मोदक प्रिय श्री गणराया

Story: स्वस्थ रहा, मस्त रहा |
15th September, 12:16 am
मोदक प्रिय श्री गणराया

आम्हा सर्वांचं प्रिय दैवत, बुद्धीदाता गणरायाचं आगमन तुम्हा सर्वांच्या घरात झालं आहे. प्रत्येक शुभकार्याच्या प्रारंभी श्री गणेशाचे पूजन केले जाते कारण श्री गणेश विघ्नहर्ता आहे, म्हणजे सगळ्या संकटांचा नाश करणारा आहे. गणपती बाप्पाचे आगमन झाल्यानंतर आपण त्याला छान आरास केलेल्या देवघरात स्थापन करून  विधिवत पूजन करतो आणि गणेशाला आवडतील अशा सर्व गोष्टी अर्पण करतो. गणेशाला प्रिय असलेल्या दूर्वा, लाल जास्वंदीचे फूल आपण अर्पण करतो, गणरायाची स्तुती करणाऱ्या आरत्या, गणपती स्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष या स्तोत्रांची आवर्तने सुद्धा केली जातात. आणि सर्वात महत्त्वाचे श्रीगणेशाला प्रिय असलेले मोदक नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. मोदक तुम्हाला सुद्धा खूप आवडतात ना? तुम्हाला माहीत आहे का की गणपतीला मोदक एवढे का आवडतात?

गणपतीचा ‘मोदक प्रिय’ असा नामोल्लेख सुद्धा केला जातो

‘मोद’ म्हणजे आनंद.  मोदक या शब्दाचा अर्थ होतो ‘आनंद देणारा’.

गोव्यात मोदक पारंपरिक पद्धतीने उकडून व तळून अश्या २ प्रकाराने केले जातात.

उकडीचे मोदक तांदळाच्या पीठाची पारी व ओलं खोबरं गूळ, वेलची, काजू, बदाम असा सुकामेवा घालून सारण बनवून तयार केले जातात. हे मोदक दिसायला सुद्धा सुबक आणि सुंदर असतात. गरम गरम मोदकावर साजूक तुपाची धार असता बुद्धीची वाढ होते, शरीराला पुष्टी प्रदान होते, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते, त्वचा मऊ तुकतुकीत राहायला मदत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे मऊ, लुसलुशीत मोदक खाऊन आपल्याला आनंद मिळतो. 

तळणीचे मोदक हे मैदा आणि कणिक वापरून तयार केलेल्या पारीत, गुळ खोबरे, साखर, वेलची पूड, काजू किंवा डाळीचे पुरण भरून केले जातात. तेलात तळलेले असल्यामुळे पचायला थोडे जड असतात. गुळ खोबऱ्याचं सारण असल्यामुळे हे मोदक सुद्धा बुद्धिवर्धक, पुष्टी प्रदान करणारे, चविष्ट, कुरकुरीत आणि आनंद देणारे असतात. 

गणपतीची छान पूजा करून, मोदकांचा नैवेद्य अर्पण करा व श्रीगणेशाच्या पूजेचा प्रसाद म्हणून पुष्टीदायक मोदकांचा आस्वाद घ्या. बुद्धीदाता श्रीगणराया सर्वांना बुद्धी, आनंद व आरोग्य 

प्रदान करो अशी श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना करूया.


वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य