आशूचा निबंध

Story: छान छान गोष्ट |
15th September, 12:08 am
आशूचा निबंध

आशू पहिल्यांदाच आपल्या मम्मीबरोबर दोडामार्गच्या आठवडा बाजाराला गेली. रविवार असल्याने शाळेला सुट्टी होतीच, शिवाय तिला बाजार कसा असतो? तिथे विक्रीला कोण कोण, काय काय घेऊन येतात? बाजारातल्या गमतीजमती बघायच्या होत्या. त्याला कारणही तसंच होतं.

मराठीच्या बाईंनी त्यांना ‘बाजारातील एक दिवस’ यावर निबंध लिहायला सांगितला होता. राज्य पातळीवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. आलेल्या निबंधामधून उत्कृष्ट निबंध स्पर्धेसाठी पाठवला जाणार होता. त्यामुळे आपला निबंध चांगला व्हावा असं तिला वाटत होतं. म्हणून प्रत्यक्ष बाजारात जाऊन तिला सगळा अनुभव घ्यायचा होता. 

तिला आईने बाजाराला जाऊ म्हणून सांगितल्यापासून ती भलतीच खुशीत होती.  रविवार असूनही ती लवकर उठली कारण वाटुळवाडीतून सकाळी एकच बस दोडामार्गला जात होती. त्यानंतर दुपारी. दिवसातून फक्त दोनवेळा बस. मधल्यावेळेत मग जे काही मिळेल त्याने दोडामार्ग गाठायचं. तिचे पप्पा गोव्यात एका कंपनीत शिपाईची नोकरी करत होते. त्यांची सोमवारची आठवडी सुट्टी. त्यामुळे ते रविवारी रात्री घरी येत. पुन्हा मंगळवारी भल्या पहाटे कामावर निघायचे.

विर्डीहून बसगाडी वाटुळवाडीत आली. इतर प्रवाशांबरोबर आशू आणि तिची मम्मी बसमध्ये चढली. आशूला नेमकी खिडकीजवळची सीट मिळाली. ती भलतीच खूश झाली. वीस पंचवीस मिनिटांच्या प्रवासात तिला खिडकीतून बाहेरचं जग पाहता येणार होतं. 

गाडी तळेखोल, वझरे या दरम्यानचे प्रवासी घेत दोडामार्गला पोचली. आशू आपल्या मम्मीसह उतरली. आशूची भिरभिरती नजर सगळं दोडामार्ग डोळ्यात साठवून घेत होती. मम्मीकडची एक पिशवी तिने मुद्दाम आपल्या हातात धरली होती. मम्मी जे सामान घ्यायची त्यातलं हलकं काही असेल तर ती आशू आपल्याकडच्या पिशवीत टाकी. 

भेंडी, कोबी, गवार, कोथिंबीर, आलं, लसूण, मिरची, कांदे, बटाट, टमाट, अशी भाजी घेतली. सुके बांगडे, भोबशी, गालमो घेतला. वाटाणे, मूग, मसूर डाळ, मूग डाळ घेतली. आशूला आवडतात म्हणून शेंगदाण्याचे लाडू, टोस्ट असं बरचसं सामान घेतलं. 

या दरम्यान आशू हळूच एक गोष्ट करत होती ती म्हणजे, आपण कुठे कुठे जातोय, कोणाकडून काय घेतोय ते सगळं एका कागदावर टिपून ठेवत होती आणि नेमकी या गडबडीत तिची मम्मी पुढे निघून गेली. एका क्षणाला तिच्याही लक्षात आलं नाही की आपल्यासोबत आशू नाही आहे.

काही वेळाने आशूने कागदातून डोकं वर काढलं आणि पाहते तर मम्मी तिच्या बाजूला नाही. तिने आजूबाजूला पाहिलं पण मम्मी कुठे दिसेना. आपण हरवलो, मम्मीला कुठे शोधायचं, आपल्याला घरी कसं जाता येणार... ती भांबावून गेली. भीतीने थरथरू लागली. तिने तिथल्या भाजीवालीला सगळी हकीगत सांगितली. त्या भाजीवालीने तिला धीर दिला आणि तिला आपल्या जवळच ठेवून घेतले. आशूची मम्मी परत तिला शोधत तिथे येईल असं तिला वाटलं असावं आणि तसंच झालं. पुढच्याच दहा मिनिटात आशूची मम्मी घाबरीघुबरी, रडवेली होऊन तिला शोधत भाजीवालीजवळ आली. आशूला तिथे पाहून तिचा जीव भांड्यात पडला. 

त्यानंतर उरलं सुरलं सामान खरेदी केलं, आशूला आईस्क्रीम खायला घातलं. तोवर परतीच्या बसची वेळ झाली. या दरम्यान आशूने निबंधासाठी लागणारी आवश्यक ती बरीच माहिती जमवली होती. तिचा आत्मविश्वास वाढला. 

घरी आल्यानंतर जेवणं झाल्याझाल्या ती निबंध लिहायला बसली. ती आपल्या सर्व अनुभवांना शब्दरूप देत होती. निबंध लिहून झाला. तिने परत दोन वेळा तो वाचून पहिला. आवश्यक तिथे दुरुस्त्या केल्या आणि दुसऱ्या दिवशी तिने निबंध शाळेत नेऊन दिला. 

अशूच्या निबंधाबरोबरच इतर अजून बऱ्याच विद्यार्थ्यांचे निबंध निवडीसाठी आले होते. शिक्षिकेने सर्व निबंध वाचले, तपासले आणि शेवटी आशूचा निबंध राज्यपातळीवरील स्पर्धेसाठी पाठवला. 

काही दिवस गेले आणि एक दिवस शाळेत पत्र आले. त्यात नमूद केले होते की राज्यपातळीवरील स्पर्धेत आशू देविदास विर्डीकर हिने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला.  आशूला ही बातमी कळताच आनंद झाला. 

बाजाराच्या दिवशी आपल्या वाट्याला आलेले अनुभव तिने निबंधाच्या माध्यमातून अशा काही प्रकारे मांडले होते, की तिला त्यातून आपण एखादा विषय कल्पकतेने मांडू शकतो हा आत्मविश्वस वाटू लागला आणि तिने 

आपले लेखन कौशल्य पुढे अखंडितपणे सुरूच ठेवले. 


चंद्रशेखर गावस