हिंस्र कुत्र्यांवर बंदी हवीच!

दिल्ली आणि हरयाणातील काही घटनांत अशा कुत्र्यांच्या हल्ल्यांत ‘डिलिव्हरी बॉय’ मृत्युमुखी पडल्याचेही समोर आले. राज्यातील हणजूण प्रकरणानंतर गोमंतकीय जनतेत अशा कुत्र्यांबाबतची भीती आणि चिंता वाढलेली आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे.

Story: अग्रलेख |
13th September 2024, 12:02 am
हिंस्र कुत्र्यांवर बंदी हवीच!

कुणी छंद म्हणून, तर कुणी घर आणि संपत्तीची राखण करण्यासाठी कुत्र्यांना पाळत असतो. त्यासाठी गडगंज संपत्ती असलेले अनेकजण लाखो रुपये खर्चून हिंस्र जातींच्या कुत्र्यांची खरेदी करतात. पण, कधीकधी अशा कुत्र्यांमुळे निरपराधांचा बळी जातो, हे पंधरा दिवसांपूर्वी हणजूण येथे घडलेल्या घटनेवरून समोर आले. २९ ऑगस्ट रोजी हणजूणमध्ये अवघ्या सात वर्षांच्या एका बालकावर ‘पीटबूल’ जातीच्या कुत्र्याने हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. याआधीही राज्यात अशा कुत्र्यांकडून नागरिकांवर हल्ले झाल्याच्या घटना घडल्या. त्यात काहीजण जखमी झाले होते. पण, त्यावेळी सरकारने अशा घटनांकडे कानाडोळा केला होता. परंतु, हणजूणमधील घटनेनंतर मात्र सरकार खडबडून जागे झाले. हणजूणमधील घटनेत सहभागी कुत्र्याच्या मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी कडक पावले उचलण्याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. त्यानुसार पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने पाळीव कुत्र्यांबाबत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

पाळीव कुत्र्यांच्या मालकांना त्यांची नोंदणी​ पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याकडे करणे सक्तीचे असेल, एखाद्या व्यक्तीला पाळीव कुत्रा चावल्यास त्याच्या उपचाराचा खर्च तसेच नुकसान भरपाई कुत्र्याच्या मालकाला द्यावी लागेल, अशा कुत्र्यांच्या वागणुकीबाबत मालकांना प्रतिज्ञापत्र लिहून द्यावे लागेल, पाळीव कुत्र्यांची नोंदणी करताना मालकाचे नाव, पत्ता, कुत्र्याची प्रजाती, वय, निर्बीजीकरण याचीही माहिती द्यावी​ लागेल, पाळीव तसेच हिंस्र जातीच्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणी नेताना त्यांच्यावर चेन किंवा तत्सम गोष्टींनी नियंत्रण ठेवणे आवश्यक असेल, आपल्या कुत्र्यांना अन्य व्यक्तींवर हल्ला करण्याची सूचना मालकांना देता येणार नाही, पाळीव कुत्र्याला अन्य कुत्री किंवा जनावरे चावल्यानंतर रेबीजची लक्षणे दिसू लागल्यास त्याबाबतची माहिती तत्काळ खात्याला द्यावी लागेल, याबाबत चुकीची माहिती दिल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल, अशा प्रकरणांत कुत्र्याचा मालक दोषी सापडल्यास त्याच्यावर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, असे पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याने जारी केलेल्या नियमावलीत स्पष्ट करण्यात आले आहे. परंतु, हणजूण प्रकरणानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी हिंस्र जातीच्या कुत्र्यांना यापुढे राज्यात बंदी घालण्यात येणार असल्याचे अनेकदा म्हटले होते. त्यावर मात्र नियमावलीत भाष्य करण्यात आलेले नाही.

गेल्या काही वर्षांत रा​ज्यातील हजारो नागरिकांना पाळीव आणि भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांचा सामना करावा लागला आहे. गत पावसाळी अधिवेशनात याबाबत विचारण्यात आलेल्या लेखी प्रश्नाच्या उत्तरात पशुपालन आणि पशुसंवर्धन खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी राज्यात गेल्या पाच वर्षांत कुत्रे चावण्याच्या ७१,९१५ घटनांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. या उत्तरातून राज्यात वर्षाला सरासरी १४,१४३, तर दिवसाला सरासरी ४० जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याच्या घटना घडत असल्याचे स्पष्ट होते. मंत्री हळर्णकर यांनी ही आकडेवारी केवळ सरकारी इस्पितळांत नोंद झालेल्या रुग्णांबाबत दिलेली होती. कुत्र्यांनी चावा घेतलेले अनेक रुग्ण खासगी इस्पितळांतही दाखल होत असतात. त्यामुळे अशांचा आकडा आणखी जास्त असण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, २०१९ नंतर अजूनपर्यंत राज्यात भटक्या आणि पाळीव कुत्र्यांची गणना झालेली नाही. केंद्र सरकारने २०१९ मध्ये कुत्र्यांची गणना केली होती. त्यावेळी राज्यात एकूण २७,८६५ भटकी कुत्री होती. यात शहरी भागांतील ८,९६७, तर ग्रामीण भागांतील १८,८९८ कुत्र्यांचा समावेश होता. परंतु, २०१९ मध्ये झालेल्या या गणनेत राज्यात हिंस्र जातीची किती कुत्री पाळली जात आहेत, याचा आढावा मात्र घेण्यात आलेला नव्हता. २०१९ नंतर येत्या १ ऑक्टोबरपासून राज्यात पुन्हा कुत्र्यांची गणना करण्यात येणार आहे. या गणनेत अशा कुत्र्यांचा शोध घेण्यासाठी त्यांची नोंदणी करण्याचे आदेश सरकारने पशुपालन खात्याला दिलेले आहेत. त्यामुळे या गणनेनंतरच राज्यात हिंस्र जातीची कुत्री नेमकी किती आहेत, याचा आकडा समोर येणार आहे.

गेल्या काही वर्षांत गोव्यासह देशातील इतर राज्यांमध्येही हिंस्र जातीच्या कुत्र्यांनी स्वत:च्या मालकासह इतर नागरिकांवर हल्ले केल्याच्या घटना घडल्या आहेत. गतवर्षी महाराष्ट्र, दिल्ली, उत्तर प्रदेश, हरयाणा, कर्नाटक आदी राज्यांत हिंस्र कुत्र्यांनी नागरिकांवर प्राणघातक हल्ला केल्याच्या घटना समोर आल्या. दिल्ली आणि हरयाणातील काही घटनांत अशा कुत्र्यांच्या हल्ल्यांत ‘डिलिव्हरी बॉय’ मृत्युमुखी पडल्याचेही समोर आले. राज्यातील हणजूण प्रकरणानंतर गोमंतकीय जनतेत अशा कुत्र्यांबाबतची भीती आणि चिंता वाढलेली आहे. त्यामुळे सरकारने त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेणे अपेक्षित आहे. एकंदरीत, हौस म्हणून किंवा संपत्तीच्या रक्षणासाठी धनिक लोक हिंस्र जातीची कुत्री पाळतात. अशा धनिकांना सर्वसामान्यांचे कधीच सोतरसूतक नसते. पशुपालन खात्याने जारी केलेल्या नियमावलीचे यातील कितीजण पालन करतात, हे पुढील काहीच दिवसांत दिसून येईल. पण, भविष्यातील अनुचित घटना रोखण्याच्या दृष्टीने आताच हिंस्र कुत्र्यांवर राज्यात बंदी घालणेच योग्य ठरेल.