अमेरिकेत मंदीची लाट निर्माण झाल्यास युरोप, आशियामध्येही पडसाद उमटतील. अतिरेकी प्रवृत्तीच्या हैदोसामुळे बांगलादेशाची अर्थव्यवस्था अडचणीत येणार आहे. तेथील परिस्थिती निवळणे तसेच भारत आणि बांगलादेशामध्ये सलोख्याचे संबंध प्रस्थापित होणे अत्यावश्यक आहे.
अमेरिकेतील रोजगारवाढीची मंदावलेली गती आणि होणारी व्याजदर कपात यामुळे जगभरच्या बाजारपेठांमध्ये विलक्षण अस्थिरता निर्माण झाली आहे. मंदीची भीती उत्पन्न झाल्यामुळेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह बँक व्याजदरांना कात्री लावणार, हे स्पष्ट झाले आहे. व्याजदर कमी झाल्यास अमेरिकेतील उद्योजक अधिक गुंतवणूक करण्यास उद्युक्त होतील आणि त्यामुळे उत्पादन विस्तार होऊन लोकांना नोकऱ्या मिळतील, असे अमेरिकन प्रशासनाला वाटत आहे. परंतु यातून मंदीची लाट निर्माण झाल्यास त्याचे पडसाद युरोप आणि आशियामध्येही उमटतील, यात शंका नाही. भारताचा शेजारी देश असलेल्या बांगलादेशामध्ये अतिरेकी प्रवृत्तींचा हैदोस सुरू असून यामुळे तेथील अर्थव्यवस्थेची वाट लागणार आहे. बांगलादेशातील वस्त्रोद्योगाची गेल्या दशकभरात चांगली भरभराट झाली आहे. जगात बांगलादेशमधील तयार कपडे आणि वस्त्रप्रावरणे लोकप्रिय आहेत. परंतु हिंसक घटनांमुळे तेथील वस्त्रोद्योग कंपन्या हेलपाटून गेल्या असून त्याचा फायदा भारताला होईल हे नक्की. परंतु चीन आणि व्हिएतनाम हे देशही वस्त्रोद्योग क्षेत्रात भारताचे स्पर्धक आहेत, हे विसरता येणार नाही. शिवाय २०२३-२४ मध्ये भारतातून बांगलादेशाला १२२ कोटी डॉलर किमतीचे सूत निर्यात करण्यात आले होते. बांगलादेशातील वस्त्रोद्योग कारखाने बंद पडले व तेथील उत्पादन कमी झाले, तर हे सूत घेणार कोण? त्यामुळे बांगलादेशमधील घटनांचा भारताच्या वस्त्रोद्योगास जसा फायदा आहे, त्याचप्रमाणे सूत निर्यातीच्या संदर्भात तोटादेखील होणार आहे. भारतातून इतर अनेक वस्तूही बांगलादेशामध्ये जातात, त्यांचीही मागणी कमी होऊ शकते.
भारत हा बांगलादेशाचा दुसरा सर्वात मोठा निर्यात भागीदार देश आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात दोन्ही देशांमधील एकूण व्यापार सुमारे १४ अब्ज डॉलर इतका होता. २०२२-२३ मध्ये भारतातून बांगलादेशाला ६५२ वस्तूंची निर्यात करण्यात आली आणि त्यामधून एकूण बारा अब्ज डॉलरची उलाढाल झाली, तर २०२१-२२ मध्ये आपण बांगलादेशाला १६ अब्ज डॉलरची निर्यात केली. बांगलादेशाला आपण प्रामुख्याने पेट्रोलिअम उत्पादने, तांदूळ, सुती कपडे, सेंद्रीय आणि जैविक रसायने, सुती धागा यांची निर्यात करतो. तर बांगलादेशातून भारतात विशिष्ट जातीचा कापूस, ताग वगैरेंची आयात होते. बांगलादेश भारतातून जवळपास ७५ टक्के शेतमाल आयात करतो. बांगलादेश भारताकडून बटाटे, तांदूळ, गहू, पीठ, डाळी, बेसन, फळे, विशिष्ट प्रजातीचे मासे, भाजीपाला अशा अनेक वस्तू आयात करतो.
