अशा प्रकारे रेडिओ हे मनोरंजनाचं, लोकशिक्षणाचं व माहिती म्हणजे बातम्या प्रसारित करण्याचं एक शक्तीशाली माध्यम बनलं होतं. त्या काळी आमच्या व्यक्तिमत्त्वाची, आमच्या सामान्य ज्ञानाची घडण त्या संस्कारातून  झाली. 

आकाशवाणीच्या अनुभवाच्या असंख्य कवडशांकडे पुढील भागात न्याहाळू.  


 मुकेश थळी, (लेखक बहुभाषी साहित्यिक, अनुवादक, कोशकार असून आकाशवाणीचे निवृत्त वृत्तनिवेदक आहेत)