स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळे ‘आप’शी आघाडी नाहीच

हरयाणा

Story: राज्यरंग |
13th September 2024, 12:01 am
स्थानिक काँग्रेस नेत्यांमुळे ‘आप’शी आघाडी नाहीच

हरयाणात विधानसभेतील सर्व ९० जागांवर एकाच टप्प्यात ५ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन ८ ऑक्टोबरला निकाल जाहीर होणार आहे. २०१९ च्या निवडणुकीत भाजपने ४० जागांवर विजय मिळवून सत्ता स्थापन केली होती. विरोधी पक्ष काँग्रेसच्या पदरात ३१ जागा पडल्या होत्या. लोकसभा निवडणुकीत ‘इंडि’ आघाडीने चांगले यश मिळवले होते. त्यानंतरच्या विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकीतही ही आघाडी कायम राहील, असे आघाडीच्या नेत्यांनी म्हटले होते. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची निवडणुकीत आघाडी व्हावी, अशी इच्छा होती. आप आणि समाजवादी पक्षाला सोबत घेण्याची त्यांनी व्यूहरचना आखली होती; मात्र किती आणि कुठल्या जागा कोणी लढवायच्या यावर एकमत न झाल्याने अखेर आपने स्वबळावर निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.

राहुल गांधींच्या आग्रहामुळे काँग्रेसचे स्थानिक नेते आणि आपचे नेते यांच्यात अनेक दिवस जागावाटपावर खलबते झाली. मात्र राज्यातील काँग्रेसचे प्रभावशाली नेते आघाडी होऊ नये, यासाठी प्रयत्न करत होते. आपने पंजाब आणि दिल्लीच्या शेजारी असलेले आणि पक्षाचा प्रभाव असलेले पाच-सात मतदारसंघ मागितले होते; मात्र काँग्रेस नेत्यांनी त्यांना भाजपचा प्रभाव असलेले मतदारसंघ देण्याची तयारी दर्शवली. अखेर आपने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन सोमवारी २० उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते भूपिंदरसिंह हुडा सुरुवातीपासून आघाडीच्या विरोधात होते. राहुल यांनी आघाडीसाठी अनुकूलता दाखवूनही राज्यातील नेत्यांनी आघाडी होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. राहुल यांनी एक-दोन जागा समाजवादी पक्षाला देण्यासही सांगितले होते, मात्र समाजवादी पक्षाशीही आघाडी होऊ शकली नाही. ‘आप’ने सुरुवातीला काँग्रेसकडे १० ते १५ जागांचा प्रस्ताव दिला होता. नंतर पाच ते सात जागांवर लढण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. मात्र या जागा आम्ही ठरवू, असे त्यांचे म्हणणे होते. पेहोवा, कलायत, जिंद, गुहला आणि सोहना हे ‘आप’ला हवे असलेले मतदारसंघ काँग्रेसचे नेते सोडण्यास तयार नव्हते. काँग्रेसकडून आम्हाला तुलनेने दुबळ्या जागा देण्याचा प्रयत्न केला जात होता, असा दावा ‘आप’च्या नेत्यांनी केला. ‘आप’च्या एका नेत्याने सांगितले की, राज्यातील काँग्रेस नेत्यांनी आम्हाला हव्या असलेल्या जागा देण्यास पहिल्या दिवसापासून विरोध दर्शवला. त्यामुळे आम्हाला इतर जागांवरही तडजोड करता आली नाही. आम्ही काँग्रेसकडे १० जागा मागितल्या होत्या. या जागा पंजाब आणि दिल्लीला लागून होत्या. मात्र त्या देण्यास काँग्रेस इच्छुक नव्हती. काँग्रेसने आम्हाला भाजपची ताकद असलेल्या ३ ते ५ जागा देण्याची तयारी दर्शवली होती. त्यामुळे चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही आघाडी होऊ शकली नाही.

प्रदीप जोशी