भारतातून बांगलादेशामध्ये चहा, कॉफी, साखर, कन्फेक्शनरी, लोखंड आणि पोलाद तसेच वाहने यांची मोठ्या प्रमाणावर निर्यात होते. वेगवेगळ्या प्रकारची यंत्रसामग्री, इलेक्ट्रॉनिक्स आणि वाहनांचे सुटे भाग, प्लास्टिक हा सर्व माल बांगलादेश भारतातून घेणेच पसंत करतो. या बहुसंख्य वस्तूंवर बांगलादेश पूर्ण शुल्क आकारतो. या वस्तू ‘साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया करारा’च्या अंतर्गत येत नाहीत. भारताची बांगलादेशला होणारी निर्यात वेगवेगळ्या उत्पादन क्षेत्रांमधील आहे. याउलट बांगलादेशाकडून आपल्याकडे मुख्यतः गारमेंट्स, टेक्स्टाइल्स या क्षेत्रातीलच निर्यात होते. या वस्तूंचा बांगलादेशातून भारतात होणाऱ्या निर्यातीतील एकूण वाटा ५६ टक्के आहे. भारत आणि बांगलादेशादरम्यान मोठा व्यापार होतो आणि हा व्यापार भारताच्या फायद्याचा असतो. भारताने २०२३-२४ मध्ये बांगलादेशामधून १५ हजार २६८ कोटी रुपयांचा माल आयात केला, तर बांगलादेशला ९१ हजार ६१४ कोटी रुपयांची निर्यात केली. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये दोन्ही देशांमध्ये १७ हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त व्यापार झाला. बांगलादेशमधील सध्याच्या परिस्थितीचा या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता आहे.
भारताने २०१६ पासून बांगलादेशाला पायाभूत सुविधांच्या विकासासाठी खूप मदत केली आहे. भारताने बांगलादेशाला आठ अब्ज डॉलरची क्रेडिट लाइन दिली. त्या मदतीने तिथे रेल्वे, रस्ते आणि बंदरे बांधली जात आहेत. भारताने बांगलादेशामध्ये १२० दशलक्ष डॉलरहून अधिक गुंतवणूक केली आहे. याशिवाय राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेचा परिणाम तेथे कार्यरत असलेल्या भारतीय कंपन्यांवर होण्याची शक्यता आहे. भारताच्या ईशान्येकडील राज्यांशी संपर्क साधण्यासाठी बांगलादेश हे देखील एक प्रमुख माध्यम होते. बांगलादेशातील नवीन सरकारने भारताला सहकार्य न केल्यास ईशान्येतील राज्यांशी भारताला पुन्हा ‘चिकन नेक’च्या माध्यमातूनच संपर्क साधावा लागेल. सामरिक दृष्टिकोनातून चीनशी स्पर्धा करण्यासाठी ही बाब खूप महत्त्वाची होती. सध्या तेथे अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे भारताला पुन्हा एकदा निर्वासितांच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे.
मुळात भारतामधून विविध वस्तू आणि सेवांची आयात करणे बांगलादेशाच्या दृष्टीने फायद्याचे आहे, कारण वाहतुकीचा खर्च कमी आहे. भारतातून तुलनेने इतर देशांपेक्षा कमी खर्चात चांगल्या गुणवत्तेचा माल मिळतो. शिवाय बांगलादेशच्या निर्मितीतच भारताचा सिंहाचा वाटा असल्यामुळे पहिल्यापासून उभय देशांचे संबंध मजबूत पायावर उभे आहेत. पर्ल ग्लोबल इंडस्ट्रीज, इमामी, बायर कॉर्पोरेशन, जीसीपीएल, ब्रिटानिया, विकास लाइफकेअर, डाबर, एशियन पेंट्स, बजाज ऑटो, टाटा मोटर्स, हिरो मोटर कॉर्पोरेशन, व्हीआयपी या कंपन्यांचे उत्पादन बांगलादेशमधूनही होते. तसेच भारतातून बांगलादेशामध्ये गेलेले तसेच स्वातंत्र्यपूर्व काळापासून तेथेच असलेले असे अनेक हिंदू व्यापारी आहेत. त्यांच्या दुकानांवर आणि आस्थापनांवर हल्ले झाले आहेत. बांगलादेशमध्ये व्यवसाय असलेल्या अनेक भारतीय कंपन्यांच्या शेअर्सचे भाव खाली गेले आहेत. म्हणूनच बांगलादेशमधील परिस्थिती लवकर निवळणे आणि उभय देशांमध्ये पुन्हा एकदा सलोख्याचे संबंध बनणे, हे आवश्यक आहे.
- हेमंत देसाई
(लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.)