Story: युगांक नायक | 12th September 2024, 11:45 pm
आणीबाणीच्या काळात जेएनयूच्या अध्यक्ष तथा भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांंनी जेनएयूच्या अध्यक्षपदावरून पायउतार व्हावे, असे निवेदन त्यांच्यासमोर वाचून दाखवताना सीताराम येचुरी.
प्रभावी वक्तृत्व शैली, इतिहासाचा सखोल अभ्यास, देशाच्या सामाजिक-आर्थिक विषयांवर लेखन आणि उत्तम संसदपटू, मार्क्सवादी मुशीतून आलेला हा नेता सतत देशाच्या वैचारिक वर्तुळात कुतुहलाचा विषय बनला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची जेव्हा देशाव्यापी पिछेहाट झाली, तेव्हा या पक्षाची धुरा वाहण्यासाठी येचुरी यांची महासचिव पदावार निवड झाली हाेती.
देशाच्या राजकारण्यांची एक पिढी आणीबाणीच्या काळातील विद्यार्थी चळवळींतून घडली. आणीबाणीचा कालावधी ही त्या पिढीची शाळाच होती. त्या काळात जवाहरलाल नेहरू विद्यापिठाच्या (जेएनयू) विद्यार्थी मंडळाची निवडणूक एकाच वषी तीन वेळा बरखास्त करण्यात आली. तब्बल तीन वेळा निवडणुका झाल्या आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (मार्क्सवादी) विद्यार्थी मोर्चा स्टुडंट फ्रंट ऑफ इंडियातर्फे सीताराम येचुरी यांनी तीनही वेळा अघ्यक्षपदाची निवडणूक जिंकून वेगळा विक्रम केला. ते विद्यार्थी मंडळाचे अध्यक्ष असताना केंद्र सरकाराने विद्यापिठाच्या काही विद्यार्थी नेत्यांच्या नावाने वॉरंट काढले होते. तेव्हा जेएनयूचे अध्यक्ष भारताचे पंतप्रधानच असायचे. आणीबाणीच्या काळात येचुरी यांनी थेट इंदिरा गांधी यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला आणि जेनएयूच्या अध्यक्षपदावरून त्यांनी पायउतार व्हावे, असे निवेदन इंदिरा गांधींसमोर वाचून दाखविले. हो फोटो आणीबाणीच्या विशेष स्मृतींत अजरामर राहिला.
प्रभावी वक्तृत्व शैली, सखोल इतिहासाचा अभ्यास, देशाच्या सामाजिक-आर्थिक विषयांवर लेखन आणि उत्तम संसदपटू, मार्क्सवादी मुशीतून आलेला हा नेता सतत देशाच्या वैचारिक वर्तुळात कुतुहलाचा विषय बनला. झब्बा व झोला ही ओळख असलेल्या कॉम्रेडमध्ये पँट-शर्ट घालून वावरणारा. भारतीय संसदेत पहिल्यांदा आय पॅड घेऊन येणारा हा नेता होता. पांढरे केस, कर्मठ मार्क्सवादी आकलन ही परंपरागत छबी असणाऱ्या मार्क्सवादी नेत्यांमध्ये सतत बदल, सुधारणा आणि वेगाचा ठाव घेणारे येचुरी हे सतत मार्क्सवादाच्या चळवळीत चैतन्य भरणारे नेते होते.
परिस्थिती बदलते, तेव्हा तिचे आकलन, संसाधने बदलली पाहिजे. जर ती बदलत नसतील, तर तो मार्क्सवाद होत नाही, असे येचुरी म्हणायचे. २००७ साली भारत-अमेरिका अणुऊर्जा कराराच्या मुद्द्यावरून डाव्या पक्षांनी काँग्रेसप्रणित यूपीए सरकारचा पाठिंबा काढला. हा सैद्धांतिक मुद्दा आपण वर्तमान परिस्थितीशी जोडू शकलो नाही, याची येचुरी यांनी प्रांजळपणे कबुली दिली. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीची जेव्हा देशाव्यापी पिछेहाट झाली, तेव्हा या पक्षाची धुरा वाहण्यासाठी येचुरी यांची महासचिव पदावार निवड झाली.
