पणजी : गेले काही महिने इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यातील किरकोळ महागाई दरात हा सर्वांत कमी होता. मात्र ऑगस्ट महिन्यात गोव्यातील किरकोळ महागाई दरात किंचित वाढ झाली आहे. ऑगस्टमध्ये गोव्यातील किरकोळ महागाई दर ३.०४ टक्के राहिला. महागाई दर कमी असण्याच्या यादीत गोवा देशात ९व्या स्थानी राहिला. केंद्रीय सांख्यिकी आणि अमंबजावणी खात्याने जारी केलेल्या अहवालानुसार ही माहिती मिळाली आहे.
ऑगस्ट महिन्यात भाजीपाला, अन्न धान्य, इंधन, कपडे आदी वस्तूंच्या किमतीत वाढ झाल्याने गोव्यासह संपूर्ण देशातील महागाई दर किंचीत वाढला आहे.
अहवालानुसार सर्वांत कमी महागाई दर सिक्कीममध्ये होता. येथे ऑगस्टमधील महागाई दर केवळ ०.७७ टक्के होता. यानंतर तेलंगणा (२.०२ टक्के), उत्तराखंड (२.३७ टक्के), हिमाचल प्रदेश (२.६६ टक्के), मिझोरम (२.७६ टक्के), झारखंड (२.८६ टक्के), पंजाब (२.९५ टक्के), आंध्र प्रदेश (२.९३ टक्के), कर्नाटक (२.९९ टक्के), गोवा (३.०३ टक्के) राजस्थान (३.०७ टक्के), मध्य प्रदेश (३.२१ टक्के), जम्मू आणि काश्मीर (३.३ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
संपूर्ण देशाचा विचार करता जुलै तुलनेत ऑगस्ट महिन्यातील ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ महागाई दर किंचीत वाढला आहे. जुलैमध्ये महागाई दर ३.५४ टक्के होता. ऑगस्टमध्ये तो वाढून ३.६५ टक्के झाला आहे. रिझर्व्ह बँकेने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी किरकोळ महागाई दर ४.३ टक्के राहिल, असा अंदाज व्यक्त केला आहे. हा दर ४ टक्क्यांपेक्षा जास्त असू नये हे आरबीआयचे लक्ष्य आहे. या आर्थिक वर्षात सलग दोन महिने हा दर आरबीआयच्या निर्धारित दरापेक्षा कमी आहे.
ऑगस्ट महिन्यात देशात सर्वाधिक ६.९७ टक्के महागाई दर त्रिपुरामध्ये होता. त्यानंतर बिहार (६.६२ टक्के), ओडिशा (५.६३ टक्के), मणिपूर (५.२३ टक्के), आसाम (५.०३ टक्के), उत्तर प्रदेश (४.८९ टक्के), हरियाणा (४.१२ टक्के), केरळ (४.१ टक्के), छत्तीसगढ (३.७९ टक्के), पश्चिम बंगाल (३.७३ टक्के) यांचा समावेश आहे. केंद्रशासित प्रदेशांचा विचार करता, दिल्ली येथे महागाई दर सर्वांत कमी म्हणजे २.५२ टक्के होता.