येचुरी आणि इतर भारतीय कम्युनिस्ट नेत्यांमधील सर्वांत मोठा फरक म्हणजे त्यांची वर्तमान परिस्थितीचे आकलन करण्याची क्षमाता. जेव्हा त्यांच्या हाती पक्षाची धुरा आली, तेव्हा त्यांना कम्युनिस्ट विचारांची होत असलेली पिछेहाट ज्ञात होती. त्यासाठी त्यांनी पक्षात हस्तक्षेप शक्तीची चाचपणी करायला सुरुवात केली. समाविचारी पक्षांबरोबर सहकार्य करण्याची त्यांची नीती होती. या नीतीला प्रतिकार सर्वांत जास्त स्वपक्षातच झाला हे वास्तव. त्यांच्या या वस्तुनिष्ठ नीतीला त्यांचेच कॉम्रेड ‘प्रेग्मेटिस्ट’ संबोधायचे.
‘क्लास’ (वर्ग) आणि ‘कास्ट’ (जात) हा मार्क्सवादी विवेचनातला सर्वांत क्लिष्ट आणि वादाचा विषय आहे. मार्क्सवादाचा एक मोठा वर्ग जात ही व्यापक आर्थिक संघर्षाचा भाग मानतो. पण भारतात जात ही फक्त आर्थिक वर्गवारी नसून ती एक सामाजिक व्यवस्था आहे. २०१४च्या निवणुकांनंतर खासकरून रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर दलित वर्ग उफाळून आला. या घटनेनंतर विविध सामाजिक न्यायाचे राजकारण करणाऱ्या पक्षांना परंपरागत मतांचा पुनर्विचार करायला लावला. उदाहरणार्थ, ‘एम-यू फॅक्टर’ म्हणजे ‘मुस्लिम-यादव’ धोरणाचा परंपरागत फायदा बिहारच्या राष्ट्रीय जनता दलाला व्हायचा. बदलत्या समिकरणांनी तेजस्वी यादव यांनी त्याचे आकलन ‘एम-यू’ म्हणजे ‘मजदूर और युवा’ असे केले. येचुरी यांच्या नेतृत्वाखाली भाकपने (मार्क्सवादी) ‘लाल-नील’ घोषणा नव्याने मैदानात उतरवली.
नजिकच्या काळात येचुरी यांची सर्वांत मोठी उपलब्धी म्हणजे इंडिया आघाडीची स्थापना. दिल्लीच्या सत्ता वर्तुळात असे म्हटले जाते की, राहुल गांधी कॉंग्रेस नेत्यांपेक्षा येचुरी यांचे जास्त मार्गदर्शन घेत असत. इंडिया आघाडीचे नाव येचुरी यांनी ‘व्ही फॉर इंडिया’ असे सुचवले होते. जेणेकरून सोशल मीडियावर हॅशटॅग वापरण्यास मदत होईल आणि युवा मतदारांकडे पोहोचणे सोपे होईल. वयाच्या सत्तरीत वावरणाऱ्या नेत्याला सोशल मीडियाचे आकलन करण्याची क्षमता होती.
२०२४च्या नवनिर्वाचित संसदेत इंडिया आघाडीच्या बहुतेक खासदारांनी शपथ घेताना लाल रंगाच्या भारतीय संविधानाची प्रत दाखवत शपथ घेतली. भारताचे माजी महाअधिवक्ता एम. एम. वेणुगोपाल यांनी वकिलांसाठी सोयीस्कर व्हावे, यासाठी संविधानाच्या ‘कोर्ट एडिशन’चे संपादन केले. ही प्रत वकील न्यायलयात जाताना वापरत असत. ही प्रत जेव्हा संसदेत प्रचलित नव्हती, तेव्हा संसदेत पहिल्यांदा सीताराम येचुरी यांनी आपल्या संसदीय भाषणावेळी ती दाखवली होती.
सीताराम येचुरींच्या जाण्याने भारतीय राजकारणातील चौकस विचारांचा एक विचारवंत हरपला आहे. परंपरागत राजकारणात काही तरी ‘फ्रीकआऊट’ करण्याचा ध्यास बाळगणारा युवा दिलाचा नेता हरपला आहे.